औरंगाबाद (Aurangabad) : शिवाजीनगर रेल्वेगेट क्रमांक ५५ येथील पहिल्या व दुसऱ्या बाजूने रस्त्यालगत जीवघेने खड्डे मौत का कुआ ठरत आहेत. ते तातडीने बुजवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून या रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूने पाच ते सहा फूट खड्डे खोदुन ठेवल्याने आधीच कोंडीत अडकलेल्या वाहनधारकांना जीव धोक्यात टाकून रेल्वे क्राॅसिंग ओलांडावे लागत आहे. डाव्या आणि उजव्या बाजूलाच हे जीवघेने खड्डे कोणत्या यंत्रणेने खोदून ठेवले आहेत.
रेल्वे प्रशासन अनभिज्ञ
असंख्य नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रतिनिधीने आज सकाळी रेल्वेगेट गाठले. गेटकिपरला खड्ड्यांबाबत माहिती विचारली असता रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही खोदकाम केले गेले नसल्याचे तो म्हणाला. मात्र, सदर खोदकाम हे रेल्वे रूळाच्या ३० मीटर हद्दीत असल्याने येथे कोणतेही काम करायचे असेल, तर रेल्वे प्रशासनाची नोंद घ्यावी लागते. रेल्वेच्या निकषाप्रमाणे सावधानतेचे फलक लावावे लागतात. रेल्वेच्या सुरक्षाबलाकडे (RPF) त्याची माहिती द्यावी लागते. संबंधित यंत्रणेच्या कामाची माहिती रेल्वे प्रशासनाकडून गेट किपरच्या गेट डायरीत नोंदवावी लागते. मात्र, त्याची अशी कुठेही नोंद नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या परवानगीविना हे काम झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथे अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पादचाऱ्यांचा जीव मुठीत
रेल्वेगेट खुलताच दोन्ही बाजूने वाहनधारकांची रस्ता शोधण्यासाठी धावपळ उडते. दरम्यान, येथे पादचाऱ्यांना जाण्यासाठीसुद्धा जागा शिल्लक राहत नाही. कोंडीतून या अरूंद रस्त्यावरून साधी सायकलही जावू शकत नाही. यातच कोंडीतून मार्ग काढताना पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. पादचारी कोंडी टाळण्यासाठी रेल्वेगेटच्या कानाकोपऱ्यातून मार्ग शोधताना दिसतात. अरुंद अशा जागेतून अलिकडून पलिकडून जाताना उतारावरच दोन मोठे खड्डे टाळणे कठीण होते व वळसा कोठून कसा घालवावा असा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे. चारचाकी व मोठ्या वाहनांसाठी हे खड्डे धोकादायक ठरत आहेत. खड्डे तातडीने बुजवावेत, याबाबत वाहनधारकांनी गेट किपरला तक्रारी केल्या आहेत. किमान खड्ड्याच्या आजूबाजूला बॅरिकेड्स लावले जावे, अशी मागणी होत आहे.
आधीच कोंडी त्यात खड्ड्यांची भर
सततच्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या औरंगाबादकरांचा मनपा प्रशासनाच्या चालढकल वृत्तीमुळे येथील भुयारी मार्ग पूर्ण होईल, अशी सुतराम शक्यता दिसत नसताना आता दोन्ही बाजूने हे जीवघेणे खड्डे कुणी, कशासाठी खोदले हे रेल्वे प्रशासनाला माहित नसावे हा मोठा प्रश्न आहे.
- ॲड. शिवराज कडू
बॅरिकेड्स तरी ठेवावीत
आधीच शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी या भागातील नागरिकांना सोबत घेऊन जिल्हा प्रशासनासह रेल्वे, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी निवेदने देऊन लक्ष वेधले आहे; परंतु अद्यापही शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाचा प्रश्न या ना त्या तांत्रिक कारणांनी लालफितीतच अडकला आहे. आता या जीवघेण्या खड्ड्यांची तक्रार कुणाकडे करावी. कारण गेटकिपरकडे चौकशी केली, त्याच्या डायरीत नोंद नाही. ज्याने हा निष्काळजीपणा केला असेल, त्याने निदान काम होईपर्यंत सुरक्षासाधने तरी लावावीत.
- बद्रिनाथ थोरात, मुख्याध्यापक
तर, आम्ही बूजवू
त्रस्त नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध फुटण्याआधीच आता संबंधिताने तातडीने ते ऐन रेल्वेगेटच्या उतारावरील दोन्ही खड्डे बूजवावेत, अन्यथा आम्ही ते दोन दिवसात बूजवू
- सोमीनाथ शिराणे , संघर्ष समिती , अध्यक्ष
ही औरंगाबादकरांची थट्टा
आधीच शिवाजीनगर रेल्वेगेट भुयारी मार्गासाठी गत वीस वर्षापासून टोलवाटोलवी करत शासकीय यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने भुयारी मार्गाचे काम अद्यापही थंड बस्त्यातच अडकले आहे. काही ना काही तांत्रिक अडचणींचा पाढा वाचत टोलवाटोलवीचे धोरण अवलंबिले जात असल्याने नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नाला हरताळ फासला जात आहे. भुयारी मार्गाचा प्रश्न प्रलंबित असताना पून्हा त्याच मार्गावर असे जीवघेने खड्डे उकरून कोणतेही सुरक्षा साधन न ठेवने ही औरंगाबादकरांची मोठी थट्टा आहे.
- पद्मसिंह राजपुत, उद्योजक