Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : घोटाळ्यात घोटाळा; 27 लाखांच्या दुभाजकाचे वाटोळे

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जळगावरोड ते अजंता ऍम्बेसेडर रस्त्यावरील कॅनाॅटमधून जाणाऱ्या मुख्यमार्गावर रस्ता दुभाजकाचे काम निकृष्ट व अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. अर्धवट आणि निकृष्ट दुरूस्तीमुळे कोट्यवधींच्या या रस्त्याची शोभा हा विद्रूप दुभाजक घालवत आहे.

वृत्तासह प्रतिनिधीचा पाठपुरावा

या निकृष्ट कामामुळे कॅनॉट भागातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला होता. त्यावर टेंडरनामाने वृत्त प्रकाशित केले. एवढेच नव्हे, तर प्रतिनिधीने याकामाचा प्रकल्प सल्लागार यश एनोव्हेटिव्ह सोल्युशनचे समीर जोशी, महापालिकेतील कार्यकारी अभियंता भागवत फड, उपअभियंता डी. टी. डेंगळे, प्रभाग अभियंता राजेश वाघमारे, शाखा अभियंता एस. एस. पाटील तसेच तत्कालीन महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

दबक्या आवाजात दुरूस्तीचा कानमंत्र...

त्यावर टक्केवारीत गुंतलेल्या कारभाऱ्यांनी निकृष्ट कामासाठी जबाबदार असणाऱ्या मे. जी. एन. आय इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दबक्या आवाजात कानमंत्र देत दुभाजक दुरूस्तीची विनंती केली.  मात्र त्यातही ठेकेदाराने निकृष्ट दुभाजकाची अर्धवट आणि निकृष्ट दुरूस्ती केल्याचे टेंडरनामा पाहणीत उघड झाले आहे.

चांगल्या रस्त्याचे विद्रूपीकरण थांबवा

हा निकृष्ट दुभाजक तोडून नव्याने बांधण्यात यावा, त्यातील कचरा काढुन त्याचे तातडीने सौंदर्यीकरण करण्यात यावे, अन्यथा महापालिका प्रशासकांच्या दालनातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण

सिडकोचे महापालिकेत हस्तांतर झाल्यानंतर मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या कामाचा रखडपणा चालला होता. सिडकोतील कॅनाट परिसरातील हा अत्यंत महत्त्वाचा गजबलेला रस्ता असल्याने व जालना रस्त्याला समांतर असलेल्या प्रमुख मार्गावर मध्यंतरी वाहनांचे अनेक अपघात झालेले आहेत. यात सामान्य नागरिकांना अपंगत्व आले. येथील नागरिक व व्यापाऱ्यांच्या मागणीने तत्कालीन महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांनी सरकारी अनुदानातुन एक कोटी ५२ लाख ९५ हजार ३९६ रूपये मंजुर केले होते. टेंडरमध्ये यशस्वी झालेल्या. मे. जी.एन.आय इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हे काम देण्यात आले होते. ११ डिसेंबर २०२० रोजी त्याला वर्क ऑर्डर देण्यात आली होती. 

या रस्ते कामात बी. एम. ५० मीटर जाडीचा थर, डीबीएम ८० मीटर जाडीचा थर व बीसी ४० मीटर जाडीचा थर अर्थात रस्त्याचे या मानकाप्रमाणे काम व रस्त्याच्या दोन्ही बाजुने फुटपाथ व रस्त्याच्या दोन्ही बाजुने दीडमीटरचा दुभाजक याकामांचा टेंडरमध्ये समावेश करण्यात आला होता. सरकारी अनुदानातील ५० कोटीतील निम्मे कामे याच ठेकेदाराकडे असल्याने वर्क ऑर्डरच्या तारखेनंतर ठेकेदाराने विलंबाने काम सुरू केले. सरकारी धोरणानुसार डांबरी रस्त्याचा देखभाल दुरूस्तीचा कार्यकाळ हा बारा महिने ते तीन वर्षाचा असताना कारभाऱ्यांच्या मेहरबानीमुळे तो कालावधी सहा महिन्यांचाच ठेवण्यात आला. यात ठेकेदाराने टेंडरमधील मानकानुसार डांबरीकरण व फुटपाथचे काम केले नसल्याची या भागातील नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे.

दुभाजकाचे केले वाटोळे

त्यात ठेकेदाराने निकृष्ट दुभाजकाचे काम केले. मात्र, या कामामुळे 'असून अडचण, नसून खोळंबा' अशी अवस्था झाली आहे. जळगावरोड ते हाॅटेल ऍम्बेसेडर ४३० मीटर लांबीच्या निकृष्ट दुभाजकामुळे या नव्या रस्त्याची शोभा घालवली जात आहे. दुभाजकाची उंची, रुंदी व लांबीही कमी असल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडचणीचे ठरणारे आहे. रस्ता ओलांडतानाही अपघात होऊ शकतात. त्यात दोन ठिकाणी दुभाजक फुटला. त्यावर टेंडरनामाने प्रहार करताच दुरूस्तीचे रेंगाळलेले हे काम अखेर सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान पसरले होते. परंतु, दुरूस्तीत देखील कामाचा दर्जा चांगला नसल्याने व अर्धवट दुरूस्तीमुळे नागरिकांचा पुन्हा पारा सरकला. आता तातडीने हे काम सुरू न केल्यास ठेकेदार कंपनीच्या विरोधात व कामावर जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात थेट महापालिका प्रशासकांच्या दालनातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.

सल्लागार म्हणाले पुन्हा सांगतो कारभाऱ्यांचे मौन

या संदर्भात प्रतिनिधीने पुन्हा ठेकेदार कंपनीचे अधिकारी तसेच प्रकल्प सल्लागार समीर जोशी व महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी , शहर अभियंता ए. बी. देशमुख, कार्यकारी अभियंता भागवत फड यांच्याशी संपर्क साधला असता जोशी यांनी पुन्हा दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असून, काम निकृष्ट असल्यास त्याची तपासणी करण्यात येईल. तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या कामाबाबत कानावर हात ठेवले.