Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

संभाजीनगरातील फुटपाथवर कोण करतेय वसुली? खाजगी अन् सरकारी अतिक्रमणांनी पादचाऱ्यांची वाट बिकट

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील वाहतुकीचा खेळखंडोबा झालेला असतानाच फुटपाथची वाटही बिकट झाली आहे. विशेष म्हणजे खासगी अतिक्रमणाबरोबरच महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून कंत्राटदारानेच (Contractor) जाहिरातीचा गल्ला भरण्यासाठी मोक्याची जागा निश्चित करत फुटपाथवर बस थांबे बांधले आहेत.

कहर म्हणजे बस थांब्यांच्या बाजूने देखील मोठमोठी होर्डिंग्ज लावून रस्ते देखील बळकावले आहेत. त्यातच काही जुन्या बस थांब्यांवर इतरांनी कब्जा केला आहे. त्यामुळे अतिक्रमणावर अतिक्रमण झाल्याचे भन्नाट चित्र आहे.

दुसरीकडे सरकारी अनुदानातून आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून केलेल्या कोट्यवधींच्या फुटपाथवर आणि रस्त्यांवर हातगाड्यांनी आणि वाहनांनी कब्जा केला आहे. दुसरीकडे महानगरपालिका आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील रस्ते आणि फुटपाथच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी एक फिरते पथक तयार केले. मात्र, हे पथक बड्यांना अभय देत फक्त सर्वसामान्यांच्या दुचाक्या उचलत वसुली करत फिरत आहे. काही ठराविक ठिकाणीच या पथकाचा कमाईपुरता 'रोड शो' चालला आहे.

एकीकडे मनुष्यबळाचा तुटवडा असल्याचे तुणतुणे महानगरपालिका वाजवते... दुसरीकडे पोलिसांचेही सहकार्य आवश्यक असल्याचे अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख म्हणतात. महानगरपालिका केवळ सिडको कॅनाॅट प्लेस भागातच भरारी पथक नेमते.‌ परिणामी शहरात इतर मुख्य रस्त्यांवर पादचार्‍यांसाठी असणारे फुटपाथ आणि रस्तेच अतिक्रमणाच्या विळख्यात गायब झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना गर्दीचा, तर पादचार्‍यांना अपघाताचा धोका आहे.

पादचार्‍यांच्या सोयीसाठी व वाहतूक अबाधित राहावी यासाठी फुटपाथ उभारले जातात. महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांवर फुटपाथ निर्माण केले, पण काही दिवसांतच या बहुतांश फुटपाथवर अनेकांनी कब्जा केला. कुणी टपर्‍या टाकल्या, कुणी दुकाने थाटली, कुणी हॉटेल्स उभारले, तर अनेक ठिकाणी रिक्षा स्टँड निर्माण झाले. काहींनी बांधकाम साहित्य टाक ले, अनेक फुटपाथचा वापर वाहनांची र्पाकिंग म्हणून होत आहे.

हे कमी की काय, खुद्द महानगरपालिकेनेच तब्बल १५० फुटपाथवर स्मार्ट बस थांबे उभारले आहेत. विशेष म्हणजे या थांब्याचाही उपयोग होत नाही. कारण त्यात इतरांनीच अतिक्रमण केले आहे. एवढे होऊनही महानगरपालिकेचे फुटपाथवरील अतिक्रमणाकडे लक्ष नाही.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी तातडीने बैठक घेऊन कुठल्याही फुटपाथवर व रस्त्यांवर अतिक्रमण होऊ नये म्हणून स्वतंत्र व कायमस्वरूपी शहर वाहतूक शाखा व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते भरारी पथक स्थापन केले, पण प्रत्यक्षात हे पथक केवळ सिडको - सिडकोतील काही ठराविक रस्त्यांवर निशाना साधत केवळ सर्वसामान्य माणसांच्या दुचाकी उचलत वसुली करत या पथकाचे काम चालले आहे. प्रत्यक्षात अतिक्रमणधारकांनी कब्जात घेतलेले फुटपाथ, रस्ते तसेच आहेत. चमूने शहरातील प्रत्येक कोपर्‍यात जाऊन पाहणी केली तेव्हा बहुतांश फुटपाथची हीच अवस्था असल्याचे लक्षात आले.

अतिक्रमण हटाव विभागात मनुष्यबळ कमी

शहरातील फुटपाथचा श्वास मोकळा करण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागात पुरेसे मनुष्यबळ नाही. याउलट या पथकातील बरेच कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. 1988 नंतर नवीन नोकरभरती झालीच नाही. 18 लाख लोकसंख्येसाठी केवळ 15 लेबर, 4 इमारत निरीक्षक, 2 जुनाट वाहने, 4 कारकून, प्रशासकीय अधिकारी आणि एक विभागप्रमुख आहेत.

