Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar: पालकमंत्री पावले; क्रीडा संकुलाचा चेहरामोहरा बदलणार

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) पावले अन् त्यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन समिती व इतर सरकारी योजनेतून तब्बल २५ कोटी रूपये खर्च करून गारखेड्यात उभ्या असलेल्या विभागीय क्रीडा संकुलाचा चेहरा मोहरा बदलत आहे. यात तब्बल ११ विकास कामांचा समावेश असून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाठा विद्यापीठानंतर येथील क्रीडा संकुलात देखील जागतिक दर्जाचा सिंथेटीक ट्रॅक तयार केला जाणार आहे. यावर तब्बल आठ कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.

विभागीय क्रीडा संकुलात महापालिकेच्या पाण्याशिवाय दुसरा सोर्स नाही. त्यासाठी येथे तीन बोअर घेण्यात आल्या. मात्र पाणीच न लागले नाही. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्यातून येथील हिरवळ जीवंत ठेवण्यासाठी चार वाॅटरगण मशीन उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे उन्हाळ्यातही येथील फुलझाडे आणि लाॅन हिरवीगार दिसत आहेत. येथील सांडपाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी विहिरीचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय सिंथेटिक ट्रॅक देखील तयार करण्यात येणार आहे.

रस्ते झाले चकाचक

क्रीडा संकुलात यापुर्वी रस्त्यांचे काम कधीच झाले नव्हते. क्रीडा संकुलाला लागुनच पालकमंत्री भुमरे यांचे कार्यालय आहे. येथील चाळणी झालेल्या रस्त्यांमुळे माॅर्निंग - इव्हिनिंग वाॅक करणारे जेष्ठनागरिक तसेच खेळाडूंना खाच खळग्यातून वाट काढताना मोठा त्रास होत असे. शिवाय धुळीमुळे प्रचंड त्रास सोसावा लागत असे. यामुळे क्रीडा संकुलातील खेळाडू आणि पालकांनी पालकमंत्री भुमरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची तत्काळ दखल घेत भुमरे यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत सर्व बाजुने माॅनिटर बसवले. त्यात धुळीचे प्रमाण अधीक आढळल्याचे समोर आले. त्यानंतर भुमरे यांनी पार्किंगच्या जागी संपुर्ण काॅक्रीटीकरण केले. त्यानंतर पार्किंग ते इंडुरंन्स जीमपर्यंत डांबरीकरण, पार्किंग ते बॅडमिंटन हाॅल ते वस्तीगृहापर्यंत डांबरीकरण केले. याशिवाय खुल्या जागेत सर्व परिसरात पॅव्हरब्लाॅकचे काम हाती घेण्यात आले आहे.

वसतीगृहांची दशा बदलली

येथील खेळाडू मुला-मुलींच्या वसतीगृहांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. स्वच्छतागृहाची दारे-खिडक्या, भांडे, नळाच्या तोट्या आणि फरशीचे पार वाटोळे झाले होते. भुमरे यांनी तातडीने दखल घेत वसतीगृहासह मुख्य प्रशासकीय इमारत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध इनडोअर खेळाच्या इमारतीतील ही सर्व कामे हाती घेतल्याने आता विभागीय क्रीडा संकुलाला नवा लुक प्राप्त होणार आहे.

बॅडमिंटन हॉलचे रूपडे पालटणार, खराब वूडन कोर्ट बदलणार 

विभागीय क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॅालमध्ये बरेच खेळाडु सरावासाठी येतात. मात्र, वूडन कोर्टची दुरवस्था झाल्याने बऱ्याच वेळा खेळताना खेळाडुंना पायाला दुखापत होत असे. यासाठी वुडन कोर्टच बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय

तसेच,बॅडमिंटन खेळाडूंसह इतर सर्व इनडोअर आणि आऊटडोअर खेळाडुंसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था व अतिरिक्त जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे.

विभागीय क्रीडा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नाने राज्य सरकारच्या क्रीडा व युवा संचालनालयाने सुतगिरणीच्या जागेवर विभागीय क्रीडा संकुल बांधले. यामुळे स्थानिक खेळाडूंसह मराठवाड्यातील खेळाडूंची चांगली सोय झाली होती. मात्र, विभागीय क्रीडा अधिकाऱ्यांनी या भव्य  क्रीडा संकुलाच्या मेंटेनन्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने त्याची दुरवस्था झाली.

पालकमंत्री संदिपान भुमरे पावले

विभागीय क्रीडा संकुलालगतच पालकमंत्री भुमरे यांचे संपर्क कार्यालय आहे. येथील समस्यांच्या तक्रारींची दखल घेत त्यांनी ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहणी केली होती. येथील क्रीडा अधिकाऱ्यांकडून सविस्तर प्रकल्प विकास आराखड्याचा अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यात खेळाडू आणि नागरिकांचे अनुमोदन घेण्याच्याही सुचना केल्या होत्या. त्यानुसार विभागीय क्रीडा अधिकाऱ्यांनी संकुल दुरूस्तीचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर भुमरे यांनी जिल्हा नियोजन समिती व सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून पहिल्या टप्प्यात पंधरा कोटीचा निधी उभा केला.आणि दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली. क्रीडा संकुलात मिळणार्या सुविधांवरच खेळाडूंचे भवितव्य अवलंबून असते. या क्रीडा संकुलात मराठवाड्यासह राज्यातील तसेच परप्रांतीय खेळाडू येतात. मात्र येथील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे   संकुलातील सेवा सुविधांचा पार खेळखंडोबा झाला होता. त्यामुळे स्थानिक खेळाडूंसह इतर राज्यातील खेळाडूंमध्ये नाराजीचा सुर पसरला होता. भुमरे यांनी तातडीने दुरूस्तीचा निर्णय घेतल्याने आता खेळाडूंची चांगली सोय होणार आहे. तहसिलदार विजय राऊत यांनी सांगितले, की जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ही सर्व कामे अंत्यंत दर्जेदारपणे सुरू आहेत. याकामांकडे सर्वच विभागांसह जागृक नागरिक व खेळाडूंचे देखील विशेष लक्ष आहे. लवकरच या क्रीडा संकुलातील सर्वच कामांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.यात खेळाडू मुला-मुलींचे वस्तीगृह, बॅडमिंटन हाॅलमधील वूडन कोर्ट, स्वच्छतागृहे, रस्ते, पाणी, इमारतींची आतुन - बाहेरून रंगरंगोटी, पडझड  निखळलेल्या दारा खिडक्यांसह एक्झॅास्ट पंख्यांची दुरूस्ती, प्रवेशद्वाराची रंगरंगोटी, छतांचे वाॅटरप्रुफ, मोडकळीस आलेल्या इमारतीची दुरूस्ती,  विविध इनडोअर क्रीडा संकुलात मॅट तसेच बारा उर्जाबचत हायमास्ट टाकण्यात येणार आहेत.