मुंबई (Mumbai) : ठाणे- भिवंडी -कल्याण या मेट्रो मार्गिकाचे काम पुनर्वसनामुळे रखडले असून जिथे अधिक पुनर्वसनाची गरज आहे, त्या कल्याण ते भिवंडी मार्गातील पाच किमी भागातून मेट्रो जमिनीखालून नेण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत दिली.
समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावाच्या चर्चेत ठाणे -भिवंडी -कल्याण हा मेट्रो मार्ग रखडल्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. भिवंडी -निजामपूर हे भारताचे मँचेस्टर असून लॉजिस्टिक हब म्हणून भिवंडी शहर पुढे येत आहे. या शहराच्या विकासासाठी मेट्रो वेळेत पूर्ण करा, अशी मागणी आमदारा रईस शेख यांनी केली होती. आमदार रईस शेख यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ठाणे ते भिवंडी या मार्गीकेचे 80 टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. मात्र कल्याण ते भिवंडी या टप्प्यातील 5 किमी मार्गातील बाधितांचे मोठ्या प्रमाणात पुनर्वसन करावे लागणार आहे. या टप्प्यातून मेट्रो जमिनीखालून नेण्याचे निश्चित झाले आहे. यासंदर्भातल्या अहवालाचे काम टीसीएल कंपनीला दिले आहे. प्रकल्प अहवाल आल्यानंतर हे काम वेगाने केले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
ठाणे ते वडपे रस्त्याचे काँक्रिटीकरण लवकरच -
मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे ते वडपे दरम्यान 23 किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून या रस्त्याचे काँक्रिटीकरण 2025 पर्यंत करण्यात येणार असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबतचा प्रश्न सदस्य अजय चौधरी यांनी उपस्थित केला होता. यावेळी सदस्य हिरामण खोसकर, रईस शेख यांनी उपप्रश्न उपस्थित केला. मंत्री भुसे म्हणाले, वडपे ते ठाणे या रस्त्याच्या कामाचे त्रयस्थ ऑडिट करण्यासाठी व्ही. जे. टी. आय. संस्थेची नेमणूक करण्यात आली असून या संस्थेच्या अहवालातील निष्कर्षानुसार कार्यवाही करण्यात येईल. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण भागात गोदामाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कंटेनरची वाहतूक अधिक असल्याने वाहतूक कोंडी होते याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने संबधित विभागाला सूचना केल्या असून ही समस्या लवकरच सोडवण्यात येईल.