Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे; पण पुतळ्याचा निर्णय शिंदे सरकार कधी घेणार?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : राज्य सरकारच्या निधीतून सिडको एन-५ येथील प्रियदर्शिनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक व स्मृतीवन विकसित केले जात असून, त्याची ९० टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत. तर संग्रहालयाचे काम ५० टक्के बाकी आहे. संग्रहालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्टून गॅलरी व इतर कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत.

नव्या पिढीला बाळासाहेबांच्या कार्याची माहिती व ओळख व्हावी यासाठी खास दृकश्राव्य माध्यमातून प्रदर्शित केली जाणार आहे. यासाठी ५५ इंचीच्या २० टीव्ही संच उपलब्ध झाल्या आहेत. काच पेंटींग कक्षाचे कामही युध्दपातळीवर सुरू आहे. कार्टून गॅलरीत ६६ बाॅक्स भितींवर लाऊन त्यात बाळासाहेबांनी काढलेले कार्टून दाखवली जाणार आहेत. संग्रहालयाचे विद्युतीकरण झाले असून अंतर्गत सजावट व रंगरंगोटीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

या स्मारकामध्ये टप्पा-१ अंतर्गत प्रवेशद्वार, संग्रहालय इमारत, कुंड, इंटरनॅशनल स्वच्छतागृहे तसेच सभोवतालच्या परीसराचे सुशोभिकरण, फुटपाथ, रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. येत्या दोन महिन्यांत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवनाचे काम पूर्णत्वास येणार असल्याचा दावा संबंधित कंत्राटदाराने केला आहे. पण पुळ्यासाठी वर्षभराचा कालावधी लागू शकतो त्यामुळे स्मारकाचा लोकार्पण सोहळा कधी पार पडणार हा संशोधनाचा विषय आहे.

राज्य शासनाच्या निधीतून सिडको एन-५ येथील प्रियदर्शिनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक व स्मृतीवन विकसित केले जात आहे. याठिकाणी शिवसेनाप्रमुखांचा ५१ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार असून, धुळे येथील सरमद क्रिएशनने तयार केलेले क्ले मॉडेल पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी अंतिम केले असले तरी त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप हिरवा कंदील दाखविला नसल्याचे एका विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. शिवसेनाप्रमुखांचा ५१ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळ्याची किंमत जवळपास चार कोटी रुपये असल्याचेही ते म्हणाले.

सिडको एन-५ येथील १७ एकर जागेवर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक व उद्यान विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासनाने ३८ कोटी रुपयांच्या निधी मंजूर केला आहे. दिल्लीच्या डिझाइन फॅक्टरी इंडिया या एजन्सीमार्फत हे काम केले जात आहे. पहिल्या टप्प्यातील स्मृतिवन व स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्यासाठी महापालिकेने टेंडर काढले  होते. त्यात सात टेंडर प्राप्त झाले  होते. त्यापैकी चार टेंडर उघडले  होते. टेंडरधारक एजन्सींनी क्ले मॉडेल सादर करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार डिसेंबर महिन्यात क्ले मॉडेल सादर करण्यात आले होते.

यासंदर्भातील निवड समितीने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत धुळे येथील सरमद क्रिएशनने तयार केलेल्या क्ले मॉडेल अंतिम केले असले तरी अद्याप त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम निर्णय अद्याप दिला नसल्याचे टेंडरनामा तपासात समोर आले आहे. सद्य:स्थितीत संग्रहालयातील कॅटुनिस्ट गॅलरी, डॉक्युमेन्टी फिल्म, मॅप प्राजेक्शन, टाइम गॅलरीसह इतर गॅलरीचे काम ५० टक्के पूर्ण झालेले आहे. असे असले तरी बाळासाहेब ठाकरे यांचा ५१ फूट उंचीचा पुतळा ब्राँझ धातूमध्ये तयार केला जाणार आहे. हा पुतळा तयार करण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे. मात्र अद्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा अंतिम न केल्याने दोन महिन्यांत जरी स्मारकाचे काम पूर्णत्वास येणार असले, तरी पुतळ्यासाठी किमान वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे संबंधित एजन्सीच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.