Dr. Bhagwat Karad
Dr. Bhagwat Karad Tendernama
मराठवाडा

जायकवाडी सौरउर्जा प्रकल्प : मंत्री कऱ्हाडांचा पुन्हा पत्रप्रपंच

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कऱ्हाड यांनी जायकवाडी धरणात दोन हजार एकरावर सौर उर्जा प्रकल्प साकार करण्यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. मंगळवारी त्यांनी या प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांसह केंद्रीय उर्जामंत्री यांना पत्र दिले आहे. सोबतच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली आहे. त्यावर मंत्रीमंडळ बैठकीत इको सेन्सिटिव्ह झोनचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिल्याचा दावा कऱ्हाड यांनी केला आहे. जायकवाडी धरणावर सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास  विजेच्या उपलब्धतेसह दरवर्षी आठ टीमसी पाण्याचे बाष्पीभवन थांबेल. असा पत्रात उल्लेख करत त्यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, केंद्रीय उर्जामंत्र्यांसह राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले आहे. 

देशात ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजमुळे भविष्यात मोठ्या अडचणी वाढणार आहेत. देश विकासाच्या मार्गाने पुढे जात असताना अनेक समस्या निर्माण होत आहेत. यामध्ये ऊर्जास्त्रोतांचा पर्यायी स्त्रोत कोणता याच्यासाठी अभ्यास सुरु आहे. नैसर्गिक संपत्तीचा अधिक वापर होत असल्यामुळे त्याची टंचाई येत्या काळात निर्माण होणार आहे. यामुळे हरित ऊर्जेचे प्रकल्प उभारण्यावर देशात भर दिला जात आहे. महाराष्ट्रातही सौर ऊर्जेचा वापर करुन मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करण्यासाठी कऱ्हाड हे पुढाकार घेत आहेत. त्याचा एक भाग म्हणून जायकवाडी धरणात २ हजार एकरावर सौर उर्जा प्रकल्प उभारण्यावर कराड यांनी भर दिला आहे. यासाठी गत वर्षभरापासून ते तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी ते केंद्र व राज्यातील मंत्र्यांचीही भेट घेत आहेत. जायकवाडी धरणावर २ हजार एकरावर सौर उर्जा प्रकल्प उभारण्याबाबत त्यांचा सतत पाठपुरावा सुरु असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यापुर्वी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केला पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यामुळे प्रकल्प रखडल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र आता कराड यांनी पुन्हा जोमाने पत्रप्रपंच करत पाठपुरावा सुरू केला आहे. यासंदर्भात केंद्रीय उर्जा मंत्री आर. के. सिंग यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा देखील त्यांनी केली  आहे. महाराष्ट्रात हा उर्जा प्रकल्प झाला तर याचा मोठा फायदा हा शेतकऱ्यांनाही होणार आहे.

असा आहे कऱ्हाडांचा दावा

● जायकवाडी धरणावर सौर उर्जा प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करण्यात येईल. मात्र या प्रकल्पासाठी एकूण ८ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्रात वीज तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही परंतु हा प्रकल्प उभारला तर शेतकऱ्यांना दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला वीज उपलब्ध होईल. सौरउर्जेवर वीजनिर्मिती होणार असल्यामुळे हे कमी खर्चिक असेल आता १२ रुपये प्रती युनिट वीज आहे. जर हा प्रकल्प उभारण्यात आला तर शेतकऱ्यांना ३ रुपये प्रती युनिट वीज मिळेल. हा प्रकल्प पाण्यावर तरंगणारा असल्यामुळे जमिनी ताब्यात घेणे अशा प्रक्रिया कराव्या लागणार नाहीत.

● सौरउर्जेच्या निर्मितीमुळे कुठलेही प्रदुषण होत नाही. या प्रकल्पामुळे कुठला आवाजही होत नाही. त्यामुळे जायकवाडीतील इको सेन्सिटिव्ह झोनला काहीही अडचण येणार नाही. या प्रकल्पाचा अभ्यास झाल्यानंतर त्याला राज्याचे मंत्रिमंडळ मंजुरी देईल. दरवर्षी कडक उन्हाळ्यात आठ ते अकरा टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे हा प्रकल्प सुरू झाल्यास बाष्पीभवन होणार नाही. हा प्रकल्प साधारणतः एक ते दोन हजार  मेगावॅटचा असेल. राज्याच्या जलसंपदा विभागाने अभ्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच तज्ज्ञ मंडळी अभ्यास दौऱ्यासाठी येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.