अतिरिक्त भार

आधीच कर्मचार्‍यांचा तुटवडा, त्यात अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुखांकडे अनेक विभागांचा अतिरिक्त भार आहे. नवीन व जुन्या शहरासाठी दोन प्रशासकीय अधिकारी आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडेही इतर पदांचा भार आहे. त्यामुळे शहरातील रस्ते व फुटपाथकडे फारसे लक्ष देत नाहीत, तर संपूर्ण शहरासाठी असलेल्या चार इमारत निरीक्षकांच्या खांद्यावर अनधिकृत बांधकामांचा भार खांद्यावर असल्याने शहरातील फुटपाथ दुर्लक्षित होत आहेत.

काय आहेत उपाय

फुटपाथ व रस्त्यांवरील अतिक्रमण व पुन्हा त्यावर कोणी कब्जा करू नये यावर देखरेख करण्यासाठी जुन्या व नव्या शहरात स्वतंत्र सहा भरारी पथके स्थापन करावीत.
- प्रत्येक पथकात पालिकेचे तीन कर्मचारी, एक पोलिस निरीक्षक व एक वाहन, असा ताफा असावा.
- हॉकर्स झोन उभारावा. शहरात शहानूरवाडी एकता चौकातील चौपाटीच्या धर्तीवर फुटपाथवर दुकानदारी थाटणार्‍यांसाठी हॉकर्स झोन उभारावेत, या झोनमध्ये दुकानदारी सुरू करण्याचा परवाना देण्यात यावा.
- घाटी परिसरात फूड प्लाझा उभारावा. अनेक वर्षांपासून शहरातील घाटी मार्गावर असलेल्या फुटपाथवर चहा-नाष्ट्याच्या टपर्‍या, फळविक्रेत्यांचे ठेले उभे आहेत; पण रुग्णांची यामुळे सोय होते. ग्राहक मिळत असल्याने गाडीवाले पुन्हा पुन्हा कब्जा करतात. त्यामुळे येथील फुटपाथचा श्वास मोकळा करण्यासाठी रुग्णालयाच्या आत फ्रुूट व फूड प्लाझा उभा करावा.
- शहरातील औरंगपुरा, सेव्हन हिल्स, सिडको बसस्थानक ते चिकलठाणा, सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट या मार्गावर मूर्तिकार, फुलझाडे विक्रेत्यांनी फुटपाथवर जागा कमी पडू लागल्याने रस्त्यावरच कब्जा केला आहे. त्यामुळे या लोकांसाठी पालिकेच्या ओस पडलेल्या भूखंडावर सोय करण्यात यावी.
- वॉर्डनिहाय समिती-शहरातील फुटपाथवर लक्ष ठेवण्यासाठी वॉर्डनिहाय एक समिती असावी, यात प्रत्येक प्रभागातील तीन जागरूक नागरिक, उपअभियंता, प्रभाग अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व पालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला समिती प्रमुख करावे.
- शहरातील प्रत्येक 15 मीटर रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथ असावेत. सात ते नऊ मीटर रस्त्यावर नसावेत.
- पुण्याचा घ्यावा आदर्श-पुण्यात सायकल ट्रॅक, दुचाकी, चारचाकी अशा विभागवार लेन आहेत. त्यायोग्य फुटपाथही उभारले आहेत. याची मात्र आपल्या शहरात उणीव आहे.
- वाहतूक शाखा आणि मनपाचा याबाबत योग्य समन्वय असावा.

या फुटपाथवर कब्जा
- जळगाव रस्ता ते हर्सूल टी पॉइंट
- घाटी मार्ग ते महेमूद दरवाजा
- एन-चार, राजे शिवछत्रपती महाविद्यालय ते कामगार चौक ते उच्च् न्यायालय
- सिडको बसस्थानक ते सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग कार्यालय
- सेव्हन हिल्स ते गजानन महाराज मंदिर मार्ग
- लक्ष्मण चावडी ते सिल्लेखाना चौक
- हेडगेवार रु ग्णालय ते गजानन मंदिर
- अमरप्रीत ते शहानूरवाडी एकता चौक
- महावीर चौक ते मध्यवर्ती बसस्थानक ते ज्युबली पार्क
- गोपाल टी ते स्टेशन मार्ग
- क्रांती चौक उड्डाणपूल ते अदालतरोड ते महाविर चौक
- सिडको जळगाव टी पाईंट ते जयभवानी नगर चौक