highway Tendernama
मराठवाडा

खरवंडी ते नवगण राजुरी राष्ट्रीय महामार्गाला मे 2026 ची डेडलाईन

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): बीड व शिरूर कासार तालुक्यातील खरवंडी ते नवगण राजुरी या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ एफ रस्त्याची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून उर्वरित काम मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

मंत्री भोसले म्हणाले की, या प्रकल्पात वाढीव भूसंपादनासाठी वाढीव निधीची आवश्यकता आहे. या निधीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेची तपासणी आयआयटीमार्फत करण्यात येत आहे.

या मार्गाचा सुमारे १४.३० किमीचा भाग शेवगाव मतदारसंघात असून त्यापैकी जवळपास १४ कि.मी. काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजनानुसार पूर्ण केले जाईल. कामात विलंब करणाऱ्या कंत्राटदार किंवा अधिकाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल.

भविष्यात अशा प्रकल्पांमध्ये विलंब टाळण्यासाठी किमान ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याच्या सूचना विभागास दिल्या असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले.

आमदार संदीप क्षीरसागर यांनी या रस्त्याच्या कामास २०१८ मध्ये १९९ कोटींची मंजुरी मिळूनही सात वर्षांनंतर काम अपूर्ण असल्याबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.