Airport Tendernama
मराठवाडा

नांदेड विमानतळाच्या धावपट्टीवर खड्डे! विमानसेवा बंद

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune): नांदेड विमानतळाच्या धावपट्टीवर खड्डे आढळून आल्याने ‘डीजीसीए’ने (नागरिक हवाई वाहतूक महासंचालनालय) नांदेड विमानतळ प्रवासी सेवेसाठी बंद केले आहे. परिणामी नांदेड विमानतळावरची विमानसेवा पूर्णपणे थांबली आहे. याचा थेट फटका पुण्याहून नांदेडला जाणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. स्टार एअरची पुणे- नांदेड विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. ‘डीजीसीए’च्या आदेशानंतर धावपट्टीचे काम सुरू झाले आहे.

नांदेड विमानतळ हे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) च्या अखत्यारीत आहे. मात्र, धावपट्टीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम योग्य पद्धतीने झाले नसल्याने ‘डीजीसीए’ला अखेर कारवाईच्या स्वरूपात विमानतळ बंद करावे लागले. नांदेड विमानतळावरची विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे. परिणामी विमान कंपन्या व प्रवाशांचे मोठे नुकसान झाले आहे.

या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष स्वाती पांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

‘उडान’ सेवा जमिनीवर

पुणे - नांदेड- पुणे ही उडान योजनेत समाविष्ट असलेला मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर सेवा देणाऱ्या कंपनीचे तिकीट दर तुलनेने कमी आहे. पुण्याहून सुमारे चार मार्गावर उडान सेवा सुरु आहे. यात पुणे - नांदेडचा देखील समावेश होता. पुणे - नांदेड विमानसेवा ही आठवड्यातून तीन दिवस होती. पुण्याहून (एस ५-२५०) हे विमान दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण घेत, नांदेडला सायंकाळी ६ वाजता पोचत.

नांदेडहून (एस५-२४९ ) हे विमान सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी उड्डाण घेत, पुण्याला रात्री ७ वाजून ४५ मिनिटांनी पोचत असे. ही सेवा सोमवार, बुधवार व शुक्रवार अशी तीन दिवस सुरु असायची. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत होता.