औरंगाबाद (Aurangabad) : सिडको एन-३ परिसरातील उच्चन्यायालय ते शिवछत्रपती महाविद्यालय रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदार एक महिन्यांपासून गायब झाल्यामुळे फुटपाथचे काम बंद पडले आहे. काम अर्धवट सोडल्यामुळे या भागातील रहिवाशांना दारापर्यंत दुचाकी, चारचाकी वाहनांची ने-आण करणे अवघड समस्या होऊन बसली आहे. परिणामी या नव्याकोऱ्या रस्त्यावरच वाहने लावत येथील रहिवाशांना घर गाठावे लागत आहे. याच मार्गावर रूग्णालये, मंगलकार्यालये, महाविद्यालय व व्यापारी प्रतिष्ठाने असल्याने रस्त्यावर पार्किंगसाठी जागा अपुरी पडत आहे.
यासंदर्भात ठेकेदार ए. जी. कन्सट्रक्शन कंपनीकडे विचारणा केली असता काम संपूर्ण एक महिना झाला. जोपर्यंत पीएमसी आम्हाला फुटपाथसाठी व एक्सपंशन गॅपमध्ये गट्टू लावण्याचे आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही असे चढ्या आवाजात उत्तर देत प्रतिनिधीवर दबाब टाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर प्रतिनिधीने यश इनोव्हेशन ॲन्ड सोल्युशन कंनसलटंन्सीचे समीर जोशी यांना संपर्क केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. परिणामी त्यांची बाजु समजु शकली नाही. त्यामुळे परिसरातील स्त्यासाठी मंजूर असलेला फुटपाथ आणि एक्सपंशन गॅपमधील गट्टूंचे काम कधी होणार, असा प्रश्न आहे.
सिडकोचे मनपात हस्तांतर झाल्यापासून गेल्या १६ वर्षांपासून येथील छोट्याशा जोड रस्त्याची दुरवस्था झालेल्या उच्चन्यायालय ते शिवछत्रपती महाविद्यालयापर्यंत रस्त्याच्या दुरूस्तीसाठी येथील रहिवाशांनी तत्कालिन मनपा प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे स्मार्ट सिटी रस्ते प्रकल्पांतर्गत या रस्त्यासाठी निधी मंजूर केला होता. गेल्या महिन्याभरापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम औरंगाबादेतील ए. जी. कन्सट्रक्शन कंपनी या ठेकेदाराला देण्यात आले होते. त्यांनी डांबरी रस्ता ओरबाडून त्यावर सिमेंट रस्त्याचे काम केले आहे. मात्र, रस्त्याची सफाई न करता तसेच फुटपाथचे काम न करता , एक्पंशन गॅपमध्ये गट्टू न लावता आरपार नाल्या तशाच उघड्या ठेवल्या. रस्त्याची ही महत्वाची काम अर्धवट सोडून ठेकेदार अचानक यंत्रणेसह गायब झाला. त्यामुळे येथील रहिवाशांच्या यातनामय प्रवासात अधिक भर पडली. फुटपाथ न झाल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला खड्डे पडले असून या खड्ड्यातून वाहने आत-बाहेर करताना रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एक्सपंशन गॅप उघडे ठेवल्यामुळे वाहनांची गती अचानक कमी करावी लागत असल्यामुळे लहान- मोठे अपघात होत आहेत. ठेकेदार व स्मार्ट सिटी विभागातील काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.विशेष म्हणजे प्लाॅट क्रमांक ७८ येथे माजी आमदार सुभाष झांबड यांचे बंधु तथा शहरातील प्रसिध्द उद्योजक तनसुख झांबड यांच्या आलीशान बंगल्यासमोरच उकरलेल्या डांबराचा डोंगर रस्त्याच्या मधोमध लावल्याने रहिवाशांना काॅलनीतून चारचाकी वाहनांची ने - आण करता येत नाहक. परिणामी नव्या कोऱ्या रस्त्यावर पार्किंग झाली आहे.