Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : 26 वर्षे लोटली तरी 'या' उड्डाणपुलाकडे महापालिकेचे दुर्लक्ष

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर - पैठण रोडवरील उड्डाणपुलाच्या कठड्यावर वड, पिंपळ आणि औदुंबराची झाडे उगवली आहेत.‌ दुभाजकाची उंची अंत्यंत कमी झालेली आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम होऊन २६ वर्षे लोटली तरी या पुलाच्या दुरुस्तीकडे महानगरपालिकेने कानाडोळा केला आहे.

उड्डाणपुलाच्या दुरुस्तीकडे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे दुर्लक्ष असल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतरही पुलाच्या दुरुस्तीचे काम मार्गी लागत नसल्याने ॲड. रूपेश जैस्वाल या विधिज्ञाने याबाबत न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने दुभाजकाची उंची वाढवा, कठड्याची झाडे काढा आणि पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, असे आदेश महानगर पालिकेला दिले होते. तरीही महानगरपालिका प्रशासनाने यावर काहीही कारवाई केली नाही.

छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण रोडवरील रेल्वे गेट क्रमांक - ५२ वर असलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम २२ एप्रिल १९९८ रोजी झालेले आहे. २६ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी अद्यापपर्यंत या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटचे काम झालेले नाही.

या उड्डाणपुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. वाहने जात असताना पूल मोठ्याप्रमाणात हालतो असे निदर्शनास येते. उड्डाणपुलावरील कठड्यांवर मोठमोठी झाडे वाढल्याने पुलाच्या कठड्यासह भिंतींना धोका निर्माण झाला आहे. नेहमीप्रमाणे डांबरी कामात रस्त्याची उंची वाढली. मात्र दुभाजक रस्ता लेव्हलला आल्याने अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही.‌

या मार्गात रेल्वे गेट असल्याने पुलावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. तसेच पुलाच्या खाली महानगरपालिकेने फळभाजी विक्रेत्यांसाठी जी - २० च्या काळात नगरविकास विभागाने शहरातील पायाभूत सुविधांसाठी दिलेल्या निधीतून ५० लाख रुपये खर्च करून सुशोभिकरण, रंगरंगोटी व जाळ्या तसेच पॅव्हरब्लाक बसवले, पार्किंगची सोय केली. येथे मंडीतर भरतच नाही, याउलट जागेचा कचरा झाला आहे. बंदीस्त केलेली जाळी तोडून स्थानिकांकडून वाहने उभी करण्यात येत आहेत. या वाहनांच्या मागे स्थानिक नैसर्गिक विधी करीत असल्याने येथे दुर्गंधी पसरू लागली आहे.

पैठण नाथनगरीकडे जाण्यासाठी हा मार्ग सोईचा असल्याने अनेक वाहने या मार्गावरून जातात. परंतु येथे रेल्वे गेट क्रमांक - ५२ वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान जालानगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठ्याप्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संग्रामनगर उड्डाणपुलाप्रमाणे येथे भुयारी मार्गाची आवश्यकता आहे.

त्याचबरोबर उड्डाणपुलाखालच्या जोड रस्त्यांची देखील मलमपट्टी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कठड्यावरील झाडांची छाटणी करणे, दुभाजकाची उंची वाढविणे तातडीने गरजेचे आहे.‌ मात्र, महापालिकेकडून याची दखल घेण्यात येत नसल्याने पूल धोकादायक झाला आहे.