Balasaheb Thackeray Memorial
Balasaheb Thackeray Memorial Tendernama
मुंबई

Balasaheb Thackeray Memorial : बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या 'या' कामांसाठी लवकरच टेंडर; 150 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे (Balasaheb Thackeray Memorial) काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पाची पहिल्या टप्प्यातील सर्व कामे पूर्ण झाली असल्याची माहिती पुढे येत आहे. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी सुमारे २५० कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी कंत्राटदार (Contractor) नियुक्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए - MMRDA) बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे काम दोन टप्प्यांत केले जात आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात महापौर निवासस्थानाचे जतन व संवर्धन कामाचा समावेश आहे. त्याचबरोबर १५३० चौरस मीटर क्षेत्रफळावर इंटरप्रिटेशन सेंटरचे बांधकाम करण्यात आले आहे.

या इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये संग्रहालय, ग्रंथालय, कलाकार दालन यांचा समावेश आहे. त्याचबरोबर बहुद्देशीय सभागृह आणि प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. बागबगीचा तयार केला जात आहे. ही बहुतांश कामे पूर्ण झाली असून, अंतिम टप्प्यातील किरकोळ कामे सुरू असल्याची माहिती एमएमआरडीएतील उच्चपदस्थांनी दिली.

एमएमआरडीएने दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी अलीकडेच आभा लांबा असोसिएट्स या सल्लागाराची नियुक्ती केली आहे. सल्लागाराने दुसऱ्या टप्प्यातील डिझाईनचा अहवाल एमएमआरडीएला सादर केला आहे. त्यामुळे एमएमआरडीएकडून या कामासाठी लवकरच कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, चित्रपट, व्हर्चूअल रिअलिटी, हार्डवेअर आणि सहाय्यभूत सेवा, तंत्रज्ञान विषयक कामे केली जाणार आहेत. तसेच दृकश्राव्य माध्यमातून कथा सांगितली जाणार आहे.

या स्मारकाच्या कामाला एप्रिल २०२१ मध्ये सुरुवात झाली होती. त्यावेळच्या नियोजनानुसार पहिल्या टप्प्याचे काम मार्च २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र त्याला विलंब झाला होता. अखेर या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास गेले आहे.