Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : गल्लीबोळात काँक्रिट रस्त्यांचा घाट अन् अवकाळीने...

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहराच्या मुख्य रस्त्यांबरोबरच गल्लीबोळातील रस्तेही सिमेंट-काँक्रिटचे करण्याचा लोकप्रतिनिधीं आणि कारभाऱ्यांचा ‘हट्ट’ छत्रपती संभाजीनगरवासीयांना चांगलाच त्रासदायक ठरत असल्याचे चित्र नेहमी येणाऱ्या पावसामुळे सातत्याने स्पष्ट होत आहे.

शहरातील गल्लीबोळात कोणतीही गरज नसतानाही, चांगले डांबरीकरण केलेले रस्ते उखडून तेथे सिमेंट-काँक्रिटचे रस्ते महापालिका बांधकाम विभागाने तयार केले आहेत. हे रस्ते तयार करताना बहुतेक रस्त्यांवरील डांबरीकरणाचे जुने थर योग्य पद्धतीने काढून न टाकता वरच्यावर खोदकाम करून पालिकेने त्यावर काँक्रिटचे रस्ते तयार केले आहेत. यामुळे रस्त्यांची उंची वाढली असून, रस्त्याच्या आजूबाजूच्या घरांत आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी कशा पद्धतीने जाऊ शकते, याचा प्रत्यय शुक्रवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे आला. काँक्रिटचे रस्ते तयार करताना आयआरसीच्या नियमांना बगल देत आवश्यक ती काळजी न घेता पालिका बांधकाम विभागाने रस्त्यांबाबतचे नियम न पाळल्याने अवकाळी पडलेल्या पावसाचे पाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये  घुसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. डांबरी रस्ता तयार केल्यानंतर तो पावसाळ्यात लवकर खराब होऊन खड्डे पडतात. दुरूस्तीसाठी निधी तोकडा पडतो. याशिवाय पैशाची बचत व्हावी, यासाठी पालिकेतील काही माननीयांनी आणि आमदार-खासदारांनी  हट्ट केल्याने गरज नसतानाही त्यांच्या हट्टासाठी बहुतांश गल्लीबोळांतही काँक्रिटचे रस्ते तयार करण्याचा सपाटा पालिकेने लावला आहे.

२५ वर्ष टिकतील अशी जाहिरातबाजी करून काँक्रिटचे रस्ते तयार करण्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात ‘हित’ साधले जात असल्याने हा उद्योग केला जात असल्यानेच हे आयडियल रस्ते अडचणीचे ठरत आहेत. महापालिकेच्या नियमांनुसार रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरांचे जोते जमिनीच्या पातळीपासून ४५ सेंटिमीटर उंच असणे गरजेचे आहे. त्यानुसारच नागरिकांना घर बांधण्यासाठी परवानगी दिली जाते; मात्र महापालिकेकडून नागरिकांना हा नियम लागू केला जात असला, तरी पालिकेकडून मात्र रस्त्यांची कामे करताना याकडे दुर्लक्ष करून जुन्या डांबरी रस्त्यावरच नव्याने सिमेंटचे रस्ते तयार केले जातात. परिणामी रस्त्यांची उंची अधिक वाढल्याने नागरिकांच्या घराचे जोते खाली येतात. रस्ते वर आणि घरे खाली गेल्याने नागरिकांच्या घरात पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे. पालिका प्रशासनाने तयार केलेल्या काँक्रिटच्या रस्त्यांचा थेट फटका याच रस्त्यालगत बाजारपेठांना देखील बसला आहे. अवकाळीत अशी अवकळा असेल, तर पावसाळ्यात काय? असा प्रश्न शुक्रवारी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने  बाजारपेठातील व्यापाऱ्यांना पडला आहे. जुन्या डांबरी रस्त्यापेक्षा किमान सात ते आठ इंच उंच असे काँक्रिटचे रस्ते शहरभर करण्यात आले आहेत. शुक्रवारी शहरात झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी काँक्रिटच्या रस्त्यांमुळे नागरिकांच्या घरात शिरले होते. या रस्त्यांची उंची पूर्वीच्या रस्त्यांच्या तुलनेत अधिक असल्याने पावसाळ्यात हे रस्ते नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणार आहेत.

नवीन रस्ते तयार करताना पावसाळी गटारे आणि पाणी जमिनीत मुरण्यासाठी जागाच ठेवली गेली नसल्याने पावसाचे पाणी जमिनीत न मुरता सिमेंट रस्त्यांवरच साचत आहे. ते पाणी मुरत नसल्याने काँक्रिट रस्त्याचा पृष्ठभागावर देखील त्याचा परिणाम होत असून पाणी जमिनीत न मुरल्यापे भूगर्भातील पाण्यावर देखील परिणाम होत  आहे. गेल्या दहा वर्षात सर्वसाधारण पाचशे कोटीचे शहरात शंभर ते दिडशे किलोमीटर लांबीचे काँक्रिटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. काँक्रिटच्या रस्त्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जाण्यास सुरुवात झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून हे रस्ते खोदण्यासाठी नागरिकांकडून पालिका प्रशासनावर दबाव टाकून हे रस्ते खोदले जातील. परिणामी कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते पाण्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रस्ता चांगला असतानाही केवळ गल्लीबोळातील रस्ता काँक्रिटचा असावा यासाठी लोकप्रतिनिधींकडून केला जाणारा हट्ट, प्रशासनावर टाकला जाणारा दबाव, जुना रस्ता शास्त्रीय पद्धतीने न खोदता त्यावर केला जाणारा नवीन रस्ता आणि त्यामुळे वाढणाऱ्या रस्त्याच्या उंचीमुळे घरांमध्ये जाणारे पाणी, असे चित्र शहराच्या विविध भागांत पाहायला मिळत आहे. फारसा अभ्यास न करता सरसकट सर्वत्र सिमेंटचे रस्ते तयार करण्याचा सपाटाच पालिकेने सुरू केल्याने पालिकेचा कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात जात असल्याचे चित्र टेंडरनामाने शहरभर फिरून कॅमेऱ्यात कैद केले आहे.

