Eknath Shinde
Eknath Shinde Tendernama
मुंबई

पोलिसांच्या घरांबाबत मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय; लवकरच...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई आणि उपनगरातील धोकादायक झालेल्या पोलिस वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत लवकरच सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. बोरिवली पश्चिमेकडील तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या पोलिस वसाहतीला भेट देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी या इमारतीच्या सद्यस्थितीची पाहणी केली. मुंबईतील अनेक पोलिस वसाहतींची परिस्थिती अत्यंत दयनीय असून, त्यात राहणाऱ्या पोलिसांचे कुटुंबिय जीव मुठीत धरून जगत आहेत. ही परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन पाहिली, तसेच पोलिसांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या अडचणही जाणून घेतल्या.

पोलिस वसाहतींचा प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित असून, त्यावर तोडगा काढण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील आपली चर्चा झालेली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मागे याबाबत धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपदी बसल्यानंतर या प्रश्नात पुन्हा एकदा लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल. यासाठी लवकरच गृह विभागातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांसोबत या विषयावर बैठक घेण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

पोलिस वसाहतींची माहिती घेतल्यावर त्यात राहणाऱ्या पोलिस कुटुंबियांसोबत देखील त्यांनी संवाद साधला. यावेळी लवकरात लवकर तुमच्या घरांचा प्रश्न सोडवला जाईल, तसेच पोलिसांच्या घरांची संख्या वाढवण्याचा देखील प्रयत्न केला जाईल, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांसह स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, आमदार रवींद्र फाटक, अतिरिक्त पोलिस महासंचालक अर्चना त्यागी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.