Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : पावसाळा तोंडावर; महापालिका प्रशासनाला जाग कधी येणार?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरात पावसाळ्यात भूमिगत उघड्या गटारीत पडून बळी गेल्यानंतरही महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग येताना दिसत नाही.

शहरातील मुकुंदवाडी चौकात नेहमीच ट्राफिक जाम होत असते. त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी ५० लाख रुपये खर्च करून जालनारोड लगत सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. जालनारोड आणि सर्व्हिस रस्त्याच्या मधोमध असलेल्या गटारीवरील ढापा गायब झाला आणि त्या मोकळ्या गटारीत काल दोन युवक मोटरसायकल सह पडले. सदर अपघात हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व महानगरपालिकेच्या दुर्लक्षाने झाला असून आता किती लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागतो, ते पाहणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेला जाग कधी येणार, असा संतप्त प्रश्न नागरीकांनी उपस्थित केला आहे.

दुर्घटनेनंतर युवकांना गटारीबाहेर काढण्यासाठी परिसरातील रहिवाशी सरसावले आणि दुचाकीही बाहेर काढण्यात आली. दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पण नशीब बलवत्तर युवकांना दुखापत झाली नाही.

महानगरपालिकेने मुकुंदवाडी चौकातील सर्व्हिस रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण केले. नगरविकास विभागाने शहरातील पायाभूत सुविधांसाठी दिलेल्या निधीतून ५० लाख रुपये खर्च करून रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण केले. मात्र सकाळ संध्याकाळ या रस्त्यावर बेकायदा वाहनतळ केल्याने वाहनचालकांना कुठलाही फायदा झाला नाही.‌ त्यात दोन्ही रस्त्याच्या मधोमध गटारावरील ढापे गायब झाल्याने अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.‌

गेल्या अनेक महिन्यापासून भूमिगत गटारावर ढापे टाकण्याचे काम खोळंबले आहे. या ठिकाणी दिवसातून दहा वेळा वाहतुकीची कोंडी होते. दुचाकीस्वारांसह इतर वाहनांचा जबरदस्त खोळंबा येथे होतो. त्यात मुख्य वर्दळीच्या रस्त्याच्या शेजारीच उघडी गटार आजूबाजूला दगड, माती आणि वाढती ट्राफिक यामुळे येथे नेहमीच अपघात ही होत असतात.

ही वाहतुकीची कोंडी ह्या दोन युवकांच्या जीवावर उठली होती. यावर कायमस्वरूपी मार्ग निघणे आवश्यक आहे. सदर गटारीवर तत्काल ढापे टाकून संभाव्य अपघाताचा धोका टाळावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

पावसाळ्यात किंवा इतरवेळी पोट गटारी तुंबतात त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. या अपघातास महानगरपालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन अधिक कारणीभूत असून पावसाळ्यापूर्वी मुकुंदवाडी चौक, जालनारोड प्रमाणेच शहरातील सर्व भूमिगत गटारांचे सर्वेक्षण करून ढापे टाकण्याचे काम युद्ध पातळीवर करून ताबडतोब ह्या भागातील रस्त्यावरील कचरा बाजूला करणे, रस्ता मोकळा करणे, गटारीवर ढापे टाकणे आवश्यक आहे. या अपघातानंतर तरी प्रशासन जागे होईल का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.