Road Work
Road Work Tendernama
मराठवाडा

महापालिकेचा कंबरतोड कारभार; खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचा विसर

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : प्रभागाचा विकास आणि नागरिकांच्या हिताची कामे, या नावाखाली गेल्या काही वर्षांपासून शहराच्या सर्व भागांत मोठ्या प्रमाणावर खोदाई सुरू आहे. या सर्व फोडाफोडीत मात्र छत्रपती संभाजीनगरकरांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.

कुठे ड्रेनेजलाइन बदलण्याचा कारभार सुरू असून, कुठे जलवाहिन्या टाकण्याचा, तर कुठे महावितरणची भूमिगत केबल टाकण्याचा, पोल आणि ट्रान्सफॉर्मर शिफ्टींगचा उद्योग सुरू आहे. या सर्व कामात जवळपास नव्यानेच केलेले कोट्यवधींचे चांगले रस्ते अन् फूटपाथ उखडून टाकले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे खांब रोवण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी फोडलेले दुभाजक देखील अद्याप दुरूस्त केलेले नाहीत.

खोदलेल्या कोट्यवधींच्या रस्त्यांची दुरूस्ती तर होतच नाही. या खोदकामा दरम्यान संबंधित विभागांच्या कारभाऱ्यांचा असमन्वय नडतो. खोदकामासाठी परवानगी देणारी पालिकेतील यंत्रणा देखील कुंभकर्णी झोपेत असते. यासंदर्भात काही ठेकेदारांना प्रतिनिधीने विचारणा केली असता खोदकामासाठी रस्ता दुरूस्ती शुल्क आम्ही भरलेले असते. आमच्या पैशाचे काय केले, असा उलट सवाल करत पालिकेलाच विचारा, असे त्यांनी अजब उत्तर दिले.

केंद्र सरकारने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून १५ कोटी रुपये खर्च करून शहरातील मुख्य बाजारपेठ आणि वर्दळीचे चौक तसेच मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे पोल, ट्रान्सफॉर्मर शिफ्टींगचे तसेच ओव्हरहेड केबल भूमिगत करायचे काम सुरू केले आहे. या कामाचा ठेका महेंद्र नरवडे यांना देण्यात आला आहे. 

मागील महिन्याभरापासून यासाठी चिकलठाणा ते बाबा पेट्रोलपंप दरम्यान अनेक चौकात खोदकाम करून ही कामे करण्यात आली. महापालिकेमार्फत होत असलेल्या या कामावर महावितरणची सुपरव्हीजनची जबाबदारी आहे. खोदकामानंतर संबंधित ठेकेदाराकडून रस्ते दुरूस्तीची जबाबदारी महापालिकेच्या प्रभाग अभियंत्यांवर टाकण्यात आली आहे. मात्र सेव्हन हील, एपीआय क्वार्नर, आकाशवाणी, दुध डेअरी सिंग्नल, पतीयाला बॅंक गारखेडा, सहकारमंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर पुंडलीकनगर रोड, गजानन मंदिर चौक, उस्माणपुरा, महावीरचौक, मिल काॅर्नर, सिडको एन - ५ एसबीआय चौकात काम झाल्यावर कुठेही दुरूस्ती केली नसल्याने छत्रपती संभाजीनगरकरांवर कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.