CIDCO Tendernama
मुंबई

Navi Mumbai: सिडकोचा नवी मुंबईच्या पाणी टंचाईवर तोडगा; 22 किमी लांब भूमिगत जलबोगद्यासाठी टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Navi Mumbai): नवी मुंबई, नैना परिसर आणि आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भेडसावणारी पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने सिडकोने एक मोठे आणि महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. कर्जतच्या कोंढाणे धरण प्रकल्पातून बोगद्याद्वारे पाणी वाहून आणण्यासाठी सिडकोने कंपन्यांकडून स्वारस्य निविदांची सार्वजनिक सूचना प्रसिद्ध केली आहे.

वर्षानुवर्षे शहरविकासाच्या कामांवर लक्ष केंद्रित केल्यानंतर, आता सिडकोने पाणीटंचाई दूर करण्यासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत जलपुरवठा योजनांना प्राधान्य दिले आहे. व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्या पुढाकाराने, सिडकोने हेटवणे आणि कोंढाणे हे दोन मोठे धरण प्रकल्प व त्यातून निघणारे पाणी शहरांपर्यंत पोहोचवण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे भविष्यातील गृहनिर्माण योजना आणि नैना क्षेत्रातील रहिवाशांना मुबलक शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

सिडकोने १३१८ कोटी रुपये खर्चून तयार होणाऱ्या कोंढाणे धरणातील पाणी लगेच वापरता यावे यासाठी, धरण पूर्ण होण्यासोबतच जलबोगद्याचे कामही हाती घेतले आहे. या प्रकल्पाअंतर्गत, कोंढाणे धरणापासून पनवेल तालुक्यातील मोहपे गावाजवळील प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत २२.२१ किलोमीटर लांबीचा भूमिगत जलबोगदा तयार केला जाईल.

जलबोगद्याची प्रमुख वैशिष्ट्ये...

  • हा भूमिगत मार्ग जमिनीखाली सुमारे ८० ते १०० मीटर खोल असणार आहे.

  • या बोगद्याचा व्यास २४०० मिलीमीटर (२.४ मीटर) इतका असेल आणि याची पाणी वाहून नेण्याची क्षमता दररोज २५० दशलक्ष लीटर इतकी आहे.

  • बोगद्यातून वाहून आणलेले पाणी मोहपे येथील २५० दशलक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाईल आणि त्यानंतर ते शहरांकडे वळवले जाईल.

मोहपे येथे उभारण्यात येणाऱ्या २५० दशलक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या निर्मितीसाठी तसेच पुढील १५ वर्षांच्या संचालन आणि देखभालीसाठी सिडकोने निविदा मागवल्या आहेत. या संपूर्ण प्रकल्पाची कालमर्यादा पावसाळ्यासह एकूण ४८ महिने निश्चित करण्यात आली आहे.

सिडको मंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांनी सांगितले की, “धरण उभारत असतानाच धरणातील पाणी शहरांपर्यंत त्याच वेळी पोहोचवण्यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत. कोंढाणे धरण ते मोहपे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलबोगद्यातून पाणी आणण्यासाठी ही निविदा प्रक्रिया राबविली जात आहे.”

सिडकोने ही संपूर्ण पाणीपुरवठा योजना राबवताना पर्यावरणाच्या विचारांना प्राधान्य दिले आहे. ही संपूर्ण योजना गुरुत्वाकर्षणाच्या तत्त्वावर आधारित आहे. पाण्याचा साठा वहन करण्यासाठी यामध्ये कुठेही मोठी मोटारपंप प्रणाली वापरली जाणार नाही. तसेच, जलशुद्धीकरण केंद्रातही विजेचा वापर अत्यंत कमी होईल अशा पद्धतीने संपूर्ण प्रकल्पाचे नियोजन सिडकोने केले आहे. या वैशिष्ट्यामुळे ही योजना अधिक पर्यावरणपूरक ठरत आहे. या योजनेमुळे नवी मुंबई आणि परिसरातील लाखो रहिवाशांची पाण्याची गरज पूर्ण होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे.