Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

कऱ्हाडसाहेब, औरंगाबादकरांना नकोय ग्लो गार्डन आहेत ती उद्याने जरी..

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : पालिका प्रशासनातील अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे औरंगाबादेतील उद्यानांची स्थिती विदारक झाली आहे. पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान; कॅटली गार्डन, कॅनाॅट गार्डन, सिडको एन - १ सी सेक्टर, हडकोतील वाहतूक उद्यान, ज्योतीनगरातील कवितेची बाग, हडको नवजीवन काॅलनीतील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल परिसरातील उद्यान, हर्सुल तलावाला लागून असलेले स्मृती उद्यान, सलीम अली सरोवर परिसरातील रोज गार्डन, ज्युबली पार्क येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, सिद्धार्थ उद्यानातील वाहतूक उद्यान, मजनुहिल परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यान यासारख्या मोठ्या व जवळपास ११० उद्यानांना  स्मशानकळा आली आहे. हिरव्यागार लॉनऐवजी उकिरड्यांचे प्रस्त वाढले असल्याने खेळण्यासाठी येणाऱ्या बाळगोपाळांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

असा होतोय परिणाम

शहरात महापालिकेच्या मालकीचे १०० पेक्षा अधिक उद्याने आहेत. यातील बोटावर मोजण्याएवढीच उद्याने चांगली आहेत. १७ लाख लोकसंख्येच्या शहरात बच्चे कंपनीसाठी चांगले उद्यान म्हणजे सिद्धार्थ उद्यान होय. अनेक पालकांना सिद्धार्थ उद्यान लांब पडते.

शहरातील बच्चे कंपनीला खेळण्यासाठी फारशी मैदाने नाहीत. चांगली उद्याने नाहीत. करमणुकीसाठी मुलांना शहरात जास्त वाव नाही. परिणामी लहान मुले मोबाईल आणि इंटरनेटच्या विळख्यात सापडत चालली आहेत. पालकांची ही अडचण लक्षात घेऊन मनपा प्रशासकांनी एकाच मोठ्या उद्यानावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा शहरातील विविध भागात असलेल्या उद्यानांसाठी निधी द्या, असे केंद्रीय मंत्री कऱ्हाडांना म्हणणे वावगे होणार नाही.

अपुरा कर्मचारी वर्ग

औरंगाबाद महापालिकेतील उद्यान विभागात केवळ ११० माळी आहेत. एकाच उद्यान अधीक्षकावर वृक्षलागवड अधिकाऱ्याचा भार आहे. त्यात कार्यालयीन कनिष्ठ लिपीक एकच आहे. इतक्या मोठ्या उद्यानांसाठी एकच कनिष्ठ अभियंता आहे. दुसरीकडे नाही म्हणायला उद्यान विभागातील कामकाजासाठी कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत. मात्र त्यांचा पगार सहा - सहा महिने होत नाही. 

खाजगी ठेकेदारांची नियुक्ती बंद

सिडकोच्या तत्वानुसार काही वर्षांपूर्वी मोठ्या उद्यानांच्या देखभाल दुरूस्तीसाठी खाजगी ठेकेदारांची नेमणूक निधी अभावी बंद असल्याने उद्यानांच्या देखभालीकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.  

उद्यानांना स्मशानकळा

सद्यस्थितीत पालिकेच्या सर्वच मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या उद्यानाची दुरवस्था झालेली आहे. प्रवेशद्वारापासून तर तटबंदीपासून समस्यांना सुरूवात होते. येथे असलेल्या बोटावर मोजण्याइतक्या खेळण्यांची मोडतोड झालेली आहे. घसरगुंडीच्या खाली भले मोठे खड्डे आहेत. यामुळे बहुतांश उद्यानात घसरगुंडी चांगल्या स्थितीत असतानाही तिचा वापर होत नाही. झोपाळे, पाळणे, सी-सॉ या खेळण्यांची मोडतोड होऊन अनेक वर्षे उलटले, मात्र कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. उद्यानात प्रवेश केल्यावरच अक्षरश: उकिरड्यांचे दर्शन होते. पालिकेने काही वर्षापूर्वी सिद्धार्थ उद्यानात संगीतावर चालणारा कारंजा बसविला. मात्र तो गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून बंदावस्थेत आहे. शहरातील काही उद्यानातील पाण्याची पाइपलाइन पूर्णपणे जीर्ण झालेली आहे. काही उद्यानात पाण्याची सोय आहे. मात्र पाइप नाही, काही उद्यानात वीज उपलब्ध नाही. अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने उद्यानांची स्वच्छता देखील करण्यात येत नसल्याने औरंगाबादेतील ही उद्याने की स्मशाने, असा प्रश्न पडतो.

