Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

औरंगाबाद : नव्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम कासवगतीने; जुन्याच पुलावर

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : वाळूज रस्त्यावरील गोलवाडी ते नगरनाका या मृत्युच्या महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम कासवगतीने सुरू असल्याने प्रवाशांना नाईलाजाने एकेरी मार्ग असलेल्या जुन्याच पुलावरून खड्ड्यातून वाहने काढत जीव धोक्यात टाकुन रस्ता ओलांडावा लागत आहे. यासंदर्भात ठेकेदार मात्र अतिवृष्टी, निधी तर कधी लाॅकडाऊनचे कारण पुढे करत आहे.

येथील २४ तास होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी व वाढते अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी जुन्या रेल्वे उड्डाणपुलालगत पर्यायी उड्डाणपूल बांधावा यासाठी गेल्या ४० वर्षांपासून औरंगाबादकरांची मागणी होती. यासंदर्भात 'दमरे' (दक्षिण मध्य रेल्वे) रेल्वे प्रवासी महासंघाचे पदाधिकारी आणि रेल्वे व्यवस्थापक तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत अनेक बैठका झाल्या होत्या. प्रत्येक वेळी अधिकारी बैठकीत रेल्वे पूल उभारण्याची मागणी रास्त असल्याचे म्हणत, परंतू जमिन संरक्षण खात्याच्या ताब्यात असल्याचे सांगत रेल्वे उड्डाणपुल उभारणीसाठी रूंदीकरणात अडथळा असल्याचे सांगत कानाडोळा करत असत.

अखेर नगरनाका-गोलवाडी या साडेतीन किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा तिढा जून २०१३ मध्ये सुटला. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालय व राज्य सरकारच्या मालकीच्या जमिनीचे अदला-बदलीद्वारे हस्तांतरण कराराच्या प्रारूपाला सरकारने मंजुरी दिली. तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमकुमार व संरक्षण खात्यातर्फे ब्रिगेडिअर सुरेंद्र पावामणी यांनी करारनाम्यावर स्वाक्षऱ्याही केल्या. जमीन ताब्यात आल्यावर तीन वर्षानंतर नगरनाका ते गोलवाडी फाट्यापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जागतिक बँक प्रकल्प शाखेमार्फत रस्ता चौपदरीकरण करण्यात आले. मात्र, जुन्या रेल्वे उड्डाणपूलालगत पर्यायी रेल्वे उड्डाणपुलाबाबत पुढे तीन वर्ष काहीच हालचाली न झाल्याने तेथे रुंदीकरणाचा तिढा कायम होता.

जागा ताब्यात आली सरकारचे हात वर

रेल्वे उड्डाणपुलासाठी जागेचा प्रश्न मिटला, परंतु पुढे निधीचा प्रश्‍न कायम असल्याने नगरनाका - गोलवाडी रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा मुहूर्त लांबणीवर पडला होता.

अखेर टेंडर निघाले

यासंदर्भात औरंगाबादकरांनी आवाज उठवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कामाचे ऑगस्ट २०१९ दरम्यान टेंडर काढण्यात होती. शासनाची सविस्तर प्रकल्प विकास आराखड्याला १९ कोटी ६८ लाखाच्या अंदाजपत्रकीय रकमेला प्रशासकीय व वित्तीय मंजुरी मिळाल्यानंतर निविदेत सहा टक्के कमी दराने सहभागी झालेल्या लातुरच्या खंडुजी पाटील यांच्या के.एच. कन्सट्रक्शन कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला होता. त्यात याकामाची १८ कोटी रूपये एकूण किंमत झाली. सदर काम १८ महिन्यात पुर्ण करायची टेंडरमध्ये अट होती.

लाॅकडाऊन आणि अतिवृष्टीचे लागले ग्रहण

ठेकेदाराने याकामाला खोदकामापासून सुरवात करताच कोविड-१९ या जागतिक संसर्गजन्य आजाराने लाॅकडाउनचे ग्रहण लागल्याने सहा महिने ठेकेदाराला काम बंद ठेवावे लागले. त्यानंतर अतिवृष्टीमुळे चार ते सहा महिने काम करता आले नाही. विशेष म्हणजे याकामासाठी १८ कोटींपैकी ठेकदाराला केवळ ३ कोटी रूपये देण्यात आले आहेत. असे ठेकेदार खंडुजी पाटील यांच्याकडुन सांगण्यात आले .

कासवगतीने काम

तीन वर्षात याकामासाठी अद्याप सरकारने एक छदामही दिला नसल्याने ठेकेदाराने कामाची गती न वाढवता संथगतीने काम सुरू ठेवले आहे. परिणामी रेल्वे उड्डाणपुलाचा तिढा कायम आहे. रेल्वेने गर्डर टाकल्यानंतर ठेकेदाराने त्यावर स्लॅब टाकला. चार पिअर उभे करून त्यावर चार बेडब्लाॅक टाकले.अहमदनगरच्या दिशेने ३०० मीटर रूंदीपर्यंत जोड रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र औरंगाबादच्या दिशेने ३०० मीटर जोड रस्त्यांचे डांबरीकरण झालेच नाही.

जुन्याच पुलावर भार

नव्या पुलाच्या कामाची धिमी गती असल्याने जुन्या रेल्वे उड्डाणपुलावर मोठा भार आहे. त्यात या पुलाच्या संरक्षक भिंतीला भगदाड पडले आहेत. याशिवाय भिंतीला ठिकठिकाणी तडे गेल्याने ती खिळखिळी झाली आहे. ही भिंत कोसळून मोठी दुर्घटना होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्यामुळे यापुलाची दूरवस्था झाली आहे. ही भिंत कधीही पडेल, अशा स्थितीत आहे.

४० वर्षांपूर्वी झाले होते बांधकाम

३१ मार्च १९८२ रोजी या जुन्या पुलाचे उद्घाटन तत्कालीन सार्वजनिक बांधकाम सचिव वासुदेवराव राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसंतराव बेडसे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागातील जागतिक बँक प्रकल्प शाखेकडे या पुलाच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी आहे. या विभागामार्फत यापुलावरील रस्त्याची डागडुजी देखील केली जात नसल्याने खड्डेच खड्डे झालेले आहेत. एकाच पुलावर भार असल्याने उड्डाणपुलाजवळच वाहतुकीची कोंडी होत आहे.. पुलावर लावलेल्या लोखंडी पाइपची मोडतोड झाली आहे. त्यामुळे नव्यापुलाचे काम तातडीने पुर्ण करून तो लवकरात लवकर वाहतूकीस खुला करून देण्याची मागणी होत आहे.