Ajit Pawar Tendernama
मराठवाडा

अजितदादांच्या कार्यकाळात मंजुरी मिळालेल्या बीडमधील 'त्या' प्रकल्पाबाबत सरकारने काय घेतला निर्णय?

बीड जिल्हा क्रीडा संकुलासाठी 25 कोटी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पाठपुरावा ठरला यशस्वी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या उभारणीला गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून, क्रीडा संकुलाच्या २४.९५ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास आणि निधी मंजुरीस मंत्रिमंडळाने मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या कार्यकाळात या क्रीडा संकूलाच्या उभारणीला प्रशासकीय मंजूरी देण्यात आली होती. उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी या क्रीडा संकुलाच्या निधीसाठी सातत्याने केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळेच हा मार्ग मोकळा झाला आहे.

बीड जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या क्रीडा संकुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या क्रीडा संकुलाकरीता यापूर्वी ८ कोटी रुपये इतका निधी आधीच वितरीत करण्यात आला होता. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून सादर करण्यात आलेल्या २४.९९ कोटी रुपये किमतीच्या अंदाजपत्रकास विशेष बाब म्हणून उच्च स्तरीय सचिव समिती तसेच राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या मंजुरीच्या अनुषंगाने, ३१ मार्च २०२६ च्या शासन निर्णयान्वये २५ कोटी रुपये इतका निधी आधीच वितरित करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि स्थानिक तरुण खेळाडूंना दर्जेदार पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुरुवातीपासूनच आग्रही होत्या. या संकुलाच्या निधी वितरणात व प्रशासकीय मंजुऱ्यांमध्ये येणारे अडथळे दूर करून, अंदाजपत्रकाला मंत्रिमंडळाची अंतिम कार्योत्तर मान्यता मिळवून देण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या उर्वरित कामांना मोठी गती मिळणार असून, या भागातील क्रीडा संस्कृतीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.