Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यात स्टेच्यूइमारत, व्हीआयपी टाॅयलेट व सार्वजनिक टाॅयलेट व वाॅटरबाॅडी तसेच दोन्ही प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले आहे. केवळ ३० टक्के फिनिशिंग व रंगरंगोटीचे काम बाकी असल्याचे नोएडाच्या डिझाइन फॅक्टरी इंडियाच्या प्रतिनिधींनी 'टेंडरनामा' प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे तांत्रिक तपासणीसाठी कंपनीने नोएडातील दोन विशेष कंपन्यांकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दोन स्टेच्यू आणले असून, एमजीएम परिसरातील कार्यालयात ते ठेवण्यात आले आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अंतिम निर्णय घेणार असल्याचे कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितले.

२० बाय ४० आकाराच्या स्टेच्यू इमारतीखाली तळमजल्यात तेवढ्याच आकाराचे म्युझियम इमारतीचे काम देखील झाले आहे. म्युझियम ते स्टेच्यू इमारतीचे उंची ८ मीटर असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची उंची १७ मीटर ठेवली जाणार आहे. पुतळ्यासमोरी वाॅटरबाॅडी १३ बाय ४३ मीटर आहे. स्मारकाकडे येणाऱ्या दोन्ही प्रवेशद्वाराकडील दोन किमी पॅथवेंचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्यावर १२५ एमएम जाडीचे मजबुत पॅव्हरब्लाॅक लावले जात आहेत. स्मारक परिसरात सहा हजार स्केअरफुटवर साकारण्यात आलेली हिरवीगार लाॅन आकर्षण निर्माण करत आहे. येत्या चार महिन्यात विद्युतीकरण, पथदिवे, म्युझियम व इतर अनुषांघिक कामे पुर्ण करून हे स्मारक महापालिकेला हस्तांतर करण्यात येईल, अशी ग्वाही कंपनी अधिकाऱ्यांनी दिली आहे. महापालिका उद्यान विभागाकडून देखील स्मारक परिसरात तलावाचे काम सुरू असून, येथे मोठ्या प्रमाणात हिरवळ लावण्यात आली आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामासाठी महापालिकेकडे दोन एजन्सीचे टेंडर आले होते. यात नोएडाच्या डिझाइन फॅक्टरी इंडिया या कंपनीने कमी दराने दाखल केलेली टेंडर अंतिम करण्यात आले होते व कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली होती. सिडको भागातील एमजीएमच्या परिसरात असलेल्या प्रियदर्शिनी उद्यानातील १७ एकर जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक व उद्यान विकसित केले जात असून शुक्रवारी तब्बल सहा तास येथील सिव्हील व सुशोभिकरण कामाची प्रतिनिधीने कंपनी अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. येथील स्मारकाच्या कामासाठी १३ ऑक्टोबर २०२० रोजी महापालिकेतर्फे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत डिझाइन फॅक्टरी इंडिया आणि काँम्ट कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड या दोन कंपन्यांनी टेंडर दाखल केले होते. डिझाइन फॅक्टरी इंडियाची २.३३ टक्के कमी दराचे टेंडर अंतिम करून यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पालिका प्रशासकाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर २५ जानेवारी २०२१ रोजी प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानुसार कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली. त्यामुळे कामास तातडीने सुरुवात करण्यात आली होती. पालिकेने स्मारकासाठी पीएमसी मे. आर्कहोम कन्स्लटंटकडून २५.५० कोटींचे अंदाजपत्रक तयार करून घेतले होते. त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मंजूरी मिळवली होती. त्यानुसार २१ कोटी ४७ लाख १०२ रूपयांची टेंडर काढले होते. त्यात २.३३ टक्के कमी दराने म्हणजे एकूण २० कोटी ९६ लाख ८८ हजार ९३९ रुपयांत डिझाइन फॅक्टरी इंडिया कंपनीला हे काम देण्यात आले होते. थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिटचे काम छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून केले जात आहे.