Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : साहेब, पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकरांचा जीव घेणार का?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगरकरांना शहर पाणी पुरवठा प्रकल्पांतर्गत समान पाणीवाटपासाठी महानगरपालिका ‘२४ X ७’ योजना राबवत आहे. यासाठी शहरात विविध ठिकाणी प्रस्तावित मुख्य शुध्द गुरूत्व वाहिनी व वितरण वाहिनी टाकण्यासाठी संपूर्ण शहरात खोदकाम करण्यात येत आहे. यापूर्वी रस्ते खोदून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र वर्षभरानंतर देखील संबंधित कंत्राटदाराकडून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. आता पुन्हा १४०० व १३०० मी.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. यात नव्यानेच केलेल्या सिमेंट रस्त्यांची तोडफोड करण्यात येत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे सरकारी अनुदानातून तब्बल ३५ कोटी रुपये खर्च करून तयार केलेला शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग ते वाणी मंगल कार्यालय ते नेहरू काॅलेज ते शौर्यचौक ते गोकूळ स्वीट शहरातील या रिंगरोडच्या मधोमध खोदकाम करून रस्त्याची वाट लावण्याचे काम कंत्राटदार करत आहे. कंत्राटदाराच्या मनमानी खोदकामाकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक व मुख्य अभियंता तसेच महानगरपालिका प्रशासक, प्रकल्प समन्वयक, सल्लागार तसेच मुळ कंत्राटदारांसह शहर वाहतूक शाखेचे अजिबात लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना समान पाणीवाटपासाठी केंद्र सरकारच्या अमृत - २ योजनेंतर्गत महानगरपालिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत ‘२४ X ७’ योजना राबवत आहे. या कामाचे कंत्राट मे. जीव्हीपीआर इंजिनिअर्स लि. कंपनीला देण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा प्रकल्पांतर्गत शहरात विविध ठिकाणी प्रस्तावित मुख्य शुद्ध गुरूत्व वाहिनी व वितरण वाहिनी टाकण्यासाठी शहरातील सर्वच रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. मात्र पाईपलाईन टाकल्यानंतर वर्ष उलटून गेल्यानंतरही कंत्राटदाराकडून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी या तोडफोड झालेल्या रस्त्यांच्या किनारपट्टीवरून वाहतूक कोंडी होत असून अपघात वाढले आहेत. त्यामुळे जलवाहिनीचे काम झाल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करावी आणि नागरिकांचा जीव वाचवावा या मागणीसाठी आता छत्रपती संभाजीनगरकरांनी कंत्राटदारांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला आहे.

शहरातील शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगलगत वाणी मंगल कार्यालय ते नेहरू काॅलेज ते शौर्यचौक ते गोकूळ स्वीट हा रस्ता जालनारोड ते बीड बायपास देवळाई चौकाला जोडला आहे. सिडको - हडकोसह गारखेडा मुकुंदवाडी परिसरातील नागरिकांना सातारा, देवळाई, बीड बायपास, पैठणरोडकडे जाण्यासाठी नागरिकांना हा रस्ता सोयीचा आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने वाहतूक कोंडी सातत्याने होत असते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्तांकडून परवानगी घेऊन रस्त्त्याच्या डाव्या बाजूला १४०० मी.मी. व उजव्या बाजूला १३०० मी.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू केले आहे. गेल्या वर्षभरापूर्वी सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कांचनवाडी ते सातारा व देवळाई हद्दीत रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. जालनारोडवरील कॅम्ब्रिज चौक ते नगरनाका ते कॅम्ब्रिज चौक रस्ताही खोदण्यात आला. पाईपलाईन टाकण्यात आली. त्यानंतर त्यावर खोदकामादरम्यान उकरलेली माती टाकली जाते.

