Sandipan Bhumre
Sandipan Bhumre Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : पालकमंत्र्याच्याच मतदारसंघात निधीमुळे अडले 'या' रस्त्याचे काम

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : निलजगाव-घारदोन खोडेगाव-काद्राबाद दरम्यानच्या डांबरी रस्त्याच्या कामाबाबत शेकडो ग्रामस्थांनी 'टेंडरनामा' प्रतिनिधीकडे तक्रार केली. काही ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट झाल्यामुळे प्रवाशांसाठी रस्ता धोकादायक झाला आहे, असा तक्रारीचा पाढा ग्रामस्थांनी वाचला. रस्त्याचे काम होऊन दोन वर्षाचा काळ लोटला मात्र अर्धवट कामामुळे नागरिकांना अंगठेफोड सोसावी लागत आहे. या रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण केल्यास याभागातील अनेक गावे, तांडे व शेतवस्तीत राहणारे व गावातील नागरिक व शेतकऱ्यांसाठी हा रस्ता वरदान ठरणार आहे. मात्र पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण तालुक्यातील मतदार संघात येणाऱ्या या रस्त्यासाठी निधी कमी पडल्याने ठेकेदाराने काम बंद केल्याचे 'टेंडरनामा' तपासात समोर आले आहे.

या रस्त्यासाठी ४ कोटी ८९ लाख २ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र यापैकी ठेकेदाराला केवळ ठराविक कालावधीत दहा टक्के प्रमाणे केवळ एक ते दीड कोटी रूपये देण्यात आले आहेत. केलेल्या कामापैकी जवळपास साडेतीन कोटी रूपये ठेकेदाराची रक्कम थकीत आहे. त्यामुळे ठेकेदाराने देखील हे काम अडविले आहे. निलजगाव-घारदोन-खोडेगाव-काद्राबाद दरम्यान सुमारे १५ किलोमीटर अंतरामध्ये रस्त्याचे काम बऱ्यापैकी झाले असताना केवळ निधी अभावी दिड किलोमीटरचे काम ठेकेदाराने अडविल्यामुळे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या वादात नागरिक व शेतकऱ्यांची पंचाईत झालेली आहे. 

'टेंडरनामा'ने यासंदर्भात अधीक चौकशी केली असता अर्थसंकल्पीय वर्ष २०२१ ते २०२२ दरम्यानचे बजेट क्रमांक ०३ व बजेट क्र. ०४ चे संपूर्ण जिल्ह्यात जवळपास दोनशे कोटी रूपये सरकारने थकविल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीमध्ये रस्त्याची कामे बंद करून ठेकेदारांनी 'आधी पैसे द्या, मग कामास सुरवात करू' असा पवित्रा घेतल्याचे समोर आले आहे. निलजगाव - घारदोन - खोडेगाव - काद्राबाद रस्ता दरम्यानच्या घारदोन ते खोडेगाव रस्त्याच्या  केवळ दीड किलोमीटर रस्त्यावर ठेकेदाराने मजबुतीकरण, खडीकरण केले आहे. मात्र, त्यावर डांबरीकरण केलेच नाही. गेल्या दीड वर्षांपासून रस्ता तसाच आहे. पुढे निधीचा तुटवडा असल्यामुळे ठेकेदाराने काम बंद केल्यामुळे हा अर्धवट रस्ता अपघातासाठी कुख्यात बनला आहे. या ठिकाणी तातडीने डांबरीकरण करण्याची गरज आहे. काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी प्रवाशी, गावातील नागरिक व शेतकर्यामधून होत आहे. दरम्यान, रस्त्याचे काम  तीन टप्प्यात झाले आहे, काही काम जिल्हापरिषदने तर काही काम आम्ही केल्याचे ठेकेदाराचे मत आहे. जिथे काम अर्धवट आहे, तिथे निधीचा  अडथळा आल्याने अधिकाऱ्यांनीच काम बंद केल्याचा दावा ठेकेदाराने केला आहे.