Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : नागरिकांनी अडवलेल्या जलवाहिनीचा प्रश्न अखेर सुटला; पोलिस बंदोबस्तात...

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील ज्युबलीपार्क परिसरातील आसेफिया काॅलनी व जयभिमनगर भागातील छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत प्रस्तावित सर्व व्यासांचे एच. डी. पि. ई. वितरण वाहिणीच्या जलवाहिनी टाकण्याचा प्रश्न अखेर सुटला. संबंधित प्रकरणात पोलिस आयुक्तांनी दखल घेतल्याने हे प्रकरण मिटले. अनेक दिवसांपासून हे काम रखडले होते. यासंदर्भात मजीप्राचे कार्यकारी अभियंता दि. ह. कोळी यांनी पोलिस आयुक्त, महापालिकेचे शहर व कार्यकारी अभियंता व इतरांशी  वेळोवेळी पत्रव्यवहार करून या कामासाठी परवानगी मिळवली. हे काम मार्गी लागल्यानंतर या भागातील नागरिकांना लवकरच नवीन टाकीतून पुरेसे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होईल.

छत्रपती संभाजीनगरातील वार्ड क्रमांक २० अंतर्गत आसेफिया काॅलनी मधील सलीम कुरेशी गल्ली, पठाणी आपा गल्ली, एजासभाई यांच्या घरापासून ते अतीक किराणापर्यंत व असलम ढोबी यांच्या घरापासून ते बाबा यांच्या घरापर्यंत तसेच अय्युब भाई रिक्षाचालक ते तन्वीर शाळेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत २७४० कोटी रूपयाच्या योजनेतून हायड्रॉलिक डिझाईन प्रमाणे जलवाहिनी टाकण्यासाठी माजी नगरसेवक सय्यद मतीन यांनी ५ सप्टेंबर २०२२ रोजी महापालिकेचे शहर अभियंता व पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करत शहर अभियंत्यांच्या आदेशाने महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्यांना उपरोक्त ठिकाणी जलवाहिनी टाकण्यासाठी २४ नोव्हेंबर २०२२ रोजी परवानगी देण्यात आली होती. मात्र परवानगी देऊन दोन वर्ष उलटल्यानंतरही जलवाहिनी काम रखडले होते. या भागातील काही स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवल्याने मजीप्राला जलवाहिनी टाकण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. या भागातील पाणीप्रश्न गंभीर असून त्यासाठी नवीन जलवाहिनी टाकणे आवश्यक होते. प्रभागातील माजी नगरसेवक सय्यद मतीन यांनी त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्यानी गंभीर पाऊल उचलले.

छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी पुरवठा प्रकल्पाचे टेंडरनुसार शहरातील विविध ठिकाणी गुरूत्व व वितरण वाहिनी टाकण्यासाठी पोलिस आयुक्तांना विनंती केली. दरम्यान याच पाणी पुरवठा योजनेंतर्गत शहरातील विविध भागात डी. आय. व एच. डी. पि. ई. पाईपलाईन अंथरण्याचे काम सद्यस्थितीत प्रगतीपथावर असल्याचे कळवत मजीप्राचे उप विभागीय अधिकारी, उप विभाग क्रमांक-२ यांचे १ डिसेंबर २०२३ चे पत्र व मजीप्राचे कार्यकारी अभियंता यांचे ११ डिसेंबर २०२३ चे पत्र तसेच फोट्रेस व यश सोल्युशन जे.व्ही. यांचे २ जानेवारी २०२४ च्या पत्रांचा संदर्भ जोडत आसेफिया काॅलनी व जयभिमनगर भागाच्या स्थळपाहणी दरम्यान छत्रपती संभाजीनगर नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत टेंडरनुसार सर्व व्यासांचे एच. डी. पि. ई. वितरण वाहिनीचे काम करण्यास स्थानिक नागरिकांनी जलवाहिनी टाकण्यासाठी विरोध दर्शवल्याचे कळवले. मंजूर टेंडरनुसार या परिसरात वितरण वाहिन्या टाकून नागरिकांसाठी मंजुर नळ जोडणी व प्रस्तावित जलवाहिनी स्थलांतरित करावयाच्या असल्याचे कळवत या कामाला परिसरातील काही स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवल्याने काम रखडल्याचेही पत्रात नमूद केले. दरम्यान याकामासाठी पोलिस विभागाच्या परवानगीशिवाय मजीप्राला जलवाहिनीचे काम करत येत नव्हते. त्यामुळे मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्यांनी स्वत: या कामात लक्ष घातले. जलवाहिनीच्या कामासाठी परवानगी मिळावी, यासाठी पोलिस आयुक्तांशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला. प्रत्यक्ष भेटून जलवाहिनी टाकणे आवश्यक असल्याचे सांगितले. अखेर पोलिस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत मजीप्राला सिटी चौक, क्रांती चौक, छावणी, वेदांत नगर , एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यांतर्गत ५ पोलिस उपनिरीक्षक,२५ पुरूष अंमलदार , १० महिला अंमलदार व एक कॅमेरामन दिला. प्रचंड पोलिस बंदोबस्तात ३० जानेवारी २०२४ रोजी जलवाहिनीचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे गत दोन वर्षांपासून पासून रखडलेले हे काम मार्गी लागले आहे.