MHADA Tendernama
मुंबई

भायखळा येथील उमरखाडी समूह पुनर्विकासाला वेग

राज्य सरकारच्या मंजुरीनंतर म्हाडाकडून ३६ इमारतींच्या पुनर्विकासासाठी टेंडर; विकासकांना चार एफएसआय मिळणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): भायखळा येथील उमरखाडी परिसराच्या समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडाने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर म्हाडाकडून डीपीआर तयार करून विकसकांच्या नियुक्तीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

७० ते ८० वर्षे जुन्या उपकरप्राप्त (सेस) इमारतींबरोबरच पीएमजीपी इमारती आणि खासगी मालकीच्या जवळपास ३६ इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. त्यानुसार सुमारे २० हजार चौरस मीटरचा भूखंड पुनर्विकासासाठी उपलब्ध होणार असून, येथे गगनचुंबी इमारती उभ्या राहण्याची शक्यता आहे.

कामाठीपुरा येथील मोडकळीस आलेल्या सेस इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया बांधकाम आणि विकास संस्थेच्या (सी ॲण्ड डीए) माध्यमातून सुरू झाली आहे. त्यानंतर आता म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने उमरखाडी परिसरातील सुमारे २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावरील पीएमजीपी, सेस आणि खासगी इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्याचे नियोजन केले आहे.

या भूखंडावरील इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या सुमारे १,५०० रहिवाशांना पुनर्विकासातून सुमारे ६५ हजार चौरस मीटर बांधीव क्षेत्रफळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक रहिवाशाला किमान ५०० चौरस फुटांचे घर मिळण्याची शक्यता आहे. तर म्हाडाला सुमारे ७५ हजार चौरस मीटर बांधीव क्षेत्रफळ मिळू शकते. त्यातून १,६०० ते २,००० घरे उपलब्ध होऊ शकतील, अशी माहिती म्हाडातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.

उमरखाडी परिसरातील पीएमजीपी, सेस, पुनर्रचित आणि खासगी सेस इमारतींच्या समूह पुनर्विकासासाठी कमाल चार एफएसआय मिळणार आहे. त्यामुळे पुनर्वसन सदनिकांबरोबरच विक्रीयोग्य क्षेत्रफळही उपलब्ध होऊ शकणार आहे.

इमारतीनिहाय भूखंड

  • पीएमजीपी इमारती - ७,४३७ चौरस मीटर

  • म्हाडा पुनर्रचित इमारती - १,७३८ चौरस मीटर

  • म्हाडा अधिग्रहित इमारती - ४,००३ चौरस मीटर

  • म्हाडाने ७९ अ अंतर्गत नोटीस दिलेल्या इमारती - १,४२५ चौरस मीटर

  • खासगी सेस इमारती - ५,१८५ चौरस मीटर

  • खासगी इमारती - ६४२ चौरस मीटर

कोणत्या इमारतींचा पुनर्विकास?

  • म्हाडा पीएमजीपी - १०

  • म्हाडा पुनर्रचित इमारती - ५

  • म्हाडा अधिग्रहित इमारती - ८

  • सेस इमारती - ३

  • खासगी नॉन सेस इमारती - ३

  • सेस इमारती (मालकाचा हक्क) - ५

Key Points

  • उमरखाडी परिसरातील समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडाने राज्य सरकारकडे पाठवला

  • मंजुरीनंतर डीपीआर तयार करून विकसकांच्या नियुक्तीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू होणार

  • पीएमजीपी, सेस आणि खासगी मालकीच्या जवळपास ३६ इमारतींचा एकत्रित पुनर्विकास

  • पुनर्विकासासाठी सुमारे २० हजार चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध होणार

  • सुमारे १,५०० रहिवाशांना पुनर्विकासातून घरे मिळणार

  • रहिवाशांसाठी सुमारे ६५ हजार चौरस मीटर बांधीव क्षेत्रफळ उपलब्ध होणार

  • म्हाडाला सुमारे ७५ हजार चौरस मीटर बांधीव क्षेत्रफळ मिळण्याची शक्यता

  • त्यातून १,६०० ते २,००० घरे उपलब्ध होण्याचा अंदाज

  • विकासकांना कमाल चार एफएसआय मिळणार

  • पुनर्वसन सदनिकांबरोबरच विक्रीयोग्य क्षेत्रफळ उपलब्ध होणार