Devendra Fadnavis Tendernama
मुंबई

Devendra Fadnavis : मुंबईतील चाळी, झोपडपट्ट्यांचा क्लस्टर पुनर्विकास; स्वयं पुनर्विकासाच्या प्रीमियमचे व्याज 3 वर्षे माफ

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : चारकोपमधील श्वेतांबर गृहनिर्माण संस्थेचा स्वयं पुनर्विकास पाहून मुंबईचे चित्र स्वयं पुनर्विकासच बदलू शकतो, असा विश्वास निर्माण झाला आहे. स्वयं पुनर्विकास हाच आत्मनिर्भर विकास असून यातून आत्मनिर्भर मुंबईकर उभारण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच मार्च २०२६ पर्यंत येणाऱ्या स्वयं पुनर्विकास प्रस्तावांसाठी प्रीमियमवरील तीन वर्षापर्यंतचे व्याज रद्द करण्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी केली.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक सहाय्याने चारकोप श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उद्घाटन व चावी वाटप कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा आमदार प्रविण दरेकर उपस्थित होते. चारकोप येथील राजे शिवाजी मैदानात झालेल्या कार्यक्रमात श्वेतांबरा संस्थेच्या सभासदांना सदनिकेच्या चाव्या वाटप करण्यात आल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या २५-३० वर्षात मुंबईतील मराठी व मध्यमवर्गीय कुटुंबाना मुंबईबाहेर जाण्याची वेळ आली. मात्र, स्वयं पुनर्विकासमुळे मुंबई शहरातील मराठी मध्यमवर्गीयांना आपल्या जीवनात परिवर्तन होणार असल्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. स्वयं पुनर्विकासासाठी भरण्यात येणाऱ्या प्रीमियमवरील व्याज माफी ही मार्च २०२६ पर्यंत येणाऱ्या प्रस्तावांना तीन वर्षासाठी लागू असेल. याला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. फडणवीस म्हणाले की, स्वयं पुनर्विकास संदर्भातील जेवढ्या सेवा आहेत त्या सर्व सेवा लोकसेवा हक्क अधिनियमानुसार अधिसूचित करून ऑनलाईन देण्यात येतील. स्वयं पुनर्विकासासाठी सिंगल विंडो प्रणाली अधिक सक्षम करण्यात येणार असून ती मानवी हस्तक्षेप विरहित असेल. त्यातून सर्व परवाने व सुविधा डिजिटली देण्यात येतील. जोपर्यंत स्वयं पुनर्विकास हा ऑटो मोडवर जात नाही, तोपर्यंत त्यामध्ये आवश्यक ते बदल केले जातील. स्वयं पुनर्विकासात खोडा घालणाऱ्याची नोकरी राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्वयं पुनर्विकासबरोबरच चाळी व झोपडपट्टी यांचा क्लस्टर पुनर्विकास हाती घ्यावा. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. स्वयं पुनर्विकास व क्लस्टर पुनर्विकास यासाठी येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी आमदार प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीने सूचविलेल्या शिफारसी पुढील महिन्यात जाहीर होणाऱ्या गृहनिर्माण धोरणात समाविष्ट करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनविणार - पीयूष गोयल
केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. गोयल म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देशात इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ओळखले जात आहे. देशात राज्याला पुढे नेणारा नेता म्हणून त्यांची इतिहासात ओळख निर्माण होईल. राज्यातील पुनर्विकास प्रकल्पांसाठी केंद्र शासनाचे सर्व सहकार्य मिळेल. पुढील काळात सागरी किनारा मार्ग हा उत्तर मुंबई ते विरार पर्यंत आणण्यात येईल. तसेच उत्तर मुंबई ते नवीन विमानतळ दरम्यान वाहतुकीसाठी दोन नवे मार्ग मुख्यमंत्री श्री. फडणवीस निर्माण करत आहेत. उत्तर मुंबईला उत्तम मुंबई करण्याचा निश्चय असल्याचेही गोयल यांनी सांगितले.

प्रास्ताविकात आमदार दरेकर म्हणाले की, गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास अभियानातून एक चळवळ उभी राहिली आहे. यातून मुंबईतील मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. यापूर्वी अपुऱ्या जागेमुळे मुंबईतील मराठी माणूस हा पालघर, वसई, कसारापर्यंत गेला. मात्र स्वयं पुनर्विकासमुळे मुंबईतील मराठी माणूस बाहेर जाणार नाही. त्यांना जास्त क्षेत्रफळाची जागा मिळेल. स्वयं पुनर्विकास साठी हाउसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सुरू करावे, असेही दरेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार योगेश सागर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, भाई गिरकर, स्नेहा दुबे, शिवाजीराव नलावडे, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, मुंबई म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह श्वेतांबर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.