Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad: 'या' महामार्गाचा बदलला लूक; सहापदरी रस्त्यावरून वाहतूक

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद-पुणे रस्ता रूंदीकरणात कित्येक वर्षांपासून रखडलेल्या नगरनाका ते गोलवाडी या रस्त्याचे जी-२० परिषदेनिमित्त विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी विशेष दुरूस्ती अंतर्गत दोन कोटी ६२ लाख १० हजार ७१ इतक्या रकमेत नुकतेच डांबरीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर रोड फर्निचरचे काम देखील जोमात सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महापालिकेने देखील दुभाजकात दिवे लावण्याचे काम युध्दपातळीवर सुरू केले आहे. या महामार्गाचा लुकच बदलून गेल्याने वाहने देखील सुसाट धावू लागली आहेत.

पूर्व मराठवाड्याकडे जाणारा व ऐतिहासिक पर्यटन राजधानी औरंगाबादचे मुख्य प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद-पुणे या राष्ट्रीय महामार्गादरम्यान नगरनाका ते गोलवाडी साडेतीन किमी रस्ता रुंदीकरणाचा लढा जिंकल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने नगरनाका ते गोलवाडी टप्प्याचे काम पाच वर्षांपूर्वी झाले होते. डांबरीकरण व मजबुतीकरण झाल्यानंतर या रूंद आणि जांभळासारख्या काळ्याभोर रस्त्याने औरंगाबादकरांना भुरळ घातली होती. आता जी-२० निमित्त या रस्त्यासाठी विशेष दुरूस्तींतर्गत जवळपास तीन कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. परिणामी रस्त्याचे भाग्य उजळल्याने तसेच पुढे गोलवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम झाल्याने वाहने या रस्त्यावरून सुसाट धावू लागली आहेत.

पाच वर्षांपूर्वी औरंगाबाद-पुणे महामार्गाचे सहापदरीकरण जागतिक बँक प्रकल्प विभागातून करण्यात आले होते. गेल्या वीस वर्षात अडीचशेहुन अधिक बळी घेतलेल्या नगरनाका ते गोलवाडी या साडेतीन किमीच्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणासाठी जागा मिळत नव्हती. कारण दोन्ही बाजूची जमीन लष्कराच्या मालकीची होती. केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या समन्वयाने रस्ता रुंदीकरणासाठी नऊ वर्षापूर्वी जागा मिळाली. लष्कराला रस्ता ओलंडण्यासाठी अंडर पास करून देण्यात आला. त्यानंतर २०१६ मध्ये ३० मीटर रस्त्याचे रूंदीकरण व मजबुतीकरण करून डांबरीकरण करण्यात आले होते. 

या टप्प्याचे औरंगाबादचे किशोर चोरडीया यांच्या चंदन इंजिनिअरींग ॲन्ड काॅन्ट्रक्टर कंपनीकडून झाल्यानंतर  लातुरच्या खंडू पाटील यांच्या के. एच. कन्स्ट्रक्शन कंपनीकडून गोलवाडी रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न देखील मार्गी लागला. त्यामुळे आता नगरनाका सिग्नल ते गोलवाडी पूल या रस्त्यावरून वाहने विनाअडथळा धावू लागली आहेत. हा रस्ता दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ११ मीटरचा आहे. सहा पदरी रस्ता तयार झाल्याने या रस्त्याचा लूकच बदलला आहे. गोलवाडी रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागल्याने जुन्या अरूंद पुलावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे. यामुळे कामगार, उद्योजक आणि प्रवाशांच्या वेळेत आणि खर्चात देखील मोठी बचत झाली आहे.

टेंडरनामा प्रतिनिधीने सलग दोन दिवस शहराची पाहणी केली, त्यात औरंगाबाद-पैठण, औरंगाबाद-जालनारोड, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते सिडको बसस्टॅन्ड ते हर्सूल टी पांईट ते जळगाव रोड, हर्सूल टी पाॅईंट ते मुख्य रेल्वेस्टेशन रिंग रोड, कॅम्ब्रीज ते सावंगी बायपास, पैठण जंक्शन ते झाल्टाफाटा ते कॅम्ब्रीच चौक, नगरनाका ते धुळे, धुळे-सोलापुर हायवे, समृध्दी महामार्ग, त्यात राज्य सरकारच्या अनुदानामुळे महापालिका हद्दीतील मागील काही वर्षात औरंगाबादेत बऱ्याच रस्त्यांचा कायापालट झाला आहे. उर्वरीत रस्त्यांचे देखील काम होणार आहे. शहरातील पर्यटन स्थळांचे देखील नशीब उजळले आहे. गेल्या चाळीस वर्षात औरंगाबादच्या पोस्टर पुढाऱ्यांना जे जमले नाही, ते येत्या दोन महिन्यात जी-२० निमित्त येणाऱ्या विदेशी पाहुण्यांमुळे अधिकाऱ्यांनी करून दाखवले, या चर्चेला औरंगाबादेत उधान आले आहे. काय ते रस्ते, काय ते उड्डाणपुल, काय ती रंगरंगोटी अन् काय ती पेंटीग, काय ते पाण्याचे फवारे, काय ती खजुराची झाडी अन काय ते दुभाजक आता औरंगाबाद समद्ध ओकेमधी आहे, अशीच चर्चा प्रत्येकाच्या ओठावर सुरू आहे.

आता याकडे लक्ष द्या

● बीडबायपास पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा दोन्ही बाजुने १५ मीटरचे सेवा रस्ते व्हावेत.

● हर्सूल टी पाॅईट ते सिडकोबसस्थानक एका बाजुने अखंडीत १५ मीटरचा सेवा रस्ता व्हावा.

● तिसगाव ते मिटमिटा सहा वर्षांपासून रखडलेला पंधरा कोटीचा रस्ता पूर्ण व्हावा.

● शरणापूर ते साजापूर रस्त्यासाठी २७ कोटीचा निधी उपलब्ध आहे. टेंडर देखील काढले गेले. चार ठेकेदार इच्छुक आहेत. पण अद्याप टेंडर का ओपण केले जात नाही. याकडे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे.

● औरंगाबाद रेल्वे स्थानक ते चिकलठाणा दरम्यान रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावावा. पुढे फुलेनगर, शिवाजीनगर, बाळापुर व चिकलठाणा येथील रेल्वे फाटकादरम्यान भुयारी मार्ग उभारावेत. तसेच या १४ किमीच्या रेल्वेरूळादरम्यान दोन्ही बाजुने दाट वसाहती असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी पादचारी लोखंडी आरओबी उभारावेत

● जुना बीडबायचे अर्धवट काम पुर्ण करावे

● दमडीमहल ते आकाशवानी जालनारोड तसेच लक्ष्मणचावडी ते एमजीएम या रस्त्यासह औरंगपुरा, गुलमंडी, राजाबाजार व शहागंज परिसरातील रस्त्यांचे शहर विकास आराखड्यानुसार रूंदीकरण आवश्यक

● गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरण, सिडको आणि मध्यवर्ती बसपोर्ट या प्रकल्पांचे काम होणे आवश्यक

● शहरातील जनावरांचे गोठे हलवण्यासाठी दुग्धनगरी प्रकल्पाचे काम मार्गी लावा.

● चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, वाळुज आणि शेंद्रा एमआयडीसीतील रस्ते व इतर मुलभुत सुविधा.