Covid Vaccine
Covid Vaccine  Tendernama
मराठवाडा

कोविड लसीकरण घोटाळ्याला जबाबदार कोण?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद महानगरपालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) अधिपत्त्याखाली असलेल्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये (Covid Care Center) कोविड प्रतिबंधक लसीचा (Covid Vaccination) घोटाळा समोर आला आहे. रजिस्टरवर खोटे आधारकार्ड (Addhar Card), मोबाईल नंबरच्या (Mobile Number) नोंदी करून पैसे घेत डॉक्टर व संगणक ऑपरेटरने हा घोटाळा केल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. लस घेतल्याचे भासवणे आणि कोविन ऍपवरही खोट्या नोंदी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. हे प्रकरण आता पोलिस दप्तरी पोहोचले असून, जवळपास 70 ते 80 डोसची तफावत आढळून आली असल्याने संपूर्ण दप्तर तपासणीचे काम सध्या सुरू आहे.

या प्रकरणी डॉ. कॅनेडी मथ्यू (रा. मुकुंदवाडी, औरंगाबाद) व महिला संगणक ऑपरेटर यांच्यावर एमआयडीसी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद महानगरपालिका तथा मेल्ट्रॉन कोविड सेंटर एमआयडीसी चिकलठाणा येथील महिला वैद्यकीय अधिकारी यांनी या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली आहे. त्यांनी पोलिसांना सांगितले की, कोविड सेंटरला कंत्राटी बेसवर डॉ. कॅनेडी मथ्यू व महिला संगणक ऑपरेटर हे दोघे दोन वर्षांपासून नेमणुकीस आहे.

तीन मार्च रोजी महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने कोविड सेंटरला नेहमीप्रमाणे भेट दिली. कोविड लसीकरण सेशन रजिस्टर महिला कर्मचारी या त्यांच्या हस्ताक्षरामध्ये लिहतात. महिला वैद्यकीय अधिकारी रजिस्टर चेक करत असाताना त्यात हस्ताक्षरामध्ये तफावत आढळली. महिला वैद्यकीय अधिकारी याबाबत विचारणा केली असता. सदर हस्ताक्षर हे महिला संगणक ऑपरेटर व डॉ. कॅनेडी मॅथ्यू यांचे असल्याचे इतर कर्मचाऱ्यांनी सांगितले.

त्यावेळी डॉ. कॅनेडी मॅथ्यू यांनी सांगितले की, सदर रजिस्टरमधील हस्ताक्षर माझे असून, ते मी महिला संगणक ऑपरेटरच्या सांगण्यावरून लिहलेले आहे, तर काही पेजेस वर मी स्वतः लिहलेले आहे. त्यामुळे महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांन महिला संगणक ऑपरेटरकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सदर रजिस्टर मधिल नोंद मी स्वतः माझ्या हस्ताक्षरामध्ये केलेली आहे.

अधिक विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की, रेकार्ड मेंन्टेन करण्यासाठी व लसीच्या रिपोर्टमध्ये तफावत येवू नये म्हणून महिला संगणक ऑपरेटर यांनी लसी नष्ट केल्या. कोविड लसीकरण सेशन रजिस्टरमध्ये मी माझ्या हस्ताक्षरात नोंदी घेवून लोकांचे चुकीचे मोबाईल नंबर व चुकीचे आधारकार्ड नंबरची रजिस्टरला नोंद केली.

लोकांना लस न देता संबंधित लोकांकडून पैसे घेवून त्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्यांचे नावापुढे कोविड लसीकरण डोस कंप्लिशन सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे. प्रत्यक्षात महिला संगणक ऑपरेटर यांचे काम डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून करण्याचे असून त्यांनी जाणून बुजून सेशन रजिस्टरमध्ये वेळोवेळी नावे टाकून त्या नावाच्या पुढे चुकीचे मोबाईल नंबर व चुकीचे आधारकार्ड नंबरची नोंदी केल्या आहेत.

डॉ. कॅनेडी व महिला संगणक ऑपरेटर यांनी कोविड लसीकरण सेशन रजिस्टरमध्ये घेतलेल्या नोंदी मधील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला आसता मोबाईल क्रमांक हे चुकीचे असल्याची खात्री पटल्याने कोविन ऍपवर जावून तपासणी केली असता त्यात फोन नंबरची तफावत आढळून आली. त्यावर जे नंबर होते त्यावर फोन लागत होता, परंतु ती लोकं उडवा-उडवीची उत्तरे देत होती. डॉ. कॅनेडी मॅथ्यू व महिला संगणक ऑपरेटर यांनी दोघांनी संगणमत करुन 70 ते 80 कोविड लसीकरण डोस कंप्लिशन सर्टीफिकेट दिलेले आढळून आले असल्याचे महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. यावरून डॉ. कॅनेडी मथ्यू व महिला संगणक ऑपरेटर यांच्यावर एम.आई.डी.सी. सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.