Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad: देवानगरी येथील भूयारी मार्गाचे सेवारस्ते कुणी खाल्ले?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : येथील औरंगाबाद - चिकलठाणा रेल्वे रुळांदरम्यान देवानगरी येथील रेल्वेगेट क्रमांक - ५४ येथे भूयारी मार्ग बांधण्यासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयाचे अंदाजपत्रक रेल्वे विभागाकडून एमएसआरडीसीला (MSRDC) देण्यात आले होते. रेल्वे विभागाने दिलेल्या अंदाजपत्रकानुसार येथे दुहेरी भुयारी मार्ग तयार करण्यात येणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात ४ मीटरची धावपट्टी व दीड मीटरचा पादचारी मार्ग, मुख्य रस्त्यापासून रेल्वेरुळाच्या काॅलमपर्यंत ३ मीटर उंची प्रस्तावित केली आहे. भुयारी मार्गालगत दोन मीटर रुंद कमान, तसेच पुलातून पाणी वाहत असते, त्यामुळे ओढ्यालगत सहा मीटर रुंदीचा पोचमार्ग, संरक्षक भिंत बांधणे व उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने जोडरस्ते आवश्यक आहेत, असे या अंदाजपत्रकात नमूद केले आहे.

दरम्यान, येथे अंदाजपत्रकातील जोडरस्तेच गायब झाल्याचे उघड झाले आहे. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याच काळात येथे भूयारी मार्गाचे काम झाले होते. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाने एमएसआरडीसीला सादर केलेल्या अंदाजपत्रकाचा ते शोध घेऊन जोड रस्ते कुणी गायब केले, जिथे भुयारी मार्ग तिथे रहदारीसाठी दोन्ही बाजूने जोडरस्ते आवश्यक असताना या महत्त्वाच्या कामाला का व कुणी फाटा दिला, यासाठी दिलेला निधी कुणाच्या खिशात गेला, याचा ते शोध घेतील काय, असा प्रश्न बीड बायपास परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.

औरंगाबादेतील शहानुरवाडी येथील देवानगरी रेल्वेगेट क्रमांक - ५४  येथील भूयारी मार्गाच्या जोड रस्त्याची अक्षरक्षः पार चाळण झाली आहे. बीड बायपाससह सातारा - देवळाईकर तसेच देवइंद्रायनी सोसायटी, राजगुरूनगर, ऐश्वर्या, साई, अनुष्का रेसीडेंसी, जैन व पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, जबिंदा इस्टेट, सेनानगर, भीमाशंकर काॅलनी, अथर्व क्लासिक, पीडब्लूडी काॅलनी,  देवानगरी, प्रतापगडनगर, शिवकृपा काॅलनी जिजाऊनगर व अन्य शेकडो वसाहतींकडे जाणाऱ्या
जोड रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले असून, रेल्वे आणि महापालिका प्रशासन मात्र सूस्त झोपले आहे. यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

रस्त्यांच्या अशा दयनीय अवस्थेतून पावसाळ्याततर चिखल आणि गुडग्याइतक्या पाण्यातून वाट काढावी लागते. जोड रस्त्यांची दुरवस्था झाल्याने हे खड्डेमय रस्ते अपघातांना आमंत्रण देत आहेत. याशिवाय कंबरदुखी, स्नायूंचे दुखणे, मणक्यांचे विकार होत आहेत, तर काही रुग्णांचे आजार वाढत आहेत. महापालिकेने दोन आठवड्यापूर्वीच उड्डाणपुलाच्या खालच्या रस्त्यांची डागडूजी केली. पण त्याला लागूनच असलेव्या या रस्त्यांकडे कानाडोळा केला गेला. रस्त्यांवर डांबरच निघून गेल्याने रस्त्यांचा बट्ट्याबोळ झाला आहे.

देवानगरी भुयारी मार्गाच्या कामात जोड रस्त्यांच्या दुरुस्तीचा अंदाजपत्रकात समावेश असताना दोन वर्षापूर्वी भूयारी मार्गाचे काम पूर्ण झाले. मात्र जोड रस्त्यांची दुरूस्ती कागदावरच राहिली. नियमानुसार रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूने ३० मीटर पर्यंत हद्दीत रेल्वेची मालकी असते. त्यापलीकडे भूयारी मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरूस्ती करणे ही जबाबदारी रेल्वेचीच असताना त्याकडे कानाडोळा केला गेला. रेल्वे प्रशासनाने पटरीच्या खाली पंधरा फूट खोल अठरा ब्लॉकची उभारणी करून भूयारी मार्गाचे काम पूर्ण केले. ड्रेनेज इलेक्‍ट्रिक पोल शिफ्ट केले. बॉक्‍सच्या पुढे दोन्ही बाजूने कंपाउंड वॉल बांधली. मात्र भूयारी मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरण करून पक्के रस्ते बांधलेच नाहीत.