Railway Station
Railway Station Tendernama
मुंबई

'या' सहा रेल्वे स्थानकांवर निघणार हवेतून पाणी; वाचा कसे काय?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सीएसएमटी, दादर, कुर्ला, ठाणे, घाटकोपर आणि विक्रोळी या सहा स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची १७ मेघदूत यंत्रे बसविण्यात येणार आहेत. मे. मैत्री ऍक्वाटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ही यंत्रे बसवण्याचे टेंडर मिळाले आहे. या यंत्राद्वारे हवेपासून पाण्याची निर्मिती होणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विभागातील प्रमुख सहा रेल्वे स्थानकांवर १७ यंत्रे बसविण्यात येणार आहेत. मे. मैत्री ऍक्वाटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पाच वर्षांसाठी मेघदूत यंत्रे बसवण्याचे टेंडर मिळाले आहे. यातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत वर्षाला २५ लाख ५० हजार रुपये महसूल जमा होणार आहे. या १७ यंत्रामधून हवेतून पाण्याची निर्मिती होऊन पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच हवेपासून उपलब्ध झालेल्या पाण्यावर अनेक प्रक्रियाही करण्यात येणार आहेत. सीएसएमटी स्थानकात पाच, दादर स्थानकात पाच, कुर्ला आणि घाटकोपर स्थानकात प्रत्येकी एक, ठाणे स्थानकात चार आणि विक्रोळी स्थानकात एक अशी १७ यंत्रे बसविण्यात येणार आहेत.

आयआरसीटीसीच्या रेल्वे स्थानकातील वॉटर वेंडिंग मशिन्सचे आर्थिक गणित बिघडल्याने गेल्या अडीच वर्षांपासून ही यंत्रणा बंद आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर चकरा माराव्या लागत होत्या. परिणामी प्रवाशांची गैरसोय होत होती. आता मध्य रेल्वेने १७ मेघदूत यंत्रे बसविण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. येत्या काही दिवसांत ही यंत्रे स्थानकांवर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल अडीच वर्षानंतर उपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना थंडगार शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.