मुंबई (Mumbai) : म्हाडाच्या मुंबई मंडळाने वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील सहा इमारतींच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. या पुनर्वसन इमारतींमध्ये प्रत्येकी ५०० चौरस फुटांच्या १७०० घरांचा समावेश आहे. म्हाडाने या इमारतींचे बांधकाम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्धिष्ट ठेवले आहे.
मुंबई मंडळ ना.म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळीतील बीडीडी चाळीचा पुनर्विकास करीत आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन २०१७ मध्ये करण्यात आले होते. मात्र विविध कारणांमुळे २०२१ पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकली नाही. राज्य आणि म्हाडाने प्रकल्पातील सर्व अडचणी दूर केल्या असून ऑगस्ट २०२१ मध्ये पुन्हा भूमीपूजन करून वरळीतील पुनर्विकासाच्या कामास सुरुवात करण्यात आली. पुढील ३६ महिन्यांत घराचा ताबा देण्यात येईल, असे तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी भूमीपूजनाच्या वेळी जाहीर केले होते. त्यानुसार २०२४ अखेरीस इमारतींचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पातील इमारतींचे बांधकाम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
सध्या वरळीमध्ये सहा इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या सहा पुनर्वसन इमारतींमध्ये ५०० चौरस फुटांच्या १७०० घरांचा समावेश आहे. यापैकी एका इमारतीमधील तीन मजल्याचे आरसीसी काम, तर दोन इमारतींच्या पायाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन इमारतींच्या बांधकामासही आता सुरुवात झाली आहे. इमारतींचे बांधकाम पुढील ३६ महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे मंडळातील उच्चपदस्थांनी सांगितले. एकीकडे या सहा इमारतींचे काम सुरू असतानाच दुसरीकडे टप्प्याटप्प्याने अन्य इमारती पाडून त्याजागी नव्या इमारतींच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.