मुळात सिमेंट रस्ता असेल तर सिमेंटीकरण, डांबरी रस्ता असेल तर डांबरीकरण करणे व पेव्हर ब्लॉकच्या जागी पेव्हर ब्लॉक बसविणे अपेक्षित आहे. मात्र कंत्राटदाराकडून दुरुस्तीचे कोणतेही काम होत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात शहरात जीव्हीपीआरच्या खोदकामामुळे बारा लोकांचा बळी गेला आहे. अनेक अपघात या रस्त्यांवर झाले आहेत. दररोज सातत्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. अपघातात बळी गेल्यानंतर देखील कंत्राटदारांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगरपालिका व शहर वाहतूक शाखा लक्ष द्यायला तयार नाही.

जलवाहिनीचे काम झाल्यानंतर रस्त्यांचे काम पूर्ण करावे यासाठी त्या-त्या भागातील नागरिक, प्रवासी, व्यापारी  महानगरपालिका प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत. महानगरपालिका प्रशासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे बोट दाखवत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण रस्ते हवेत की पाणी म्हणत काम झाल्यानंतर दुरूस्तीचे आश्वासन देते. टेंडरमध्ये तरतूद असल्याचे सांगते. प्रत्यक्षात रस्त्या़ंची दुरूस्ती केली जात नाही. शहरभरातील जलवाहिनीसाठी खोदलेले रस्ते वर्षं दीड वर्षांनंतरही दुरूस्त केलेले नाहीत. यासंदर्भात शहरातील कोणताही राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी खड्डेमय रस्त्यांबाबत ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. सगळ्यांचेच खिसे गरम झाल्याने जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील नागरिकांना याचा चांगलाच त्रास होत असून त्यांची "दोन्ही घरचा पाहुणा उपाशी " अशी गत झाल्याचे टेंडरनामा पाहणीत दिसून येत आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर पाणी पुरवठा प्रकल्पांतर्गत पाण्याच्या पाईपलाईनचे काम करण्यासाठी रस्ता खोदण्यासाठी शहरवासीयांचा विरोध अजिबात नाही. मात्र काम झाल्यानंतर कंत्राटदाराकडून रस्ता बुजवण्यासाठी उकरलेली मातीच टाकली जाते. रस्ते पूर्ववत केले जात नाहीत. डांबरीकरण, सिमेंटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविले जात नाहीत. उकरलेली माती टाकून खोदकामावर उंचवटे तयार केले जात आहेत. कंत्राटदाराच्या या चालुगिरीला शहरवासीयांचा विरोध आहे. कंत्राटदाराच्या अशा चालबाजपणामुळे दुचाकींचा घसरून अपघात होत आहे. काम पूर्ण होताच रस्त्याचे काम करून दिले जाईल, असे खोदकाम करणारा उप कंत्राटदार नागरिकांना सांगतो. मात्र काम झाल्यानंतर यंत्रणा पसार करतो. दुसरीकडे तक्रार केली असता, जीव्हीपीआरचा प्रकल्प व्यवस्थापक 'तुम्ही सरकारी कामामध्ये अडथळा आणू नये अन्यथा तुमच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल' असा दम देत आहे.

ज्या रस्त्यांवरून पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्या प्रत्येक रस्त्यांवर शहरात नागरिक, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांत वादावादी सुरू आहे. कंत्राटदार रस्ता खोदून पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू करताच नागरिक काम अडवतात. तेव्हा काम चालू करण्यापुर्ते उप कंत्राटदार नव्याने रस्ता दुरूस्तीचे आश्वासन देतो. मात्र काम झाल्यानंतर दुरुस्तीचे काम न करताच निघून जातो. रस्ते दुरुस्तीसाठी महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. जेमतेम सरकारी अनुदानातून रस्त्यांची कामे झालीत. तिजोरीत दमडी नसल्याने महानगपालिकेने स्मार्ट सिटी बसेसच्या देखभाल दुरुस्तीसाठी राखून ठेवलेल्या दोनशे कोटींची एफडी मोडली. आता शहरभर जवळपास सर्वच रस्ते खराब होत असल्याने दुरूस्तीसाठी एक हजार कोटी रुपये लागतील. महानगरपालिका इतका निधी कोठून आणणार, शहरवासीयांचा प्रवास कसा सुखकर करणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.