sambhajinagar
sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : अखेर 'त्या' प्रकल्प सल्लागाराची हकालपट्टी; आता नव्याने तयार होणार आराखडा

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको (Cidco) हरितपट्ट्यातील दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या रखडलेल्या पुतळा सौंदर्यीकरणाच्या कामांवर 'टेंडरनामा'ने सातत्याने वृत्तमालिका प्रसिद्ध केली. त्याची दखल घेत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या 'त्या' प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी रद्द केली असून, त्यांच्या जागी रविंद्र बनसोडे यांच्याकडे आता या प्रकल्पाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

आता या प्रकल्पाचा नव्याने आराखडा तयार करण्यात येत असून, जलदगतीने काम करण्याच्या सूचना जी. श्रीकांत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदार कंपनीसह प्रकल्प सल्लागारांना दिल्याचे अधिकाऱ्यांनी 'टेंडरनामा' प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

सिडको बसस्थानक परिसरातील हरित पट्ट्यात दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळा सौंदर्यीकरणाचे काम कित्येक महिन्यांपासून रखडले आहे. आर्थिक तरतूद करूनही सौंदर्यीकरण रखडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. येथील हरित पट्ट्यात हरित क्रांतीचे प्रणेते, विदर्भाचे सुपुत्र आणि राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. शहागंज मधील निजामकालीन ऐतिहासिक घड्याळाची प्रतिकृती आणि छोटेखानी बाग येथे फुलवली जाणार आहे. त्यात आकर्षक विद्युत रोषणाईने सिडको टी पाॅईंट चौक उजळून निघणार आहे. हा पुतळा सिडकोच्या सौंदर्यात भर घालणार आहे.

तरुणांसह नागरिकांना प्रेरणा देणाऱ्या या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय महानगरपालिकेचे तत्कालीन प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला होता. त्यासाठी तब्बल सव्वा कोटी रूपयांची देखभाल व दुरूस्तीसाठी तरतूदही करण्यात आली होती. महानगरपालिका फंडातून प्राप्त निधीतून ही तरतूद करण्यात आली होती. मात्र निधीची तरतूद होऊनही अद्याप पुतळा सौंदर्यीकरणाच्या कामाने वेग घेतला नाही.

यासंदर्भात महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्यांकडे प्रतिनिधीने पुतळा सौंदर्यीकरणाचे काम कुठवर आले, त्याबाबत कोणती कारवाई करण्यात आली, अशी पृच्छा केली व त्यात कामाची सद्यस्थिती जाणून घेतली असता, त्यात या प्रकल्पासाठी नियुक्त केलेल्या प्रकल्प संचालकांचा कामातील हलगर्जीपणा, वेळोवेळी असहकाऱ्याची भावना व वेळपणा यामुळे धीरज देशमुख या वास्तुविशारदाची हकालपट्टी करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. आता सौंदर्यीकरणाच्या कामासाठी शहरातीलच रविंद्र बनसोड या वास्तुविशारदाची निवड करण्यात आली आहे.

नव्याने प्रकल्पाचा सविस्तर विकास आराखडा सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सदर काम १२ महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र प्रकल्प सल्लागाराच्या संथगती‌ कारभाराने अद्यापही पुतळा सौंदर्यीकरणाला प्रत्यक्षात सुरूवातच झाली नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत आहे. कामासाठी कंत्राटदाराने अत्यंत वर्दळीच्या वळण रस्त्यावर पत्रे ठोकून रस्ता बंद केल्याने सिडको टी पाॅईंट चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. परिणामी येथे मोठ्या अपघाताची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.