बच्चे कंपनीची मिनी ट्रेन बंद 

सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालय परिसरातील मिनी ट्रेन बंद झाल्याने बालगोपाळांचे आकर्षण कमी झाले. सिडको एन-८ येथील पे अँड प्ले तत्त्वावर असलेली मिनी ट्रेन गत पंधरा वर्षांपासून झाडाझुडपात अडकली आहे. यामुळे शहरातील बालगोपाळांच्या आनंदावर विरजन पडले आहे. यापूर्वी सिडकोच्या काळात अद्ययावत असलेल्या उद्यानांत आता खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी, तसेच उंट आणि घोड्याची सवारी, प्रवेशद्वारावरच खाऊकट्टे आणि मिकी-माऊसचे  चिमुरड्यांना असलेले आकर्षण कुठेही दिसत नाही. 

पालिकेच्या माध्यमातून शहरातील मोठ्या उद्यानासह इतर उद्यानांसाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद ठेवली जात नसल्याने डागडुजी देखील करण्यात येत नाही. रस्ते, गटारी, कारंजे, पथदिव्यांच्या कामासोबत हौदांची स्वच्छता, गवत काढणे व झाडांची कटाई देखील केली जात नाही. ज्या शहरात उद्यानांची ही स्थिती असेल तिथे चिमुरड्यांच्या बुद्धिमत्तेत भर कशी पडेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

एकीकडे शहरातील बच्चे कंपनीला खेळण्यासाठी फारशी मैदाने नाहीत. चांगली उद्याने नाहीत. करमणुकीसाठी मुलांना शहरात जास्त वाव नाही. असे असताना केंद्र शासनाच्या निधीतून शहरात गुजरातच्या धर्तीवर ग्लो गार्डन विकसित करण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांना दिला आहे. त्यासाठी तीन एकर जागेची गरज असून, जमीन उपलब्ध झाल्यास सुमारे तीन हजार नागरिकांची करमणूक होईल असे उद्यान विकसित करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यासाठी कलाग्राम भागात तीन एकर जागा मिळावी, असा उल्लेख त्यांनी प्रस्तावात केला आहे.

औरंगाबादकरांना नकोय ग्लो गार्डन

काॅलनी परीसरातील आहे त्या उद्यानांची स्मशानकळा दूर करा, मगच ग्लो गार्डनची उभारणी करा असा सूर औरंगाबादेत उमटत आहे. याचे कारण म्हणजे कराड मंत्री झाल्यानंतर त्यांनी सलीम अली सरोवर आणि हर्सूल तलावातील बंद पडलेली बोटिंगची सुविधा सुरू करण्यासाठी हालचाली करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हर्सुल व जायकवाडी धरणात उजनीच्या धर्तीवर तरंगता सौर उर्जा प्रकल्प साकार करण्याची देखील त्यांनी घोषणा केली होती. यापैकी सर्वच प्रस्ताव लालफितीत अडकलेले असताना आता मला तुम्ही तीन एकर जागा द्या, मी केंद्राकडून निधी आणून ग्लो गार्डन विकसित करून देतो, असा प्रस्ताव त्यांनी प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांना दिला. मात्र मागच्या प्रस्तावांचा फुसका बार पाहाता आता औरंगाबादकर विश्वास ठेवत नाहीत.

तत्कालीन मनपा आयुक्तांचा प्रयोग फसला

तत्कालीन मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून शहरात पाच बालोद्यान विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. या कामासाठी सुमारे २५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. २०१६ -१७ च्या अर्थसंकल्पात निधीसाठी तरतूदही करण्यात आली होती. त्यानुसार बच्चे कंपनीला खेळण्यासाठी सिडको एन-१, बीडबायपास परिसरातील संग्रामनगर, गारखेड्यातील अलंकार सोसायटी, भावसिंगपुरा परिसरातील नंदनवन कॉलनी आणि मजनू हिल टिव्ही सेंटर रोडवरील स्वामी विवेकानंद उद्यानात अशा पाच ठिकाणी बालोद्याने विकसित करण्यात आली होती. प्रत्येक उद्यानाच्या विकासासाठी स्वतंत्रपणे ५ लाखांची तरतूद केली होती. पाच उद्यानांवर २५ लाखाचा चुराडा करण्यात आला. मात्र महापालिका उद्यान विभागात सुरक्षारक्षक हे पदच नसल्याने हा प्रयोग अयशस्वी झाला.