sambhajinagar
sambhajinagar tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : 'त्या' धोकादायक उड्डाणपुलावरील नव्या रिफ्लेक्टरवर कोणी लावले कट आऊट्स?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : गॅस गळती प्रकरणानंतर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी रस्त्याच्या तांत्रिक दोषांवर बोट ठेवत उड्डाणपुलावर अशा घटना घडू नये यासाठी उड्डाणपुलांचे कठडे, दुभाजकात आणि दिशादर्शक फलक व रिफ्क्लेक्टरवर होर्डिंग, कट आऊट्स व पोस्टर उभारणीवर टाच आणण्याची घोषणा केली होती. दरम्यान मुंबईच्या प्रो ॲक्टिव्ह कंपनीच्या कंत्राटदारांची कान उघाडणी केली. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच मंगळवारी (ता. ५) रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेनिमित्त येणाऱ्या विविध मान्यवरांच्या स्वागतासाठी चिकलठाणा विमानतळ ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानापर्यंत शहरभर मोठमोठे होर्डिंग्ज आणि पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

यात चक्क गॅसगळती प्रकरणानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिडको उड्डाणपुलावर नव्यानेच लावलेल्या रिफ्क्लेक्टरवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे कट आऊट्स लावल्याने रिफ्क्लेक्टर झाकले गेले आहेत. मात्र या गंभीर प्रकारावर आता प्रशासक जी. श्रीकांत यांनी मौन पाळल्याचे दिसून येत आहे.

गत महिन्यात सिडको उड्डाणपुलाच्या चढावरील कठड्याला धडक दिल्याने १८ ते २० टनाने भरलेला एलपीजी गॅसचा १२ टायरचा ट्रक पलटी झाला आणि गॅस गळती सुरू झाली. दरम्यान दुभाजकाच्या बाजुलाच एका कंत्राटदाराने दुभाजकात होर्डिंग्जसाठी खड्डा खोदून त्याची माती रस्त्यावर पसरलेली होती. रस्त्याच्या या तांत्रिक दोषाकडे बोट दाखवत महानगरपालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर अशी घटना घडू नये,  म्हणून काही उपाययोजना  करण्यासाठी समिती नेमली. त्यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्यावतीने मुंबईच्या प्रो ॲक्टिव्ह कंपनीला शहरातील दुभाजकात होर्डिंग्ज लावण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. कंपनीने ज्या ठिकाणी ट्रक पलटी झाला त्याच्या शेजारीच चार दिवसांपासून दुभाजकात पाच फुटाचा खड्डा उकरलेला होता. उकरलेली माती रस्त्याच्या दोन्ही बाजुला तशीच टाकून कंत्राटदाराची यंत्रणा पसार झाली होती.

सिडको उड्डाणपुलाच्या अलिकडेच जालना रोडवर दुभाजकात होर्डिंग उभारण्यासाठी कंत्राटदाराने उकरलेला खड्डा व या खड्ड्याच्या बाजुला अस्ताव्यस्त रस्त्यावर पसरलेला मातीचा ढिगारा वाचविण्यासाठी  गॅस टँकर चालक डाव्या बाजूने जात असताना अपघात झाला. हा मुद्दा उपस्थित करत कंत्राटदाराच्या हलगर्जीपणावर प्रशासकांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या  गंभीर घटनेला जबाबदार असलेल्या प्रो ॲक्टिव्ह कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोलावून प्रशासक जी. श्रीकांत यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती.

दरम्यान, कंपनीला तूर्त रस्त्यावर पसरलेले मातीचे ढिगारे उचला, खड्ड्याच्या दोन्ही बाजूने सावधानतेचा इशारा देणारे फलक लावा व होर्डिंगचे काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले होते. याशिवाय प्रमुख रस्ते, उड्डाणपुलाचे कठडे, दुभाजकात व पथदिव्यांचे व महावितरणचे खांब दिशादर्शक फलक यावर कुठेही होर्डिंग, कट आऊट्स, पोस्टर उभारणी करता येणार नाही, अशी तंबीही अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र अमित शहा यांच्या सभेच्या स्वागतासाठी शहरातील सर्वच उड्डाणपूलांवर, रस्त्यांवर न्यायालयाचे निर्देश धाब्यावर बसवत भाजपकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

धक्कादायक म्हणजे सिडको उड्डाणपुलावर गॅस गळती प्रकरणानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाच्या उतारावर लावलेल्या रिफ्क्लेक्टरवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे कट आऊट्स लावल्याने रिफ्क्लेक्टर झाकले गेले आहे. यावर सर्वच यंत्रणा मौन बाळगून आहेत.