Ambadas Danve Tendernama
मराठवाडा

Ambadas Danve : मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसाठी अर्थसंकल्पात नाही तरतूद

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्याच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसाठी काहीच तरतूद करण्यात आलेली नाही. सत्ताधाऱ्यांचे मराठवाड्यावर हे अन्यायकारक धोरण असल्याची टीका राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली. विरोधी पक्षनेत्याच्या २६० अन्वये प्रस्तावावर ते आपली भूमिका मांडत होते.

सत्ताधारी पक्षाने मराठवाडा वॉटरग्रीड योजनेची घोषणा फक्त कागदावरच ठेवली असून तिच्या पूर्ततेसाठी प्रत्यक्षात यासाठी काहीच निधी देण्यात आला नाही. पश्चिम वाहिन्यातीलील समुद्रात जाणारे २३ टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. कोणाच्या चोरीचे पाणी मराठवाडा घेत नसून वाया जाणाऱ्या पाण्याद्वारे आम्ही आमची तहान भागवणार, असल्याचे भावोद्गार दानवे यांनी काढले. मराठवाड्याला हक्काचे पाणी कधी मिळेल याची शाश्वती नाही. सत्ताधारी पक्ष वॉटरग्रीड योजनेबाबत खूप काही बोलत असले तरीही आतापर्यंत या योजनेची एक वीटही लागली नाही. १६ सप्टेंबर २०२३ रोजी संभाजी नगरात येथे पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत वॉटर ग्रीड योजनेबाबत मोठी घोषणा केली होती. त्या बैठकीत घोषित केलेल्या संपूर्ण घोषणांचा अर्थसंकल्पात राज्य शासनास विसर पडला असल्याची टिका अंबादास दानवे यांनी केली.

राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या मेरी संस्थेने मराठवाड्यातील १३ टक्के पाणी कपात करण्याचा अहवाल दिला आहे. समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नगर आणि नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्याला पाणी सोडण्याची तरतूद आहे. हे हक्काचे पाणी आम्हाला मिळाले नाही तर मराठवाड्यातील जनता यास विरोध करेल, अशी भावना व्यक्त करत शासनाची मेरी संस्था सुद्धा मराठवाड्यावर अन्याय करत असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला. मराठवाड्याला आवश्यक आणि मुबलक निधी मिळत नसल्याची येथील जनतेच्या मनात भावना निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.