Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीपर्यंत धोकादायक वाट

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जीवन खडतर असते तर मृत्युमुळे सगळ्या त्रासातून सुटका होते असे म्हटले जाते मात्र मृत्युनंतरही ही वाट बिकटच राहिली तर काय करावे? अशीच काहीशी वेळ छत्रपती संभाजीनगरातील देवानगरी, ज्योतीनगर, टिळकनगर, उस्मानपुरा, जवाहर काॅलनी, उल्कानगरी, दशमेशनगर, शहानुरवाडी,सातारा - देवळाई, बीडबायपास, शिवाजीनगर व अन्य शेकडो वसाहतधारकांवर सध्या आली आहे. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीपर्यंत धोकादायक पुलांवरून त्यांना वाट काढावी लागत आहे.

आधीच स्मशानभूमीची झालेली मरणासन्न अवस्था, त्यातच धोकादायक पुलांचे रखडलेले काम यातच या मार्गावर अतिक्रमणांचा वाढलेला विस्तार यामुळे स्मशानातील ओट्यांपर्यंत पोहचण्याची वाटच बंद झाली आहे. पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठी पाइपातच कचरा अडकल्याने  हे पाणी पुलावरून वाहत असल्याने अत्यंत कसरतीने मार्ग काढावा लागत आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटीतील कारभाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

सालाबादप्रमाणे थोड्याशा पावसामुळे हा मार्गच बंद होऊन अंत्यविधीसाठी नागरिकांना कमरेपर्यंतच्या पाण्यातून वाट काढत जावे लागते. ज्योतीनगर-शम्सनगर ते श्रीनिवास काॅलनी तसेच देवानगरी तेण प्रतापगडनगर स्मशानभुमीच्या मार्गावर नगरपरिषदेच्या काळातील  कैक वर्ष कमी उंचीचे जुने नळकांडी पुल आहेत. प्रतापगड स्मशानभुमी समोरील पुल पावसाळ्यात पुर्णपणे  स्मशानभूमीला पाण्याने वेढतो. अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना या पाण्याने नेहमी आडकाठी होते. मात्र अधिकवेळ थांबणे कठीण असल्याने नागरिकांना कसरतीने मृतदेहासह पाण्यातून मार्ग काढीत अंत्यविधी पार पाडावे लागतात.

याच स्मशानभूमीकडे येण्यासाठी दुसरा मार्ग ज्योतीनगर ते शम्सनगर - शहानुरवाडी - देवानगरी अत्यंत अरुंद व खड्डेमय असल्यामुळे या रस्त्याशिवाय पर्याय नाही.या मार्गावरील पुलाची उंची देखील कमी आहे. या मोडकळीस आलेल्या पुलावर देखील पावसाळ्यात पाणी वाढल्याने विधीसाठी जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागतो. अन्य नागरिकांना मात्र दूरवरच थांबावे लागते. या स्थितीबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पुलाखालील पाइपातही कचरा अडकल्याने. परिणामी पाण्याची वाटच बंद झाली आहे.

महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

सातारा-देवळाईसह बीड बायपासचा वाढता आवाका पाहता याच स्मशानभुमीत अंत्यविधी उरकावा लागतो. याभागातील लोकसंख्येसह अंदाजे एक लाखाहून अधिक लोकसंख्येसाठी प्रतापगडनगर स्मशानभुमी महत्वाची आहे. तरीही गावातील स्मशानभूमीसह पुलांची अवस्था अजूनही दयनीय आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत प्रतापगडनगर ते देवानगरी रस्त्याचे काॅक्रीटीकरण करण्यात आले. मात्र नेमक्या स्मशानालगत पुलाची व दुसऱ्या पर्यायी मार्गातील पुलाची दुरूस्ती रखडली आहे. फुलासह ॲप्रोच रस्ते पूर्णपणे उखडले आहेत.

नागरिकांच्या आंदोलनानंतर दुरूस्ती

देवानगरी ते प्रतापनगर या दीड किलोमीटरच्या मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले होते. यामुळे प्रतापनगर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या भागातील नागरिकांच्या आंदोलनानंतर स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्याचे भिजत घोंगडे  मिटले. शहानूरमियाँ दर्गा रोड ते मलकापूर बँक आणि मलकापूर बँक ते प्रतापनगर स्मशानभूमी-प्रतापनगर अशा दीड किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुरूस्ती झाली. मात्र स्मशानासमोरील पुलाची दुरूस्ती रखडली आहे. पुलावर जागोजागी खड्डे पडले असून स्मशानभूमीला जाण्यासाठी सोयीचा रस्ता नाही. या रस्त्याने पायीसुद्धा चालता येत नाही. सुरुवातीला १०० कोटींच्या बजेटमध्ये या रस्त्याचे काम होते. मात्र, नंतर हा रस्ता वगळण्यात आला. त्यानंतर महापालिकेच्या बजेटमध्ये या रस्त्याचे काम ठेवण्यात आले. परंतु कामाला मुहूर्त लागला नाही. स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्याचे काम आल्यानंतर अनेक महिन्यांपासून प्रलंबित होते. ते कसेबसे झाले. मात्र सदरील रस्त्यावर दोन पुलांचे काम वर्षभरापासून रखडले आहे. या दोन्ही पुलांच्या दुरूस्तीसाठी चार कोटी  रुपयांचे बजेट आहे. मागील अनेक महिन्यांपासून या भागातील नागरीक  सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र पुलांचे काम का रखडले? याविषयी कोणीही बोलायला तयार नाही, यासंदर्भात आमदार संजय शिरसाट यांनी देखील स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना फोन करून पुलांचे काम तातडीने सुरू करण्यास सांगितले. मात्र काम अद्याप सुरू होत नाही.