Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad : अखेर 'त्या' पाच हजार कोटीच्या रस्त्याची शोभा वाढणार

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११ जुना बीडबाय व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५२ धुळे-सोलापूर हायवे, या जवळपास पाच हजार कोटीच्या रस्त्यांची आता खऱ्या अर्थाने शोभा वाढणार आहे.

कारण या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांना जोडणारे  झाल्टा फाटा ते निपानी तसेच आडगावफाटा ते सोलापूर-धुळे या नवीन बायपासला जोडणाऱ्या दोन्ही रस्त्यांचे तब्बल तीस वर्षांनंतर नशीब उजळले. यासंदर्भात टेंडरनामाने १७ डिसेंबर २०२२ रोजी वृत्तप्रकाशित केले होते. एवढेच नव्हेतर सार्वजनिक बांधकाम विभागातील जागतिक बँक प्रकल्प शाखेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या रस्त्यांचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

याच रस्त्यांच्या मागेपुढे एकबाजुने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ बीडबाय व पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ सोलापूर-धुळे हे तब्बल पाच हजार कोटीतून भव्य रस्ते बांधले गेले. मात्र याच रस्त्यांच्या दोन्ही बाजूला निपानी ते झाल्टा फाटा तसेच आडगाव फाटा ते सोलापूर हायवेला जोडणारे हे रस्ते येण्या-जाण्यासाठी अद्याप बनविलेले नव्हते. त्यामुळे पाच हजार कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय महामार्ग बांधले, मात्र या दोन्ही महामार्गांचा उपयोग होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता.

यासंदर्भात टेंडरनामाने वृत्तमालिका प्रकाशित केली. दरम्यान भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र निपानी-झाल्टाफाटा हा १८०० मीटरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागातील जागतिक बॅंक प्रकल्प शाखेकडे हस्तांतरीत केल्याचा खुलासा तेथील अधिकाऱ्यांनी केला होता. त्यानंतर  सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जागतिक बॅंक प्रकल्प शाखेकडे पाठपुरावा केला असता तेथील अधिकाऱ्यांनी रस्ता हस्तांतर झाला म्हणजे लगेच काम होत नसते, त्याची वेगळी प्रशासकीय प्रक्रीया असते, यासर्व कालावधीसाठी खुप वेळ लागेल असे म्हणत कागदी कारवाईची कारणे पुढे केली.

मात्र, दरम्यानच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच मार्गाने पैठणला गेले होते. तेव्हा जागतिक बँक प्रकल्पाने रस्त्याची थातुरमातूर मलमपट्टी केली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांसाठी रस्ता दुरूस्तीची लगीनघाई, सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित करणारे वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान विभागाने तातडीने या दोन्ही रस्त्याचा प्रश्न निकाली काढला. टेंडरनामा प्रतिनिधीने रविवारी या रस्त्याची पुर्नपाहणी केली असता सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे सेंटरपासन दोन्ही बाजुने १५ मीटर रूंदीकरण करून खोदकाम करून रस्त्याचे चांगल्या पद्धतीने काम होत असल्याने ग्रामस्थ देखील समाधान व्यक्त करताना दिसून आले.