Sambhajinagar Municipal Corporation
Sambhajinagar Municipal Corporation Tendernama
मराठवाडा

Good News : संभाजीनगरातील मोठे नाले होणार स्वच्छ! 'हे' आहे कारण...

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिकेने भूमिगत गटार योजनेंतर्गत सुमारे साडेचारशे कोटी रुपये खर्च करून शहरात मुख्य मलजल निःसारण वाहिन्या टाकल्या. तीन ठिकाणी मोठे एसटीपी प्लांट उभारले. पण, शहरातील नाल्यातून वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी बंद झालेले नाही. परिणामी शहरातील कुठल्याही भागात फिरताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.

याशिवाय नाल्याकाठी राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्यावतीने एक रामबाण उपाय साकार करण्यासाठी सकारात्मक पाउल उचलले आहे.

महानगरपालिका मलनिःसारण विभागामार्फत शहरातील नागेश्वरवाडी, गांधीनगर महानगरपालिका शाळेलगत तसेच पुष्प नगरीच्या बाजुला नाल्यांवर प्रत्येकी २ एमएलडी अर्थात प्रतिदिन २० लाख लिटर अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सिव्हरेज ट्रीटमेंट प्लॅंट उभारणार आहे. याद्वारे प्रतिदिन २० लाख अस्वच्छ पाण्याचा उपसा केला जाणार आहे.‌ त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून ते पून्हा नाल्यात सोडले जाणार आहे.यामुळे लोकल प्रदुषण कमी होईल, असा दावा महानगरपालिकेने केला आहे. या कामावर तब्बल दहा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

याकामाचे टेंडर आचारसंहितेपूर्वी काढण्यात आले होते.‌ सिव्हरेज ट्रिटमेंट प्रकल्पाचे हे काम पुण्याच्या लाइफ फंस्ट या कंपनीला देण्यात आले आहे.‌ त्याला वर्क ऑर्डर देखील देण्यात आली आहे. यातील प्रत्येक प्लॅंटसाठी सव्वातीन कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.‌ यासाठी १५ वित्त आयोगातून मिळालेल्या निधीचा वापर केला जाणार आहे. यात सदर कंपनीकडे पाच वर्ष देखभाल दुरुस्तीची जबाबदारी राहणार आहे. महानगरपालिकेकडे टेंडरच्या अटीशर्तीनुसार केवळ वीज बिल भरण्याची जबाबदारी राहणार आहे.

महानगरपालिकेची शहरातील ड्रेनेज व्यवस्था जुनी झाल्यामुळे ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी शहरातील नाल्यांद्वारे खाम व सुखना नदीतून वाहत होते. त्यामुळे केंद्र शासनाच्या निधीतून सुमारे साडेचारशे कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजना राबविण्यात आली. त्यात झाल्टाफाटा, पडेगाव व कांचनवाडी भागात तीन एसटीपी (मल जल प्रक्रिया प्रकल्प) प्लांट उभारले. त्यानंतरही शहरातील नाल्यांमधून घाण पाणी वाहतच आहे. त्यामुळे आता छोटे म्हणजेच दोन एमएलडी क्षमतेचे आणखी तीन एसटीपी प्लांट उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नाल्यातून वाहणारे घाण पाणी स्वच्छ होईल.

यासाठी ४० बाय ८ फुटाचे कंटेनर राहणार आहेत. त्यात सर्व मशिनरी राहील. नाल्यालगत ओटे बांधून त्यावर कंटेनर ठेवले जाणार आहेत.‌ त्यातून एक पाईप नाल्यात सोडला जाणार आहे.‌ त्यातून नाल्यातील पाणी उचलून मलजल प्रकल्पात उचलून स्वच्छ केले जाणार आहे.‌ याठिकाणी टँकरचा देखील पाॅईंट केला जाणार आहे. तेथे जांभळ्या रंगाचे टँकर उभे केले जाणार आहेत. महानगरपालिकेकडे सहा टँकर आहेत.‌ यात २० हजार लिटरचे दोन व १२ हजार लिटरचे चार टँकर आहेत.‌ याशिवाय सिव्हरेज ट्रिटमेंट प्लॅंट शेजारीच कर्मचाऱ्यांसाठी खोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे.‌

या तीनही एसटीपी प्लांटचे आऊटलेट उपलब्ध करून दिले जाणार आहे. सध्या कांचनवाडी , झाल्टा व पडेगाव येथील एसटीपीचे पाणी बांधकाम व्यावसायिक, वीटभट्टी चालविणाऱ्यांसह इतर कामांसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. पण, हे भाग लांब असल्याने अनेक जण त्याठिकाणी जाण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे शहरात तीन ठिकाणी एसटीपीचे पाणी उपलब्ध करून दिले जाईल; तसेच सिद्धार्थ उद्यानालाही या पाण्याचा फायदा होईल. तसेच रस्ते धुण्यासाठी व रस्त्यांच्या क्युरींगसाठी व शहरातील इतर उद्यानांसाठी या पाण्याचा वापर होणार आहे.‌ बांधकाम व्यावसायिकांना ५०० लिटर पाणी एक हजार रुपयात विक्री करून प्लॅंटचा देखभाल दुरुस्तीसाठीचा खर्च भागवता येईल, असे एका विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.