शहरातील अंतर्गत व मुख्य रस्ते चकाचक करण्याचा घाट महापालिकेने आणि पुढाऱ्यांनी घातल्यामुळे अवकाळीत तर अवकळांचा ट्रेलर दिसला. पण  येत्या पावसाळ्यात त्याचे दुष्परिणाम नागरिकांनाच भोगावे लागणार आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जवाहरनगर पोलिस स्टेशन ते टिळकनगर रस्ता, कामगार चौक ते हायकोर्ट रस्ता, हायकोर्ट ते पुंडलिकनगर रस्ता, गजानन महाराज मंदिर ते जय भवानी चौक, हाॅटेल दिपाली ते मुकुंदवाडी स्टेशन रस्ता, कॅम्र्बीज ते नगरनाका, आकाशवानी ते त्रिमुर्ती चौक, शरद टी पाॅईंट ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता, पतियाला बँक ते विजयनगर-नाथ प्रांगण ते एमराॅल्ड सिटी, कामगार चौक ते महालक्ष्मी चौक, महालक्ष्मी चौक ते लोकशाही काॅलनी आणि त्या परिसरातील सोसायट्यांबाहेर झालेले रस्त्यांचे काँक्रिटीकरण. एकीकडे मुख्य रस्ते उंच आणि त्या खाली असलेले अंतर्गत काॅलनींचे रस्ते यामुळे डोंगरउतारात असल्याने पावसाळ्यात डोंगरावरचे पाण्याचे लोंढे थेट वेगाने शेवटच्या सोसायटीपर्यंत वाहत येतात. या पूर्वीही असे पाणी रस्त्यावरून वाहत खाली जात होते; पण आता रस्ते उंच आणि सोसायट्यांमध्ये पार्किंग कमी उंचीचे असल्याने पावसाळ्यातील पाणी सोसायट्यांमध्ये शिरते आहे. झोपडपट्ट्यांमधील अनेक लोक प्रातर्विधीसाठी डोंगरावर जात असल्याने दुर्गंधीचे पाणीही या काळात सोसायट्यांमध्ये येते. काही ठिकाणी रस्त्यांच्या कडेला ‘चॅनेल’ केले असले, तरी त्यामध्ये कायम पालापाचोळाच अडकलेला असल्याने अडलेले पावसाचे पाणी सोसायट्यांमध्येच शिरते. सिडको एन-४ या परिसरातील बहुतांश सोसायट्यांमध्ये गेल्या उंच रस्त्यातील  पावसाचे पाणी जोड रस्त्यांवर साचले आहे. हेच चित्र जवाहर काॅलनी, ज्योतीनगर, उल्कानगरी, दशमेशनगर, त्रिमुर्ती चौक, गजानन काॅलनी, सातारा-देवळाई, शहानुरवाडी, नारेगाव, चिकलठाणा, पडेगाव, मिटमिटा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, हर्सुल व अन्य परिसरात बघायला मिळाले. गेल्या अनेक वर्षांपासून विविध परिसरातील नागरिक याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत; मात्र काहीच बदल झालेला नाही. आगामी पावसाळ्यात इतर शहरच पाण्याखाली जाईल, असेच चित्र दिसल्यास आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही.

रस्ते तयार करताना ही घ्या काळजी

● रस्ते तयार करण्याआधी भौगोलिक सर्वेक्षण करा
● माती परिक्षण आणि वाहतुकीचा अंदाज लक्षात घेऊनच बांधकाम साहित्याचा दर्जा ठरवावा.
● रस्ते तयार करताना मार्गात ओढा, नाले याचा अंदाज घेऊन पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी दोन्ही बाजुने आरसीसी गटारे बांधा
●रस्त्यांच्या मधोमध कॅबर तयार करून दोन्ही बाजुने स्लोब काढा जेनेकरून पाणी आपोआप गटारात जाईल.
● दोन्ही बाजुने चढ-उतार देऊन पाणी नाल्यात उतरले अशी व्यशस्था करा
● कुठेच नाल्याची सोय नसेल तर भुमिगत पाईपलाइनीद्वारे पर्यायी रस्त्याच्या नाल्यापर्यत जोडून पाण्याचा निचरा करावा.
● रस्ते तयार करताना रस्त्याच्या मधोमध नागरि अत्यावश्यक सेवांसाठी भुमिगत पाईप टाका, जेनेकरून रस्ते खोदाईची वेळ येणार नाही.
● वाहतुकीचे सर्वेक्षण करूनच बांधकाम साहित्याचा दर्जा ठरवावा
● रस्ते तयार करताना जुन्या रस्त्याचे खोलापर्यंत खोदाईकरून कमीतकमी उंचीचे रस्ते तयार करावेत.
● रस्ते तयार करताना वाहतुक नियमानुसार कॅट ऑईज, पांढरे पट्टे, वळणमार्ग दर्शवणारे ॲरो , स्टाॅप लाइन, झेब्रा क्राॅसिंग, दिशादर्शक फलक , रिफ्कलेक्टर याचा अंदाजपत्रकात समावेश करा.
● बजेट कमी आणि सापसुरळीसारखे अधिक रस्ते तयार करण्यापेक्षा बजेट अधिक रस्ते कमी पण सर्व नियमांचे पालन करून रस्ते तयार करावेत.