Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : स्मशानांचे रूपडे पालटणार; विकास आराखडा करायचे आदेश

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील १०७ स्मशानभूमींच्या मरणासन्न अवस्थेवर 'टेंडरनामा'ने आवाज उठवला. एवढेच नव्हे, तर स्मार्ट सिटी कार्पोरेशनमार्फत शहरातील १६ स्मार्ट स्मशानभूमींचा प्रस्ताव देखील गुलदस्त्यात राहीला. यावर देखील प्रहार करत 'टेंडरनामा' याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर नवनियुक्त प्रशासक जी. श्रीकांत यांनी महापालिका प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यानंतर मोफत अंत्यविधीबाबत घोषणा केल्या. त्यावर 'टेंडरनामा'ने मोफत अंत्यविधी करताय चांगले पण त्याआधी मरनासन्न स्मशानभुमींचे काय? असा थेट सवाल करणारे वृत्त प्रकाशित केले. या सर्व वृत्तमालिकेची दखल घेत अखेर महापालिका प्रशासकांनी थेट शुक्रवारी स्मशानभुमींची पाहणी केली. 

एक दिवस तुम्हीही मरणार आहात...

तेथील स्मशानात समस्यांची बजबजपुरी दिसताच त्यांनी एक दिवस तुम्हीही मरणार आहात, असा कारभाऱ्यांना टोला मारत प्रत्येकाची शेवटच्या मुक्कामाची जागा येथेच असते, त्याचा शेवटचा प्रवास गोड व्हावा, अशा शब्दात कारभाऱ्यांचे कान उघाडणी केली. यावेळी शहरातील सर्व १०७ मरणासन्न स्मशानभूमींच्या विकासासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून तो निधी प्राप्त करण्यासाठी सरकारकडे पाठवला जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला.

'टेंडरनामा'ची सलग आठ दिवस पाहणी

छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीतील १०७ स्मशानांची मरणासन्न अवस्था झाली आहे. कित्येक ठिकाणी बसण्यासाठी असलेले बाकडे तुटलेले आहेत. बहुतांश ठिकाणी हौद आहेत; पण त्यात भरण्यासाठी पाण्याचा पुरवठाच होत नाही. अस्थी ठेवण्यासाठी लॉकर्स नाहीत आणि संध्याकाळी लावण्यासाठी लाइटही अस्तित्वात नाहीत. स्मशानभूमीत येणारे लोक आधीच दु:खी असतात. अशा वेळी स्मशानभूमीतील गैरसोयींमुळे त्रास झाल्यास त्यांचा संताप होतो. पावसाळ्यात तर स्मशानभूमींची अवस्था आणखीच भयंकर होते. काही स्मशानभूमीत तर पाऊस पडल्यावर गुडघ्याइतके पाणी साचते. मूलभूत सुविधा पुरवण्याची तसदी महानगरपालिका घेत नसल्यामुळे या स्मशानभूमी व दफनभूमींची अवस्था मरणासन्न झाली आहे. 'टेंडरनामा'ने मिटमिटा, पडेगाव, भावसिंगपुरा, जयसिंगपुरा, पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, टाऊन हॉल, बुढ्ढीलाइन, किलेअर्क, लोटाकारंजा, रोहिलागल्ली, मालजीपुरा (पुष्पनगरी), हर्सूल, फाजलपुरा, रवींद्रनगर, शहाबाजार, चंपा मशीद, रोशनगेट, कैलासनगर, जाफरगेट, सिडको एन-६, एन-११, सब्जीमंडी, सिल्लेखाना, क्रांती चौक, रमानगर, जालना रोड, गारखेडा, इंदिरानगर, प्रतापगडनगर, शहानूरवाडी, चिकलठाणा, मुकुंदवाडी, मसनतपूर, ब्रिजवाडी, नारेगाव, हमालवाडा, राहुलनगर, इटखेडा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, बनेवाडी, मकईगेट, घाटी परिसर, बायजीपुरा, जिन्सी, शहागंज, पाणचक्की, एसटी कॉलनी, रोजाबाग, पैठणगेट, सिल्कमिल कॉलनी, कोतवालपुरा, बारापुल्ला, कोकणवाडी, पदमपुरा, बागशेरजंग, बेगमपुरा, समर्थनगर व सातारा - देवळाई आदी ठिकाणच्या सर्व समाज व धर्मीयांच्या एकूण १०७ स्मशानभूमींची अणि दफनभूमींची पाहणी करून माहिती घेतली होती.

