Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : आरोग्यकेंद्रांना येणार अच्छे दिन; निधीमुळे पालटले रूपडे

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील प्राथमिक व मुख्य आरोग्यकेंद्रांच्या इमारतीला गळती लागली होती. त्यामुळे छतामधून गळणाऱ्या पावसातच रुग्णांवर उपचार करावे लागत असत. "टेंडरनामा"ने दुरावस्थेत असलेल्या आरोग्यकेंद्रांवर सातत्याने प्रहार केला. त्यानंतर महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी शहरातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्र व ६ मुख्य आरोग्य केंद्रांसाठी तब्बल पाच कोटी रूपयांना मंजुरी दिली. महापालिकेतील रस्ते व इमारत बांधकाम विभागामार्फत टेंडर काढण्यात आले. त्यात यशस्वी झालेल्या १८ ते २० टक्के कमी दराने टेंडर भरणाऱ्या कंत्राटदारांकडून सर्वच आरोग्य केंद्रांची विशेष देखभाल दुरुस्ती या शिर्षकांतर्गत दुरूस्तीचे कामकाज सुरू केले. सदर दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून विशेषतः रूग्णसेवेसाठी अद्ययावत यंत्रसामग्री देखील खरेदी केल्याने रूग्णांची हाल अपेष्टा संपणार असल्याचा दावा महापालिकेचे शहर अभियंता व मुख्य आरोग्य अधिकारी डाॅ. पारस मंडलेचा यांनी केला आहे.

उपलब्ध माहितीनुसार "टेंडरनामा" प्रतिनिधीने दुरूस्तीसाठी हाती घेतलेल्या सर्वच आरोग्यकेंद्रांची पाहणी केली असता गेल्या चाळीस वर्षांपासून पडक्या, गळक्या इमारतींचे रुपडे पालटलेले दिसले. दुरावस्थेकडे वाटचाल होत असलेल्या सर्वच आरोग्य केंद्रांना अच्छे दिन आल्याची प्रतिक्रिया देखील रूग्णांनी दिली. शहरातील सर्वच प्राथमिक व मुख्य आरोग्यकेंद्राच्या इमारतीला गळती लागली होती. छतामधून गळणाऱ्या पावसातच रुग्णांवर उपचार करावे लागत असत. त्याचा गंभीर परिणाम रुग्णसेवेवर झाला होता. छताचा स्लॅब कोसळून लोखंड बाहेर पडलेले दिसत होते. भिताडाचे पोपडे निघाले होते. विद्युत यंत्रणेचे पार वाटोळे झाले होते. इमारतींची रंगरंगोटी देखील गायब झाली होती. पुरेसी यंत्रसामग्री नसल्याने रूग्णांवर उपचार करावे कसे, असा मोठा प्रश्न होता. यावर राजनगर, जवाहर काॅलनी रूग्णालयासह शहरातील सर्वच रूग्णालयालयाच्या दुरवस्थेची करून कहाणी टेंडरनामाने सातत्याने प्रसिद्ध करत सचित्र व्यथा मांडली होती. एवढेच नव्हेतर यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मुख्य इमारतीत सहा-सात महिन्यांपासून दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च केला जात आहे. या काळात रुग्णसेवा देखील इतर कक्षात सुरु ठेवण्यात आली आहे. रुग्णांना तपासणे, किरकोळ उपचार करणे ही कामे दुरूस्तीसाठी हाती घेतलेल्या इमारतीतच केली जात आहेत.

या आरोग्य केंद्रांच्या इमारतींकडे अनेक वर्षांपासून निधीविना दुर्लक्ष केले जात होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तगादा लावल्यानंतर नाही म्हणायला तात्पुरती मलमपट्टी केली जात होती. त्यामुळे त्यांचीही काही दिवसात दुर्दशा झालेली पाहायला मिळत होती. छताच्या स्लॅबचे ढलपे निखळून पडले होते. सळ्या बाहेर दिसत होत्या. त्यातून पावसाचे पाणी झिरपत होते. तुटलेले  दरवाजे काचा फुटलेल्या खिडक्यांचे दर्शन होत होते. अतिशय कोंदट व अपुऱ्या जागेत रुग्णसेवा करावी लागत असे. रुग्णांना छत्री डोक्यावर घेऊनच आरोग्य केंद्रात यावे लागत असे. पुरेशा सुविधा इमारतीत नसल्याने अन्य उपचारांसाठी रुग्णांना दाखल करता येत नसे, त्यांना जिथे सुविधा असेल तिकडे पाठवले जात असे.पडक्या व गळक्या इमारतीत काम करावे लागत असल्याने डॉक्टर व कर्मचारीही हैराण होत असत. डोक्यावरच्या छताचा तुकडा कधी पडेल याचा नेम नसल्याने जीव मुठीत धरुन काम करावे लागत असे.औषधे व उपकरणे पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी धावाधाव करावी लागत असे.त्यामुळे रूग्णसेवा करताना अनेक अडचणी येत असल्याने कामही गतीने होत नव्हते. सद्यस्थितीत आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीतील काही खोल्यांचे काम पूर्ण झाले असून, तेथे कामकाज सुरु करण्यात आले आहे. उर्वरित कामही गतीने पूर्ण होत असून दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.