Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad: नियोजनशून्य कारभार; 16व्या दिवशीच खोदला नवा कोरा रस्ता

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : पंधरा दिवसांपूर्वी तयार तयार झालेला नवा कोरा चकचकीत फुटपाथ सोळाव्या दिवशी पुन्हा खोदला जात असल्याचा संतापजनक प्रकार दस्तरखुद्द मनपा प्रशासकांच्या जलश्री निवासस्थानासमोर घडत आहे. कोण फुटपाथ बनवतोय आणि तो फोडतोय, यावर कुणाचेच लक्ष नाही.

सध्याच्या मनपा प्रशासकांच्या काळात 'आंधळ दळतय अन् कुत्र पीठ खातयं' असाच प्रकार दिसत आहे. औरंगाबादकरांनी कराच्या रुपात भरलेल्या पैशांची निव्वळ उधळपट्टी सुरू आहे. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे याच खोदकामाजवळ खा. इम्तियाज जलील यांचेही कार्यालय आहे. शिवाय नव्या कोऱ्या रस्त्याची देखील माती केली आहे

जी - २० परिषदेच्या निमित्ताने शहरात मनपा आणि सां. बां. विभागाकडून कोट्यवधींची कामे सुरू आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडते आहे. मात्र रस्त्यांसाठी कुप्रसिध्द असलेल्या औरंगाबादेत विदेशी पाहुण्यांसाठी होत असलेल्या मलमपट्टीवर पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने घाव घातले जाणार काय, अशी भीती आता वाटू लागली आहे. विदेशी पाहुण्यांचे आगमन पंधरा दिवसावर येऊन ठेपले असताना अत्यावश्यक असेल तेथेच खोदाखोदी करा, असे सक्त आदेश प्रशासकांनी भारत गॅस रिसोर्सेस कंपनी व जी.व्ही.पी.आर.सह इतर सरकारी व खाजगी केबल कंपन्यांना दिले असतानाही सर्रास खोदकाम केले जात आहे. 

जी - २० परिषदेच्या निमित्ताने सरकारी निधीतून मनपा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांचे शासकीय निवासस्थान (जलश्री) ते खा. इम्तियाज जलील यांचे कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत या व्हीआयपी मार्गावरील नव्याने तयार झालेला फुटपाथचे अचानक खोदकाम सुरू असल्याचे दिसून येत आहे. तो खोदायचाच होता तर नव्याने का बनविला, आधी खोदून घ्या, मग फुटपाथ तयार करा, असे नियोजन कुणीच करताना दिसत नाही. पैशांची अशा पद्धतीने सुरू असलेली नासाडी औरंगाबादकरांच्या दृष्टीने चिंतेची बाब बनली आहे. जनतेच्या पैशांची अक्षरश लूट केली जाते. आताच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून हेच दृष्टचक्र सुरू असल्याने औरंगाबादकर वैतागले आहेत. 

अनेक तक्रारी, निवेदन व आंदोलन करूनही यावर कुणाचेही नियंत्रण नाही. मनपा प्रशासन एखाद्या पुतळयाप्रमाणे कुठल्याही तक्रारीवर स्तब्ध असते. कुणाचीही पर्वा न करता शहरात वाट्टेल तेव्हा खोदकाम करण्यास कुणालाही अडचण जात नाही. खोदकाम करणाऱ्यालाही भीती वाटत नाही. एवढेच काय तर झालेल्या खोदकामानंतर तो रस्ता वा खड्डा रस्त्याला समांतर करून बुजवावा, अशी तसदीही घेतली जात नाही. खोदकाम केले की थातूर-मातूर बुजविले की, जबाबदारी संपली, अशीच भूमिका रस्त्यांवर काम करणाऱ्या सर्वच कंत्राटदारांची आहे. आतापर्यंत वचक बसावा, अशी कुठलीही दंडात्मक कारवाईही मनपाकडून करण्यात आली नाही. यावरून अधिकाऱ्यांचे कंत्राटदांरांसोबत लागेबांधे आहेत, या आरोपाला बऱ्यापैकी बळ मिळते.

का आणि कोणी केले खोदकाम?

गत तीन दिवसांपासून अण्णाभाऊ साठे चौक ते खा. जलील यांचे कार्यालय ते मनपा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांचे शासकीय निवासस्थान जलश्री बंगल्यासमोर खोदकामास सुरवात झाली आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जी.व्ही.पी.आर. कंपनीकडून अण्णाभाऊ साठे चौक ते दिल्लीगेट जलकुंभात पाण्याचा पुरवठा करणारी ५०० एम.एम. व्यासाची जलवाहिनी व दिल्लीगेट जलकुंभातून झोन क्रमांक - ९ मध्ये पाणीपुरवठा करणारी  २५० एम.एम. व्यासाची वितरण वाहिनी टाकण्याचे काम सुरूअसल्याचे जी.व्ही.पी.आर. कंपनीचे अधिकारी सांगत होते. 

हे काम पंधरा दिवसांपूर्वी अर्थात फुटपाथ करण्याआधी करता आले असते. आता विदेशी पाहुण्यांच्या आगमनाला दोन आठवड्याचाच कालावधी बाकी असताना  खोदणे सुरू आहे. येथे मोठ्या व्यासाची इन्कमिंग आणि आऊटगोईंग असे दोन पाइप टाकले जाणार आहेत. त्यातच फुटपाथ खालीच २० फूट खोलीचे सात चेंबर, जिल्हाधिकारी कार्यालयाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी, इलेक्ट्रीकल व बी.एस.एन.एलसह विविध खाजगी कंपन्यांची इंटरनेट केबल, लिंबाची चार मोठी वृक्ष याची अडचण असल्याने जी.व्ही.पी.आर. ला विविध विभागाची परवानगी घेण्याची अथवा कळवण्याची का आवश्यकता वाटली नाही, नवीन पाणी पुरवठा योजनेचे हे अत्यावश्यक काम मनपाने फुटपाथ तयार करण्याआधीच का करून घेण्यासाठी कंपनीला आग्रह का धरला नाही, हा प्रश्न आहे. एकूणच आंधळ दळतंय अन् कुत्र पीठ खातय, असा पालिकेचा कारभार औरंगाबादकर उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.