Mumbai, Ekanth Shinde, devendra fadnavis Tendernama
मुंबई

BMC Election: मुंबईकरांवर आश्वासनांचा पाऊस! खड्डेमुक्तीनंतर झोपडपट्टीमुक्त मुंबईची घोषणा

Mumbai: खड्डेमुक्त रस्ते, इलेक्ट्रिक वाहतूक आणि जलप्रकल्पांतून मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचे महायुतीकडून मतदारांना 'वचन'

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मुंबईच्या विकासाचा कणा असलेल्या पायाभूत सुविधांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत महायुतीने मुंबईकरांसाठी आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. या जाहीरनाम्यात सर्वाधिक महत्त्व मुंबईतील रस्त्यांना देण्यात आले असून, येत्या काळात मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण आणि मजबुतीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आपला वचननामा प्रसिद्ध केला असून, यामध्ये मुंबईच्या पायाभूत सोयी-सुविधांचा कायापालट करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला खड्डेमुक्त करण्यासोबतच, शाश्वत वाहतूक व्यवस्था आणि पाणीपुरवठ्याचे सक्षम जाळे विणण्याचे आश्वासन दिले असून वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहराच्या विकासाचा नवा आराखडा सादर केला आहे.

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवीन द्रुतगती मार्ग आणि प्रगत उड्डाणपुलांचे जाळे निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. केवळ रस्तेच नव्हे, तर सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी 'बेस्ट' बस सेवेत मोठे बदल सूचवण्यात आले आहेत. २०२९ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात १० हजार बसेस करण्याचे उद्दिष्ट असून, या सर्व बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक असतील, ज्यामुळे मुंबईच्या प्रदूषणात मोठी घट होईल.

तसेच मेट्रो आणि वॉटर टॅक्सी यांसारख्या विविध वाहतूक पर्यायांचा समन्वय साधण्यासाठी 'वन मुंबई' ॲप विकसित केले जाणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होईल.

शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महायुतीने दीर्घकालीन नियोजनाचा आराखडा मांडला आहे. आगामी पाच वर्षांत गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करून मुंबईचा पाणीपुरवठा वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. केवळ पाणीपुरवठाच नव्हे, तर सांडपाणी व्यवस्थापनावरही मोठे भाष्य करण्यात आले आहे.

नद्यांमधील सांडपाणी रोखण्यासाठी आणि नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तसेच मुंबईला प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी एकूण १७,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना आखण्यात आली असून, यामध्ये कचरा व्यवस्थापन आणि पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण शहरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पाळत ठेवली जाणार आहे, ज्यामुळे मुंबई एक 'स्मार्ट सिटी' म्हणून जागतिक नकाशावर आपली ओळख निर्माण करेल.

मुंबईतील घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी 'झोपडपट्टीमुक्त मुंबई' हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सुमारे ३० ते ३५ लाख घरे बांधण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य समोर ठेवण्यात आले असून, यामध्ये झोपडपट्टीधारक, पदपथवासी आणि महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या घरांचा समावेश आहे.

पुनर्विकासाच्या कामांना गती देण्यासाठी विकासकांची नियुक्ती केली जाईल आणि जर ते काम पूर्ण करण्यास असमर्थ ठरले, तर म्हाडा स्वतः ही जबाबदारी स्वीकारून प्रकल्प मार्गी लावेल. याव्यतिरिक्त, मुंबईला 'फिनटेक राजधानी' बनवण्यासाठी जागतिक दर्जाचे पायाभूत क्षेत्र विकसित केले जाईल.

जुन्या भाजी मंडईंचे नूतनीकरण, कोळी बांधवांसाठी आधुनिक कोल्ड स्टोअरेज आणि फिश एक्सपोर्ट सेंटर यांसारख्या सुविधांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे. महायुतीचा हा जाहीरनामा मुंबईच्या भौतिक विकासासोबतच पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या पायाभूत सुविधांवर केंद्रीत असल्याचे दिसून येते.