१०७ स्मशानभुमींचेच झाले स्मशान

या सर्वच स्मशानभूमींच्या अनेक समस्या आहेत. तेथील कर्मचार्यायनीही अडचणींचा पाढा वाचला. सर्व सोयींनी युक्त अशी एकही स्मशानभूमी शहरात नाही. मुकुंदवाडी स्मशानभूमीकडे जाणारा चिंचोळ्या रस्त्यातील उखडलेला पॅव्हरब्लाॅकचा रस्ताच अपघाताला ण आमंत्रण देत आहे तर ब्रिजवाडी, नारेगाव, मसनतपूर येथे स्मशानभूमी उघड्यावरच आहेत. शहरातील अनेक स्मशानभूमींमध्ये साधी हातपाय धुण्याचीही व्यवस्था नाही. लाखो रुपये खर्चून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या; पण जलवाहिनीच नसल्याने या टाक्या बाराही महिने कोरड्याठाक असतात. त्यात अनेक ठिकाणी तर कचरा साठलेला असतो. अनेक स्मशानभूमीत अंत्यविधीला आलेल्या लोकांसाठी, वृद्धांसाठी बसायला बाकडेही नाहीत. बहुतांश ठिकाणीही बाकडे आणि श्रद्धांजली सभागृहे उद्ध्वस्त झाली आहेत. स्मशानांमधील दिवे वर्षानुवर्षे नादुरुस्त असल्याने रात्रीच्या वेळी कित्येकदा अंधारातच अंत्यविधी उरकले जातात. वाढलेले गाजरगवत आणि रानटी झाडांनी वेढलेल्या अनेक स्मशानभूमींची अवस्था भीतिदायक झालेली आहे. त्यातच अग्निदान शेडची संख्या कमी असल्याने एकाच वेळी अनेक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येथे आल्यास त्यांना बराच वेळ रांगा लावून मग अंत्यविधी करावा लागतो.' टेंडरनामा ' ने सलग आठ दिवस शहर पायाखाली घालत येथील मरणासन्न स्मशानभुमींवर आवाज उठवला होता.

स्मार्ट सिटीच्या नुस्त्या बाता

यातच 'स्मार्ट सिटी कार्पोरेशनने शहरातील १६ स्मशानभुमींचे रूपडे पालटणार, स्मशानभुमी स्मार्ट होणार, अशा बाता मारत छत्रपती संभाजीनगरकरांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. परंतु निधी नसल्याचे कारण पुढे करत हा प्रस्तावच बारगळला.

प्रशासकांचा मोफत अंत्यविधी निर्णय मरणासन्न स्मशानांचे काय?

त्यानंतर महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी पदभार स्वीकारताच बंद पडलेली  बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यविधी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यावर देखील ' टेंडरनामा '  मरणासन्न स्मशानभुमींच्या अवस्थेवर प्रहार करत प्रशासकांचे लक्ष वेधले होते.

असा आहे स्मशानांचा लेखाजोगा

स्मशानभूमी ४६
कबरस्तान ५२
दफनभूमी ९
एकूण १०७
सभागृह ७०
उघड्या स्मशानभूमी १२

प्रशासकांची पाहणी

‘टेंडरनामा ’ने या प्रश्नाला वाचा फोडली. त्यानंतर महापालिका प्रशासकांनी अवकळा आलेल्या स्मशानभूमींची पाहणी केली. आता सर्वच स्मशानांतील समंस्यांचे सर्वेक्षण करून सविस्तर विकास आराखडा निधीप्राप्तीसाठी शासनाकडे पाठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला आहे.