Satara - Devlai Road Sambhajinagar
Satara - Devlai Road Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

CS: सातारा - देवळाईकरांच्या रस्त्यांची कोणी लागली वाट?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) : शहरात समावेश झालेल्या सातारा - देवळाईकरांच्या महसुलातून महापालिकेला दोनशे कोटीहून अधिक महसूल प्राप्त झाला आहे. मात्र याभागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात वाट लागली आहे. घरातून निघताच घाण पाण्यातून वाट काढावी लागत आहे. यातच संग्रामनगर सदोष उड्डाणपुलाची चूक झाकण्यासाठी अंडरपासच्या खालून रस्ते खोदून उंची वाढविण्याचा घाट रचला जात असल्याने गत महिन्याभरापासून देवानगरी उड्डाणपुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. येथील रहिवाशांसाठी दिलेल्या पर्यायी रस्त्यांची देखील कशी वाट लागली आहे, त्याचा हा खास रिपोर्ट!

सातारा गावठाणातून रेल्वे स्टेशन एमआयडीसी ते फूलेनगर रेल्वेगेट ते नागसेननगर - कबीरनगर - मिलिंदनगर - एकनाथनगरकडून उस्मानपुरा रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या जुना सातारा गावठाण रस्ता अत्यंत विदारक झाला असून आजूबाजूच्या गटारींचे घाण पाणी या रस्त्यावर येत आहे. यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून, या रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दररोज दुचाकीस्वार व नागरिक या गटारीच्या घाण पाण्यात पडून अपघातग्रस्त होत आहेत.

या रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून आरोग्यासही अपायकारक परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी संबंधित महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरात साडेचारशे कोटीची भूमिगत गटार योजना राबवली असता फुलेनगर रेल्वे गेट ते उद्योग निर्माण अपार्टमेंटलगत रस्त्यातील नळकांडी पुलावरून सांडपाणी वाहत आहे. धक्कादायक म्हणजे नाल्यातील पाणी वाहून जाण्यासाठी पाइपावर पाइप ठेवण्याचा अजब जुगाड केला गेला आहे.

फुलेनगर, नागसेननगर - मिलिंदनगर - कबीरनगर या भागातील सार्वजनिक गटारी स्वच्छ करण्याची जबाबदारी महानगरपालिका वार्ड अभियंता कार्यालयाची असताना याकडे चाल ढकल होत आहे, याच अरूंद रस्त्यावर गटारी ओव्हरफ्लो होऊन मैला वाहत असतो. सदर  रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - २११ धुळे - सोलापूर अर्थात बीड बायपासला येऊन मिळतो.  संग्रामनगर अंडरबायपासचे काम चालू असताना या पर्यायी रस्त्यात देखील फुलेनगर रेल्वे गेट क्रमांक ५३ येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

रस्ता क्रमांक : २

सातारा - देवळाईकरांना दरम्यान कमलनयन बजाज हाॅस्पीटल ते फुलेनगर रेल्वेगेट ते उस्मानपुरा हा पर्यायी रस्ता देण्यात आला आहे. मात्र यासाठी दहा ते बारा किलोमीटरचा फेरा काढून पुन्हा खाच खळण्यातून वाहनांची आदळ आपट करत सातारा देवळाईकरांना प्रवास करावा लागत आहे.

रस्ता क्रमांक : ३

पैठणरोड जंक्शन ते रेल्वेस्टेशन उड्डाणपुल ते स्टेशनरोड हाॅटेल वीट्स ते भाजीवाला चौक प्रतापगडनगर ते एकता चौक शहानुरवाडी - शिवाजीनगर ते देवळाई चौक मुळात इतका मोठा पल्ला गाठायला सातारा - देवळाईकरांना इंधनाचा मोठा खर्च सोसावा लागत आहे.

दरम्यान एकीकडे संग्रामनगर अंडरब्रीजचे काम चालू असताना प्रतापगडनगर ते एकता चौक रस्त्याचे तीन तीन महिन्यांपासून रखडल्याने इकडे सातारा - देवळाईकरांची कोंडी करण्यात आली आहे. दुसरीकडे एक महिन्याची मुदत असताना सार्वजनिक बांधकाम विभागातील जागतिक बॅंक प्रकल्प शाखेच्या कारभाऱ्यांनी ठेकेदार जीएनआय कंन्सट्रक्शनकडून मुदतीत काम करून घेतले नाही. आता पुन्हा दहा दिवसाची मुदत वाढविण्यात आल्याने सातारा - देवळाईकरांच्या हाल अपेष्टात वाढ झाली आहे.

शहराशी संपर्क करण्यासाठी मधोमध लोहमार्गाचा अडथळा, शिवाजीनगर, फुलेनगर, बीड बायपास ते बाळापूर - मुकुंदवाडी रस्त्याची वाट लागलेली असून तिथेही रेल्वे फाटकाची कोंडी, अशा मनस्थितीत अडकलेल्या सातारा - देवळाईकरांचा शनिवारी संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी थेट संग्रामनगर उड्डाणपुलावर टाकलेले ढिगारे फेकत वाट मोकळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी पुन्हा पोलिसबळाचा वापर करून रस्ता बंद केला.

ठेकेदाराचा हलगर्जीपणा, अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आणि सेवेला तत्पर असणाऱ्या पोलिस प्रशासनामुळे या भागातील रूग्ण, विद्यार्थी, कामगार, शेतकरी आणि फिरते व्यापारी असे सारेच अडचणीत आले आहेत.