छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको एन-५ टाउनसेंटर परिसरातील सविताराज अपार्टमेंट ते वसंतराव नाईक महाविद्यालय या रस्त्यावर गेल्या दहा वर्षापासून कचरा साठलेला आहे. अनेक पावसाळे खाल्लेल्या या कचऱ्याच्या दुर्गंधीने पार कॅनाट परिसरासह नाईक महाविद्यालयाच्या वर्गखोल्यांना घेरलेले आहे. शहरात दोन दिवसापूर्वीच वरून राजाचे आगमन झाल्याने परिसरात साथरोगाची दहशत पसरलेली आहे.
सहकारमंत्री तथा पूर्व मतदार संघाचे आमदार अतुल सावे यांच्या स्थानिक विकास निधीतून अग्रसेन भवन ते जालनारोड निम्म्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले. त्याचवेळी त्यांनी सविताराज अपार्टमेंट ते अग्रसेन भवन या रस्त्याचे देखील काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र कचराडेपो हटविण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने रस्त्याचे काम अर्धवट राहीले. त्यामुळे या रस्त्याला कुणी वाली आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले आहे. दोन दिवसांपूर्वी प्रतिनिधीने महापालिका प्रशासकांकडे कचरपट्टीत अडकलेल्या या रस्त्याबाबत सचित्र तक्रार केली होती. त्यानंतर प्रभाग अभियंत्यांना विचारले असता या रस्त्याबाबत कोणतीही सूचना वरिष्ठांकडून प्राप्त झाली नाही, मी रस्त्याची पाहणी करून वरिस्ठांना अंदाजपत्रक पाठवत असल्याची नेहमीप्रमाणे ग्वाही त्यांनी दिली.
प्रकल्प जुने श्रेयवादासाठी लोकप्रतिनिधींच्या खिश्यातच कैची
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ३१७ कोटीतील १११ रस्त्यांचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. यातील उर्वरीत रस्त्यांची माहिती घेऊन लोकप्रतिनीधी श्रेयवादासाठी राजकारण करत उद्घाटने करण्यासाठी भाऊदादांचा लवाजमा गोळा करत खिशात कैची घेऊन फिरत आहे. जुन्याच योजनेतील कामांचे एकत्रित उद्घाटन झाल्यानंतर आता एक-एक रस्त्याचे उद्घाटन करत आहेत. हीच बाब जीव्हीपीआर या ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या वाढीव पाणी पुरवठ्याबाबत सुरू आहे. याहीपुढे ही योजनाच आम्ही आणल्याचे म्हणत श्रेय लाटण्यासाठी कामांवर जत्रा भरवली जात आहे. मात्र या गलिच्छ राजकारणात नाहक गोर गरिबांना आपला जीव गमवावा लागत आहे. स्मार्ट सिटीतील कॅनाॅटसारख्या गजबजलेल्या भागात कचरापट्टीत अडकलेल्या या रस्त्याबद्दल याभागातील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे. नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
प्रशासकांचा केवळ 'दंड' बैठकांवर जोर
बुधवारी 'टेडरनामा' प्रतिनिधी येथील नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार पाहणी करण्यासाठी गेले असता कचरपट्टी झालेल्या रस्त्याकडे बोट दाखवत नवनियुक्त महापालिका प्रशासकांचा केवळ 'दंड' बैठकांवर जोर आहे, केवळ आदेशांची फायरिंग सुरू आहे, प्रत्यक्षात ग्राउंड कनेक्टीव्ही त्यांच्या कामात दिसत नसल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. आठ दिवसात येथील रस्त्यावरील कचरा हटवून डांबरीकरण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या दहावर्षांपासून रस्त्याची ही अवस्था आहे.
दरम्यान याच रस्त्याला लागुन अनेक रस्त्यांची कामे केली गेली. मात्र वसंतराव नाईक महाविद्यालय ते जालनारोड या रस्त्याकडे महापालिकेने कानाडोळा केला.महापालिका बांधकाम विभागाचे सुस्त अधिकारी शांतपणे हे सर्व चित्र पाहत आहेत. महापालिका बांधकाम विभागाचा एकही अधिकारी याबाबत संवेदनशील नाही, यारस्त्याबाबत अधिकाऱ्यांनी पायघड्या टाकल्याचे चित्र या रस्त्यावरून पहावयास मिळत आहे. सध्या या रस्त्याचे निम्मे काम सहकारमंत्री तथा आमदार अतुल सावे यांच्या निधीतून झाले आहे. महापालिकेने कचरा न हटवल्याने निम्म्या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. अपूर्ण कामांच्या ठिकाणी रस्त्यावर २५ हातगाड्या भरतील इतक्या कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. दुर्ग॔धीमुळे तर ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. परिणामी साथरोगाचे बळी पडून जीव गमावण्याची शंक्यता नाकारता येत नाही. तरीही महापालिका बांधकाम विभागाचे अधिकारी या गोष्टींकडे कानाडोळा करत आहे. शहराचे आजी- माजी आमदार,खासदार, मंत्री, नगरसेवक याच रस्त्याने ये-जा करतात मात्र रस्त्यासंदर्भात ते महापालिका बांधकाम विभागाला जाब विचारत नाहीत. यामुळे नागरिकांचा मोठा असंतोष पाहण्यात आजी-माजी लोकप्रतिनिधी मश्गुल झाल्याचे दिसत आहे.