SRA Tendernama
मुंबई

अण्णाभाऊ साठे संस्थेच्या SRA च्या 259 कोटीच्या टेंडरमधील गैरव्यवहाराचा पर्दाफाश

चिराग नगरमधील संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या बांधकामासाठीच्या टेंडरमध्ये Speco Infrastructure आणि RPS Infraprojects यांना लाभ होईल अशा अटी असल्याचा आमदार ॲड अनिल परब यांचा आरोप; SRA CEO कडे सखोल चौकशीची मागणी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): घाटकोपर पूर्वेतील चिराग नगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या बांधकामासाठी काढण्यात आलेल्या २५९ कोटी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेवर गैरव्यवहार आणि मक्तेदारीचे आरोप झाले आहेत. शिवसेना नेते आणि आमदार ॲड. अनिल परब यांनी या प्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (SRA) सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

२७ ऑगस्ट २०२६ रोजी SRA चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना लिहिलेल्या पत्रात परब यांनी टेंडरच्या अटी M/s Speco Infrastructure किंवा M/s RPS Infraprojects यांना लाभ होईल अशा पद्धतीने तयार केल्याचा आरोप केला होता. या दोन्ही कंपन्या परस्परांशी संबंधित असून ‘फ्रंट कंपन्या’ म्हणून कार्यरत असल्याचा दावाही त्यांनी केला.

विशेष म्हणजे, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी Speco Infrastructure ही या प्रकल्पासाठी L1 म्हणजे सर्वात कमी बोली लावणारी निविदाकार कंपनी ठरली. या घडामोडीवरून पूर्वनियोजित कटकारस्थान आणि सरकारी व्यवस्थेतील भ्रष्टाचार स्पष्ट होत असल्याचा आरोप परब यांनी केला आहे.

कलाकाराच्या पात्रतेची अट स्पर्धा मर्यादित करणारी?

परब यांनी टेंडरमधील अट क्रमांक २.११.५ वर आक्षेप घेतला आहे. या अटीनुसार निविदाकाराला ‘Packet B’ मध्ये विशेष शिल्पकार किंवा कलाकाराची पात्रता आणि संबंधित कलाकारासोबत केलेला सामंजस्य करार (MoU) सादर करणे बंधनकारक होते.

प्रस्तावित कलाकार किंवा संस्थेने पात्रतेचे निकष पूर्ण केले नाहीत, तर संपूर्ण टेंडर रद्द करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिल्पकार किंवा कलाकाराला भारत सरकारकडून पुरस्कार मिळालेला असणे आवश्यक असल्याची अटही टेंडरमध्ये होती. या अटीचा अर्थ पद्म पुरस्कार असा होत असून, महाराष्ट्रात अशी पात्रता असलेली केवळ एकच कंपनी असल्याचा दावा परब यांनी केला. सर्व पात्र निविदाकारांना MoU उपलब्ध करून दिले जात नसल्याने स्पर्धा आणि सहभाग मर्यादित झाल्याचेही त्यांनी म्हटले.

MoU आणि पल्स प्लाझ्मा तंत्रज्ञानावर आक्षेप

निविदा सादर करतानाच MoU देणे आवश्यक का आहे, असा प्रश्न उपस्थित करत परब यांनी तांत्रिक आणि आर्थिक पात्रता सिद्ध केल्यानंतर १५ दिवसांच्या आत MoU सादर करण्याची मुभा द्यावी, अशी भूमिका मांडली.

टेंडरमध्ये पल्स प्लाझ्मा तंत्रज्ञानासाठी सामंजस्य कराराद्वारे तांत्रिक करार करण्याची अट असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने खडक फोडणे, उत्खनन आणि औद्योगिक कामांसाठी केला जातो.

विशिष्ट कंपनीला पात्र ठरवण्यासाठी आणि अन्य निविदाकारांना स्पर्धेतून बाहेर ठेवण्यासाठी ही अट घातल्याचे दिसत असल्याचा आरोप परब यांनी केला आहे.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या संस्थेच्या बांधकामाच्या टेंडरमध्ये अनावश्यक आणि स्पर्धेला प्रतिबंध करणाऱ्या अटींचा समावेश झाल्याचा आरोप करत, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Key Points

  • अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या बांधकामासाठी २५९ कोटींचे टेंडर

  • Speco Infrastructure L1 ठरल्यावर आमदार अनिल परब यांच्याकडून गैरव्यवहाराचा आरोप

  • Speco Infrastructure आणि RPS Infraprojects यांना लाभ होईल अशा अटी असल्याचा दावा

  • कलाकाराची पात्रता, पद्म पुरस्कार आणि MoU सादर करण्याच्या अटींवर आक्षेप

  • पल्स प्लाझ्मा तंत्रज्ञानाच्या अटीमुळे स्पर्धा मर्यादित झाल्याचा आरोप

  • SRA कडे सखोल चौकशी करण्याची मागणी