Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad : डीपीआरच्या बिलासाठी प्रकल्प सल्लागाराचे उपोषणास्त्र

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : भूमीगत गटार योजनेत समावेश असलेल्या गावांचा सुधारीत प्रकल्प अहवाल (DPR) तयार केलेल्या ठेकेदाराची बिलाची रक्कम वारंवार मागणी करूनही ती देण्यास जिल्हा परिषदेच्या (ZP) पाणीपुरवठा विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे.

याबाबत सखोल चौकशी करून केलेल्या कामाची रक्कम तत्काळ मिळावी, या मागणीसाठी औरंगाबादचे शासकीय ठेकेदार महेश निनाळे यांनी थेट उपोषणाचे हत्यार उपसले आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांच्याकडे कुठल्याही शासकीय कार्यालयासमोर उपोषण करावयाचे असेल तर आधी निवेदन करावे लागते. मात्र नियमाला बगल देत निनाळे यांनी कायद्याचा भंग केला आहे. आधी त्यांचे बील देतो आणि संध्याकाळी गुन्हा दाखल करतो, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

ग्रामीण भागातील गावसमुहांचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करण्यासह त्यांना शहरांप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी भारत सरकारने  श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन (RURBAN) अभियानाची (SPMRM) राज्यात अंमलबजावणी सुरू केली आहे. याच अभियानाला राष्ट्रीय रुरबन अभियान (National Rurban Mission-NRuM) असे देखील संबोधले जाते. या अभियानाअंतर्गत राज्यातील २८  जिल्ह्यांतील एकूण ९९ तालुक्यांतील गावसमुहांची निवड करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील  घाणेगाव, कमळापूर, जोगेश्वरी, वाळुज, ईटावा, नारायणपूर खुर्द, कासोदा, नांदेडा आदी गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यात भूमीगत गटार योजनेसाठी या गावांचे सुधारीत व नविन अंदाजपत्रके व सर्वेक्षण करून सविस्तर विकास प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला. सदर कामाची मुदत १५ दिवसाची होती. परंतु मजीप्राची नवीन दरसुची प्रकाशित झाली नसल्यामुळे अंदाजपत्रक पुन्हा बदलावे लागले.

आठपैकी बऱ्याच ग्रामपंचायतीकडे ड्रेनेजलाईन टाकण्यात अडचणी असल्यामुळे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम एक महिना उशिरा झाले. सदर कामासाठी ४ लाख ९ हजार ८२६ रूपयाचे अंदाजपत्रकीय रक्कमचे टेंडर काढण्यात आले होते. या रकमेवर ०.०५ टक्के कमी दराने काम करण्यास इच्छुक असलेल्या महेश निनाळे इंजिनियर्स या कंपनीचे टेंडर मंजूर करण्यात आले होते.

त्यानुसार या प्रकल्पावर त्यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काम पूर्ण करून प्रकल्प अहवाल सादर केला असतानाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून त्यांना केलेल्या कामाचे पैसे मिळाले नाहीत. 

संचिका, मोजमाप पुस्तिका हरवली

याबाबत निनाळे इंजिनियर्सचे वरिष्ठ अभियंता सुनिल कदम यांनी वारंवार पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांचे लक्ष वेधले. तरीही त्यांना कामाचे बिल अदा केले नाही. याप्रकरणी कारण विचारले असता संचिका सापडत नाही, तर कधी मोजमाप पुस्तिका सापडत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. अगोदर प्रशासकाचे लक्ष वेधण्यासाठी त्याने सोमवारी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाबाहेर उपोषणाचे हत्यार उपसले.