NH 52
NH 52 Tendernama
मराठवाडा

NH 52 : तिसगाव ग्रामपंचायतीने का घातले नितीन गडकरींना साकडे?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : सोलापूर ते धुळे हा औरंगाबादमार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच - ५२ अवघ्या वर्षभरात उखडला. या खराब रस्त्यावर टेंडरनामाने सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. या वृत्ताची दखल घेत औरंगाबाद तालुक्यातील तीसगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच नागेश कुठारे यांनी थेट केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली आहे.

सोलापूर - ऐडशी -  औरंगाद - करोडी - तेलवाडी  हा चार टप्प्यातील चार  पदरी राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. पुढे औट्रम घाटातील पाचव्या आणि चाळीसगाव ते धुळे या सहाव्या टप्प्याचे काम रखडलेले आहे. या संपूर्ण महामार्गासाठी एकूण सहा टप्प्यात सुमारे साडेपाच हजार कोटी रुपये इतका मोठा निधी खर्च कला गेला जात आहे. मात्र हा रस्ता सोलापूर ते तेलवाडी या चारही टप्प्यात ठिकठिकाणी उखडलेला दिसून येत आहे. यातच औरंगाबाद ते करोडीमार्गे तेलवाडी या मार्गाचे लोकार्पण २४ एप्रिल २०२२ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र औरंगाबाद नजीक निपाणी, आडगाव, गांधेली, बाळापूर, देवळाई, सातारा, कांचनवाडी, गोलवाडी, वाळुज, तिसगाव ते कसाबखेडा, वेरूळ पुढे तेलवाडीपर्यंत या रस्त्यावरील व अंडरबायपासमधील डांबर उखडले आहे. खराब रस्त्यामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

दरम्यान, या खराब रस्त्याच्या तक्रारी येताच पापाचे ओझे हलके करण्यासाठी एनएचएआयचे अधिकारी संबंधित कंत्राटदाराकडून रस्ता डागडुजीच्या नावाखाली केवळ थातुरमातूर काम करून तक्रारदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.

एल ॲण्ड टी या कंत्राटदार कंपनीने निपानी ते करोडी ३०.२१५ कि.मी.साठी ५१२.९९ कोटीतून तर दिलीप बिल्डकॉन या कंत्राटदार कंपनीने करोडी ते तेलवाडी पर्यंत ५५.६१० कि.मी.साठी ५१२.०२ कोटीतून बांधलेला महामार्ग वर्षभरापूर्वीच वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अनेक ठिकाणी हा महामार्ग उखडला आहे. संबंधित कंत्राटदारांना बांधकामाचे पूर्णत्व प्रमाणपत्र मिळाल्यानंतर करोडी आणि हतनूर येथे टोलनाके उभारले. टोलचे दर देखील निश्चित करण्यात आल्यानंतर जवळपास मागील वर्षभरात कोट्यावधीची वसुली केली. मात्र उखडलेल्या महामार्गाच्या दुरूस्तीसाठी अधिकारी आणि कंत्राटदार कानाडोळा करत आहेत.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील हे डांबरीकरण अवघ्या वर्षभरातच उखडले आहे. सोलापूर - धुळे या राजमार्गाला जोडणार्या गोलवाडी - तिसगाव - वाळुज दरम्यान जोडरस्त्यांचे थातूरमातूर काम करण्यात आले अंडरबायपासमधील व मुख्य रस्त्यावरील दिवे बंद आहेत. अनेक ठिकाणी सुशोभिकरणाचे काम अर्धवट आहेत. दिशादर्शक फलक कुंडीत लावण्याचा जुगाड केला आहे.  त्यामुळे या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे या रस्त्याप्रकरणात संबधित कंत्राटदार कंपनी एल अ‍ॅण्ड टी आणि दिलीप बिल्डकाॅन यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच संबधित कामाची देखरेख करणारे अभियंते यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिसगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच नागेश कुठारे यांनी एनएचएआयचे प्रकल्प संचालकांसह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे केली आहे.