Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : फुटपाथ नव्हे यमदूत; शहरातील 'या' रस्त्यालगतची व्यथा

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडकोतील जालना रोड-एपीआय क्वार्नर-भारत बाजार-प्रोझोन माॅल-गरवारे क्रीडा संकुल-कलाग्राम-चिकलठाणा औद्योगिक वसाहत ते ग्रामीण महावितरण कार्यालय-नारेगाव फाटा या अत्यंत रहदारीच्या महामार्गालगत फुटपाथची दुरवस्था झाली आहे. फुटपाथवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नव्यानेच केलेला हा फुटपाथ जीवघेणा बनला आहे. त्यातून मार्ग काढताना वाहनधारक व पादचाऱ्यांची अक्षरशः त्रेधा उडत आहे. खड्ड्यांचा हा घाव वाहनधारकांना सोसवत नाहीत. खड्डे सुरक्षित करण्यासाठी सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना कुठलेही सामाजिक दायित्व निभवावे असे वाटत नाही, असे या महामार्गालगत असलेल्या फुटपाथवरील जागोजागी असे महाकाय यमदुत पाहून सहज लक्षात येते. गेल्या सहा महिन्यांपासून ही समस्या असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

एपीआय कॉर्नर ते कलाग्राम रस्त्याची चाळीस वर्षांपासून अक्षरशः धूळधाण उडाली होती. या रस्त्यावर अपघात नित्याचेच झाले होते. आतापर्यंत शेकडो अपघात होऊन असंख्य वाहनधारकांचा बळी गेला आहे. मात्र, त्याकडे अधिकाऱ्यांचेअक्षम्य दुर्लक्ष होत आहे.अडीच वर्षांपूर्वी या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम मार्गी लागले. यासाठी सात कोटी रूपये खर्च करण्यात आले. जळगावच्या लक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर आणि जाॅईंट व्हेंचर कंपनीने गुळगुळीत रस्ता केला. फुटपाथ चांगल्याप्रकारे केला. यानंतर एमआयडीसीने बारा महिन्यांचा देखभाल दुरुस्तीचा कालावधी संपल्यानंतर पुढील देखभाल व दुरुस्तीसाठी रस्ता महानगरपालिकेकडे हस्तांतरित केला.मात्र महानगरपालिकेने डागडुजी करण्याऐवजी ड्रेनेजलाईन व जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता आणि फुटपाथ खोदला. या मार्गावर खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला नाही. परिणामी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेला हा रस्ता पुन्हा मृत्युचा महामार्ग केला.

फुटपाथ खड्ड्यात की खड्डा...

फुटपाथमध्ये इतके खड्डे झाले की फुटपाथ मध्ये खड्डे आहे की खड्ड्यात फुटपाथ हेच कळत नाही. अपघाताच्या घडणाऱ्या घटना पाहता वाहनधारक, तसेच नागरिक व व्यावसायिक सतत पाठपुरावा करतात. यापूर्वी याच मार्गावर अपघात रोखण्यासाठी महापालिकेने तीन कोटी रुपये खर्च करून रस्त्याच्या मधोमध बोलार्ड लावून दुभाजक तयार केल्याचा व सायकल ट्रॅक तयार प्रयत्न केला. मात्र, सततच्या रहदारीमुळे बोलार्ड कोळशाहून अधिक काळे पडले अधिकाधिक बोलार्ड उखडुन रस्त्याचे विद्रुपीकरण करण्यात आले. एकीकडे हा प्रताप वाया गेल्यानंतर चार महिन्यांपूर्वी प्रोझोन माॅलसमोर दहा लाखाचे विनाटेंडर काम करत भूमिगत मलनिःसारण वाहिनीसाठी रस्ता खोदण्यात आला. त्यामुळे खड्ड्यात भर पडली. त्यानंतर फुटपाथखालील नालासफाईसाठी चेंबरचे ढापे फोडून पुन्हा खड्डे तयार झाले. परिणामी फुटपाथवर आणि रस्त्यावर महानगरपालिका निर्मित पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांतून वाट काढताना वाहनचालकांचा अपघात होत आहे.