Jalna Road Aurangabad
Jalna Road Aurangabad Tendernama
मराठवाडा

MGP, PWDच्या दुर्लक्षामुळे जालना रोडच्या 'या' कामाला दर्जाच नाही

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : नवीन पाणीपुरवठा योजनेचा ठेकेदार (Contractor) हा स्थानिक कामगारांकडून निकृष्टदर्जाचे काम करत आहे. असे असले तरी त्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MGP) आणि सार्वजनिक बांधकाम विभागासह (PWD) मनपा अधिकारी मात्र दुर्लक्ष करत आहेत.

मागील आठ दिवसांपासून औरंगाबाद नवीन पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन भूमीगत जलवाहिनीसाठी उखडलेल्या जालना रस्त्याचे काम चिकलठाणा विमानतळासमोरील रामनगर ते विठ्ठलनगर आणि चिकलठाणा पोलिस पेट्रोलपंपासमोर गत आठवड्यापासून सुरू झाले. मात्र पॅव्हरब्लाॅक बसविण्यासाठी ठेकेदाराला दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक असलेले मुरूम आणि खडीने मजबुतीकरण न करता उकरलेली माती टाकून त्यावर बारीक खडीचा चुरा टाकून जुने पेव्हरब्लाॅक बसविने सुरू आहे. कुठलीही मोजपाप न करता ठेकेदार कामगारांकडून हाताने ओबडधोबड काम करून घेत आहे. निकृष्ट पणे होत असलेल्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व एमजीपीचे अधिकारी मात्र दुर्लक्ष करत आहेत. एमजीपीने शहरात जवळपास जलवाहिनी खोदण्यासाठी अडीच हजार किलोमीटर खोदकाम सुरू केले आहे. त्यातही अशाच पध्दतीने काम केले, तर शहराच्या विद्रूपीकरणात भर पडणार हे मात्र निश्चित.

जालना रस्त्याच्या नियोजित कामामध्ये मुकुंदवाडी ते चिकलठाण्या हद्दीत चिकलठाणा एमआयडीसीच्या बाजुने जवळपास तीन किलोमीटर अंतराचा टप्प्यात जलवाहिनी टाकण्याचे काम एमजीपीने केले. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची देखील परवानगी घेतली नाही. तरीही दिलेल्या सूचनांप्रमाणे ठेकेदाराने सदर पेव्हरब्लाॅक बसविण्याआधी खडीकरण मजबुतीकरण बंधनकारक आहे. परंतु ठेकेदार मुरूम व खडीचा वापर न करता रस्त्याआड पडलेल्या मातीचे ढिगारे कोरून त्यात ओतत आहे. दुसरीकडे धूत हाॅस्पीटलच्या ते जिल्हा सामान्य रुग्णालयादरम्यान जलवाहिनीवर थातूरमातूर डांबराची पट्टी मारण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालय ते चिकलठाणा पोलिस स्टेशनसमोर जलवाहिनी टाकल्यानंतर मातीचे ढिगाऱ्यांनी लेव्हल न केल्याने वाहनधारकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम सुरू आहे. गट्टू बसवल्यानंतर दबाई करण्यासाठी व्हायब्रेटर मशीनचा वापर न करता हातानेच काम होत असल्याने गट्टू खालीवर दिसत आहेत. गट्टू बसवल्यानंतर खटक्यांमध्ये सिमेंट भरले जात नसल्याने खटक्या उघड्या पडून गट्टू निखळत आहेत. अगोदरच कामाला होणारा विलंब आणि आता जी -२० निमित्त येणाऱ्या विदेशी पाहुण्यांच्या स्वागताच्या तोंडावर सुरू असलेले निकृष्ट काम यावर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमजीपी का कारवाई करत नाही? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एमजीपीचा मूळ ठेकेदार जीव्हीपीआर कंपनीकडून आम्ही मजुरीने काम घेतले आहे. कंपनीने जे साहित्य दिले, त्यानुसारच आम्ही काम करत आहोत, असे ठेकेदार इम्रान व शोएब यांनी सांगितले. मात्र येथे काम करत असलेल्या मजुराला प्रतिनिधीने विचारले असता सातशे रूपये ब्रासने साठ ब्रासचे हे काम आम्ही शोएबकडून घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावर प्रतिनिधीने जीव्हीपीआरचे प्रकल्प व्यवस्थापक निर्णय अग्रवाल यांना विचारले असता तातडीने वितरण टीमशी मी संपर्क करून, असे प्रकार होऊ देणार नसल्याची कबुली त्यांनी दिली.