Devendra Fadnavis Tendernama
मुंबई

युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ‘एज्युकेशन सिटी’त 1500 कोटी गुंतवणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यूकेशन सिटी’ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न येथेच पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्हज २०२५ परिषदेमध्ये आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यापैकी सिडको आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान १५०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्योग विभागाचे सचिव डॉ.अन्बलगन, सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

परदेशी विद्यापीठांना भारतात आणून जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र उभारण्याच्या उद्देशाने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) २०२५ मध्ये सिडकोच्या इंटरनॅशनल एज्युसिटी प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर वेव्हज परिषदेत हा करार करण्यात आला. हे विद्यापीठ नवी मुंबई येथे सिडकोमार्फत उभारण्यात येणाऱ्या ‘एज्युसिटी’ प्रकल्पामध्ये आपले कॅंपस उभारून जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र निर्माण करणार आहे. यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या वतीने १५०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या करारावर सिडकोच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या वतीने कुलगुरू डॉ. डायने स्मिथ-गॅंडर यांनी स्वाक्षरी केली. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले.