Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : बीडबायपासला अतिक्रमांचा विळखा; कोट्यवधी खर्च करून मृत्युचा महामार्ग कायम

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील सातारा-देवळाईच्या दिशेने जाणाऱ्या बीड बायपास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११ या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या आठवड्यातच या महामार्गावर तीन भावंडांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण मराठवाडा हादरला. पाठोपाठ त्याच दिवशी झाल्टा फाटा येथे काही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. यापूर्वी महामार्गाचे काम चालू असतानाच कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा मृत्यु झाला. त्यापाठोपाठ संग्रामनगर उड्डाणपुलाच्या धावपट्टीच्या उतारासमोरच दुभाजकाला धडकून एका महावितरणच्या तरूण अभियंत्याचा बळी गेला. त्यापाठोपाठ गेल्या पावसाळ्यात एमआयटी चौकात खड्ड्यात साचलेल्या पाण्यातून वाट काढताना एचडीएफसीच्या एका तरूण व्यस्थापकाचा बळी गेला. दोन महिन्यांपूर्वी बीड बायपास राजेशनगर भागातील एका व्यक्तीचा झाल्टा फाट्यावर अपघातात मृत्यू झाला.

अत्यंत चुकीच्या आराखड्याने व कासवगतीने बायपासचे काम चालू असतानाच तब्बल ११ बळी घेतले. यातच आता एकीकडे महामार्गाचे काम अर्धवट असताना महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणांचा मोठा बोलबाला वाढला आहे. लहान-मोठ्या फेरीवाल्यांचे व चहा-नाश्ता, बदामशेक व आईस्क्रीम विक्रेते आणि मांस विक्रेत्यांसह रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या व्यापारी प्रतिष्ठानसमोर अनधिकृत वाहनतळांनी महामार्गाचा गळा घोटला आहे. बीड बायपासवरील अतिक्रमणे दूर करण्याची मागणी सातारा-देवळाई परिसरातील जनसेवा कृती समिती, राजेशनगर कृती समिती, संघर्ष समिती, जनसेवा महिला समिती व शिवछत्रपती क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी केली आहे. सातारा-देवळाईच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था सध्या अत्यंत धोकादायक झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहराच्या दक्षिणेकडून जाणारा हा २० किलोमीटरचा महामार्ग धोकादायक ठरत आहे. अपघातात शेकडो बळी गेल्यानंतर बीड बायपासच्या रूंदीकरणाची मागणी पुढे आली. सातारा-देवळाई व बीडबायपासकरांनी आक्रोश मोर्चे काढले. त्यामुळे शासनस्तरावर निर्णय होऊन त्यामुळे सातारा, देवळाई परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला.

शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीस पर्याय म्हणून बनविलेल्या बीड बाह्यवळण (बायपास) रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी हायब्रीड अन्यूटी उपक्रमातून या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचा ठराव संमत करण्यात आला. इस्टिमेट तयार केले गेले. त्याअंतर्गत जवळपास ४०० कोटी टप्प्याटप्प्याने मंजुर करण्यात आले. टेंडर प्रक्रियेनंतर 'जीएनआय मनजीत जॉइंट व्हेंचर'ला हे काम मिळाले आणि बीड बायपासचे काम सुरु झाले. पैठण जंक्शन महानुभाव चौक आश्रम ते झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज नाका ते निपानी-आडगाव फाटा रस्ता काँक्रिटचा करण्यात आला. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी देवळाई चौक, संग्रामनगर व एमआयटी चौकात उड्डाणपूल उभारले गेले. मात्र, अंडरपासची कमी उंची आणि जोड रस्त्यांचे लचके तोडल्याने कोंडीत भर पडली. महानुभाव चौक ते झाल्टा फाटा, झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज चौक, झाल्टा फाटा ते निपानी फाटा बीड बायपास महामार्गाची राष्ट्रीय मृत्युचा महामार्ग म्हणून ओळख झाली होती. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११चा एक टप्पा शहरातून (जालना रोड) जातो. या रस्त्यावरून जड वाहतूक बंद करून ती शहराबाहेरून वळविण्यासाठी बीड बायपासची निर्मिती झाली होती. त्यामुळे नांदेड, जालना तसेच बीडकडून येणारी वाहने शहराबाहेरून पुणे, मुंबई, नाशिककडे जातात, त्या वाहनांमुळे रस्ता ओलांडून जाणाऱ्या नागरिकांना अडचणी येत होत्या.

रस्ता मजबुतीकरणानंतर हा त्रास कमी होणार असा सरकारने दावा केला होता. मात्र आयआरसी (इंडियन रोड काँग्रेसचे) नियम धाब्यावर ठेवत टक्केवारीत रस्त्याचे वाटोळे केले. चुकीच्या आराखड्याने रस्ता तयार केल्याने 'हायब्रीड ॲन्यूटी' प्रकल्पातून हा रस्ता मजबूत करताना पुरेशी क्युरींग, खोदकाम आणि धम्मसकडे लक्ष न दिल्याने काम चालू असतानाच रस्त्यावर आरपार भेगा पडल्या. यावर टेंडरनामाने सातत्याने प्रहार केल्यानंतर कंत्राटदाराने दुरूस्तीचे काम हाती घेतले. तांत्रिकदृष्टया बीड बायपास अडचणीचा ठरू लागलेला आहे. परिणामी सातारा-देवळाई व बीड बायपासकरांच्या जीवघेण्या स्पर्धेत अधिक वाढ झाली आहे. त्यात लग्नसमांरभाच्या दाट तिथीमुळे तर या राष्ट्रीय महामार्गावरून पायी चालणे देखील अवघड होत आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून देखील हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलपंप, बँका, शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालये, खासगी प्रतिष्ठाने यामुळे महामार्गाच्या दोघा बाजुंना दुचाकी व चारचाकी वाहने, हॉकर्स, रिक्षा, अनाधिकृत खासगी वाहतुकीने महामार्गाचीच कोंडी झाली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जागतिक बॅंक प्रकल्प शाखा, पोलिस व महापालिका पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. बीड बायपास निर्मितीच्या विकासकामावरून स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. मात्र कुणालाही या समस्यांकडे पाहण्याची गरज वाटत नाही.